टॉपअप एसआयपी  Pudhari File Photo
अर्थभान

वेगाने संपत्ती वाढविण्याचा मूलमंत्र टॉपअप एसआयपी

पुढारी वृत्तसेवा
अनिल पाटील, प्रवर्तक : एस. पी. वेल्थ, कोल्हापूर

आयुष्यामध्ये खूप मोठी संपत्ती निर्माण करायची असेल, तर योग्य ठिकाणी पैसे गुंतवा. वयाच्या योग्य वेळी पैसा द्या अन् पैसा वाढायला योग्य वेळ द्या आणि प्रतिवर्षी त्यामध्ये योग्य भर टाका. या चार योग्यतेच्या गोष्टी जे लोक गुंतवणुकीच्या बाबतीत अमलात आणतील त्यांच्या आयुष्यात पैसाच पैसा निर्माण होईल. भविष्यात त्यांचा पैसा फुलेल, त्यांच्यासाठी काम करेल आणि आयुष्य श्रीमंत, समृद्ध बनवेल.

वीस वर्षांत पाच कोटींची संपत्ती निर्माण करणे सोपे आहे. इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये दरमहा 25 हजार रुपये गुंतवणूक (एसआयपी) चालू केली आणि त्यामध्ये प्रतिवर्षी टॉपअप 10 टक्के वाढ केली तसेच 13 टक्क्यांप्रमाणे परतावा मिळाला, तर तुमच्या आयुष्यामध्ये पाच कोटींची संपत्ती निर्माण होऊ शकते. वीस वर्षांनंतर मिळालेल्या पाच कोटी संपत्तीचे विश्लेषण पहिले, तर 1.71 कोटी आपली गुंतवणूक होते व 3.41 कोटी इतका फायदा मिळतो. याचा अर्थ प्रत्येक वर्षी आपण 17 लाख रुपये शिल्लक ठेवल्यासारखे आहे. म्हणजे भविष्यात दरमहा 1 लाख 41 हजार रुपये एवढे अधिक उत्पन्न निर्माण केल्यासारखे आहे अन् गुंतवणुकीच्या माध्यमातून श्रीमंतीकडे जाण्याचा हाच खरा मार्ग आहे. म्युच्युअल फंडातील टॉपअप एसआयपी प्लॅन हा सर्वोत्तम गुंतवणुकीचा पर्याय आहे; मात्र इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक करण्यापूर्वी बाजारातील जोखीम समजावून घेणे महत्त्वाचे असते. त्यासाठी योग्य सल्लागार भेटणे गरजेचे असते. म्युच्युअल फंडामध्ये असा नियमित गुंतवणूक पद्धतीचा सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) सिप म्हणून एक सुलभ आणि चांगला पर्याय आहे.

सिप म्हणजे काय? आणि गुंतवणूक करताना काय काळजी घेतली पाहिजे? आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये सिप गुंतवणूक कशी करावी? याबाबत माहिती मागच्या लेखामध्ये आपण पहिली. प्रत्येक वर्षी जसजसे आपले उत्पन्न वाढत असते आणि खर्चही वाढत असतो. त्याच प्रमाणात गुंतवणुकीतही वाढ केली पाहिजे. आपण एसआयपीमध्ये प्रत्येक वर्षी गुंतवणुकीत वाढ करत राहिलो, तर खूपच मोठी संपत्ती निर्माण करू शकतो. हाच संदेश आजच्या तरुणांनी समजून घेतला पाहिजे. त्या पद्धतीने आपल्या गुंतवणुकीचे नियोजन केल्यास दीर्घकालात मिळणारा भांडवली बाजाराचा परतावा आणि प्रत्येक वर्षी गुंतवणुकीमध्ये केलेली वाढ या दोन्ही गोष्टींमुळे ही खूप मोठी संपत्ती निश्चितपणे निर्माण होऊ शकते. त्यासाठी तरुणांनी आर्थिक साक्षरतेकडे लक्ष दिले पाहिजे. खर्चिक प्रवृत्ती न ठेवता बचतीला प्राधान्य दिले पाहिजे. केलेली बचत योग्य ठिकाणी गुंतवली पाहिजे. प्रत्येक वर्षी वाढणार्‍या उत्पन्नाबरोबरच गुंतवणुकीतही वाढ केली पाहिजे. यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणून टॉपअप एसआयपी चक्रवाढ व्याजाने काय चमत्कार होऊ शकतो, याचा अभ्यास केला पाहिजे. आजच्या तरुणांत खर्चिक वृत्ती बळावत आहे. त्यांनी वेळीच जागे झाले पाहिजे. फक्त बचत न करता आपल्या इच्छा, आकांक्षांवरच पैसा खर्च केला, तर ऋण दारिद्य्र येते. त्यांनी मनाला आवर घालून गरजेसाठी पैसा खर्च केला पाहिजे. आपल्या पैशाला कामाला लावता आले पाहिजे, तरच आपल्या आयुष्यात श्रीमंती आणि समृद्धी येऊ शकते.

एखादे लहानसे रोपटे लावले आणि त्याला नियमितपणे खत आणि पाणी देत राहिले, तर वीस वर्षांत त्याचा प्रचंड मोठा वृक्ष तयार होतो. एकदा का मोठा वृक्ष तयार झाला की, त्याची फळे पिढ्यान् पिढ्या खात राहता येतात. हाच नियम एसआयपी आणि टॉपअप एसआयपी गुंतवणुकीच्या बाबतीत लागू होतो. तरुणपणी छोट्याशा गुंतवणुकीने सुरुवात करून भविष्यात मोठी संपत्ती निर्माण करून SWP करून वर्षानुवर्षे नियमितपणे उत्पन्न घेता येते. 2047 हे वर्ष देशाचे शतक महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करताना आजचे तरुण हे उद्याचे वृद्ध असणार आहेत. आयुष्याच्या संध्याकाळी सन्मानाने जगण्यासाठी दरमहिन्याला पैशाचा प्रवाह (Cash Flow) निर्माण करण्यासाठी मोठ्या संपत्तीची गरज भासणार आहे. मोठा पैसा निर्माण करण्यासाठी वेळ आणि वेग महत्त्वाचा असतो. कित्येक लोक पारंपरिक पद्धतीने गुंतवणूक करतात. 6 ते 7 टक्के परतावा मिळतो. अशा ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीचा विचार केला, तर महागाईच्या तुलनेत पैसा वाढत नाही. यासाठी सुरक्षित गुंतवणूक आणि जोखीमयुक्त गुंतवणूक समजून घेतली पाहिजे. भांडवली बाजाराचा अभ्यास केला पाहिजे. आर्थिक साक्षरतेबाबत आजच जागरूकता दाखविली पाहिजे.

आज पैसा किती येतो, खर्च किती होतो, याचा ताळमेळ ठेवला पाहिजे. गुंतवणूक करण्यापूर्वी पहिला आपल्या आर्थिक उद्दिष्टांचा आराखडा तयार केला पाहिजे. वाढत्या महागाईनुसार कोणत्या वर्षी किती पैशाची गरज आहे, हे अगोदर ठरविले पाहिजे. महिन्याला सीप गुंतवणुकीच्या माध्यमातून नियोजनबद्ध गुंतवणूक करणे अपेक्षित आहे. ज्यांच्या आयुष्यात नियोजन असते, त्यांची मोठमोठी आर्थिक स्वप्ने सहजपणे साकार होतात, अन्यथा कर्जे, आर्थिक कलह घेऊन रडतकढत जीवन जगावे लागते. म्हणूनच समृद्ध अन् आनंदी भवितव्यासाठी योग्य आर्थिक नियोजन हाच एकमेव मार्ग आहे.

‘टॉप ऑफ एसआयपी’ म्हणजे काय?

प्रत्येक वर्षी आपले उत्पन्न वाढत असते. वाढणार्‍या उत्पन्नाबरोबर आपण गुंतवणुकीमध्ये वाढ करण्याचा चांगला मार्ग आहे. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना दरमहा नियमित गुंतवणूक करतो. त्यामध्ये प्रतिवर्षी ठरावीक रक्कम किंवा टक्केवारीत वाढ करू शकतो. प्रत्येक वर्षी यामध्ये दोन प्रकारे आपण वाढ करू शकतो. म्हणजेच त्याला टॉप करू शकतो. एक तर तुम्ही मूळ रकमेच्या ठरावीक टक्क्यांमध्ये वाढ करू शकता. समजा तुम्ही 5000 रुपयांची सीप करीत असाल, तर त्यामध्ये 10%, 20%, 30% अशा पद्धतीने टक्केवारीत किंवा ठरावीक रक्कम त्यामध्ये वाढ करू शकता. गुंतवणूक करताना तुम्ही हे सांगावे लागते. टॉपअप एसआयपी नोंद केली की, काम झाले असे नाही. त्यानंतरच प्रत्येक वर्षी ऑटोमॅटिक तुमच्या खात्यामधून वाढून रक्कम कपात होऊन जाईल. अधिक रक्कम गुंतवणूक होत जाईल. रक्कम वाढत जाईल तसतसे प्रत्येक वर्षी चक्रवाढ व्याजाच्या परिणामाने आपली संपत्तीही वाढत राहते. यासाठी आपण गुंतवणूक करत असताना ही सूचना नोंद करायला हवी.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT