अर्थवार्ता : अमेरिकेसोबत व्यापारी युद्धाचे सावट Pudhari File Photo
अर्थभान

India US Trade War | अर्थवार्ता : अमेरिकेसोबत व्यापारी युद्धाचे सावट

पुढारी वृत्तसेवा

* गतसप्ताहात निफ्टी व सेन्सेक्समध्ये अनुक्रमे एकूण 271.65 अंक आणि 863.11 अंकांची घसरण होऊन दोन्ही निर्देशांक अनुक्रमे 24565.35 आणि 80599.91 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये 1.09% तर सेन्सेक्समध्ये 1.06 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. निफ्टीमध्ये सर्वाधिक कोसळणार्‍या समभागांमध्ये अदानी एंटरप्राईजेस (-7.8 टक्के), विप्रो लिमिटेड(-6.4%), कोटक महिंद्रा बँक (-6.2%), टाटा मोटर्स (-5.6%), टाटा स्टील (-5.2%) या समभागांचा समावेश झाला, तर सर्वाधिक वाढ होणार्‍या समभागांमध्ये जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस(5.9%), हिंदुस्थान युनिलिव्हर(5.7%), लार्सन अँड टुब्रो(4.2%), एशियन पेंटस् (4.1%)आणि ट्रेंट (2.7%) या समभागांचा समावेश झाला. या सप्ताहात प्रामुख्याने अमेरिकेने भारतावर लादलेल्या 25% आयात शुल्काचा नकारात्मक परिणाम झाला. निर्देशांकांमध्ये गेले पाच आठवडे सातत्याने घट होत आहे. ऑगस्ट 2023 नंतर पहिल्यांदाच सलग पाच आठवडे निर्देशांकात घट बघावयास मिळाली.

* अमेरिकेला भारताचे कृषी आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्र खुणावते आहे; परंतु भारतामध्ये आजदेखील कृषी आणि दुग्ध व्यवसायावर ग्रामीण अर्थव्यवस्था अवलंबून आहे. अमेरिकेसाठी अशावेळी जर बाजारपेठ खुली केली, तर अल्पभूधारक शेतकरी आणि ग्रामीण भागात रुजलेली सहकार चळवळ यावर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमेरिकेच्या दबावाला बळी न पडण्याचे धोरण भारताने अवलंबले आहे. यास प्रत्युत्तर म्हणून भारतातून येणारी औषधे, वाहनांचे सुटे भाग, रसायने यांच्यावर अमेरिकेने कर बसवला. याचा जितका फटका भारताला बसणार आहे, त्याचप्रमाणे अमेरिकेलादेखील महागाईच्या स्वरूपात याचे परिणाम भोगायला लागणार असल्याचे अमेरिकेतीलच काही अर्थ विश्लेषक सांगत आहेत.

* रशियाकडून स्वस्तात खनिज तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी बंद करावी, यासाठी अमेरिका भारतावर व्यापारी युद्धाच्या स्वरूपात दबाव आणत आहे. यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही हास्यस्पद विधाने देखील केली. जगातील सर्वात वेगाने वाढणार्‍या तसेच सध्याची चौथ्या क्रमांकाची आणि आगामी पाच वर्षांत तिसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याचा अंदाज असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला मृत अर्थव्यवस्था म्हणून हिणवले. याउपर पाकिस्तान सारख्या कंगाल राष्ट्रासोबत खनिज तेल उत्खननाचे करारदेखील केले. सध्या आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारताकडून अमेरिकेला 86.7 अब्ज डॉलर वस्तूंची निर्यात करण्यात आली. नुकत्याच लागू करण्यात आलेल्या सेक्शन 232 च्या आयातकराअंतर्गत सुमारे 40 अब्ज डॉलरच्या निर्यातीवर या आयातकराचा परिणाम होणार आहे. भारताकडून निर्यात होणार्‍या एकूण 19.8 % निर्यातीवर या नवीन आयात कराचा परिणाम होणार असल्याचे विश्लेषक सांगतात. यानंतर देखील भारताने रशियाशी तेलाचा व्यापार चालू ठेवल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा अमेरिकेने सध्या दिला आहे.

* अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या चमत्कारिक वक्तव्यांमुळे आणि निर्णयामुळे खुद्द अमेरिकेचे बाजार शुक्रवारी कोसळले. अमेरिकेचे महत्त्वाचे निर्देशांक डाऊ जोन्स, नॅसडॅक आणि एस अँड पी दीड ते दोन टक्क्यांपेक्षा अधिक कोसळले. ‘अ‍ॅमेझॉन’सारख्या बलाढ्य कंपन्या आठ टक्क्यांपेक्षा अधिक कोसळल्या. अ‍ॅप्पल कंपनीचे सीईओ टिम कूक यांनीदेखील आयात कराविषयी इशारा देत, यामुळे अमेरिकेला 1.1 अब्ज डॉलरचा भुर्दंड सोसावा लागणार असल्याचे मत व्यक्तकेले.

* देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएस लवकरच 12000 कर्मचार्‍यांना नारळ देणार. एकूण कर्मचारी संख्येच्या दोन टक्क्यांपर्यंत ही कर्मचारी कपात असणार आहे. तसेच नवीन भरती करण्यात येणार्‍या 600 जणांना कामावर घेण्याचे पुढे ढकलण्यात आले असल्याचे समजते. ‘टीसीएस’ने सध्या या गोष्टीचा इन्कार केला असून, केवळ कंपनीअंतर्गत काही बदल करण्यात येत असल्याचे सांगितले. कंपनीमध्ये सध्या 6,13,069 कर्मचारी काम करतात.

* मुकेश अंबानी यांचे धाकटे बंधू अनिल अंबानी यांच्याशी संबंधित 35 ठिकाणी ईडीची छापेमारी. आता अनिल अंबानी यांच्या विरोधात लूकआऊट नोटीसदेखील जारी करण्यात आली आहे. 3000 कोटींच्या कथित बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी 5 ऑगस्ट रोजी चौकशीला हजर राहण्याचे ईडीने अनिल अंबानी यांना समन्स बजावले आहे. 2017 ते 19 या काळात येस बँकेकडून अनिल धीरूभाई अंबानी उद्योग समूहाने सुमारे 3000 कोटी कर्ज घेतले होते. कर्जाची रक्कम घेण्यासाठी बँकेच्या पदाधिकार्‍यांना लाच दिल्याचा संशय ईडीला आहे. तसेच कर्जाची रक्कम इतर कंपन्यांकडे वळवल्याचा देखील आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. लूकआऊट नोटीस जारी केल्याने अनिल अंबानी यांना सध्या भारताबाहेर जाता येणार नाही.

* जुलै महिन्यात जीएसटी संकलन 7.5 टक्कयांनी वाढून 1 लाख 96 हजार कोटींपर्यंत पोहोचले. मागील वर्षाच्या तुलनेत जीएसटी संकलनात 7.5% वाढ बघावयास मिळाली. मागील एप्रिल महिन्यामध्ये जीएसटी कर संकलनाने आतापर्यंतचा विक्रमी दोन लाख 37 हजार कोटींचा टप्पा गाठला होता. जुलैमध्ये एकट्या महाराष्ट्रातून देशात सर्वाधिक म्हणजेच 30,590 कोटींचे जीएसटी संकलन झाले.

* सरकारचा आयडीबीआय बँकेतील हिस्सा विक्रीसाठी पुन्हा एकदा प्रयत्न. चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीमध्ये यासंदर्भात निविदा मागवल्या जातील आणि मार्च अखेरपर्यंत हिस्सा विक्रीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असा अंदाज आहे. यामध्ये सरकार 60.72% चा हिस्सा विकणार आहे. ‘आयडीबीआय’मध्ये एलआयसीचा आणि केंद्र सरकारचा असा एकूण 94% पर्यंत हिस्सा आहे. हिस्सा विक्री पश्चात सरकारला आणि ‘एलआयसी’ला सुमारे 50 हजार कोटींचा निधी मिळण्याची शक्यता आहे.

* आंतरराष्ट्रीय पातळीवरची एफएमसीजी क्षेत्रातील बलाढ्य कंपनी प्रॉक्टर अँड गॅम्बल कंपनीच्या प्रेसिडेंट आणि सीईओपदी शैलेश जेजुरीकर या मराठमोळ्या व्यक्तीची नियुक्ती. मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला आणि अल्फाबेट (म्हणजेच गुगलची प्रमुख कंपनी) कंपनीच्या सुंदर पिचाई यांच्यानंतर आणखी एका भारतीय व्यक्तीची जागतिक बलाढ्य कंपनीच्या प्रमुखपदी वर्णी. एक जानेवारी 2026 पासून जेजुरीकर कंपनीच्या प्रमुखपदाचा कार्यभार सांभाळणार.

* टाटा मोटर्स इन्हेको कंपनीमधील व्यावसायिक वाहन विभाग खरेदी करणार. मूळची इटलीची असलेली ही कंपनी एकूण 3.8 अब्ज युरोमध्ये खरेदी केली जाणार. टाटा मोटर्सने केलेले आतापर्यंतचे सर्वात मोठे अधिग्रहण असणार आहे.

* 25 जुलै रोजी संपलेल्या सप्ताहअखेर भारताची विदेश गंगाजळी 2.7 अब्ज डॉलर्सने वाढून 698.19 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT