राजू पाटील, नाशिक
भारताच्या म्युच्युअल फंड बाजारात अँम्फीच्या आकडेवारीनुसार सेक्टरल आणि थिमॅटिक फंडस् अंतर्गत सध्या २३० वेगवेगळ्या योजना उपलब्ध आहेत. गेल्या काही वर्षांत नवीन थीम आधारित मॅन्युफॅक्चरिंग, डिफेन्स, डिजिटल इंडिया, पॉवर, इन्फ्रास्ट्रक्चर आदी अपॉर्च्युनिटीज फंडस् बाजारात आले असून, त्यांच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली आहे.
मेक इन इंडिया, डिजिटलायझेशन आणि पायाभूत सुविधांच्या माध्यमातून भारत वेगाने वाटचाल करत आहे. भारताच्या विकासाच्या केंद्रस्थानी असलेल्या विकासाभिमुख संकल्पनांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या थिमॅटिक इक्विटी फंडांनी अडीच दशकांहून अधिक काळ आधारभूत निर्देशांकाला मागे टाकणारी सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे. गेल्या ३ ते ५ वर्षांच्या कालावधीत सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या आणि सर्वाधिक नवीन निधी (एनएफओ) आकर्षित करणाऱ्या श्रेणींमध्ये थीमॅटिक इक्विटी फंड पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. फ्लेक्सी कॅप फंड्सच्या खालोखाल संपूर्ण इक्विटी म्युच्युअल फंड श्रेणीमध्ये थीमॅटिक आणि सेक्टरल फंडस्ने संकलित केलेला निधी (एएमयू) हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा आहे. एकूण इक्विटी मार्केटमध्ये या फंडाचा वाटा सुमारे १५ टक्क्यांवर पोहोचला आहे.
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडस् इन इंडियाच्या (अँम्फी) जून २०२६ च्या आकडेवारीनुसार सेक्टरल आणि थिमॅटिक फंडस्ची निव्वळ एकत्रित गुंतवणूक (एएमयू) ५.४७ लाख कोटी रुपये इतक्या प्रचंड प्रमाणावर पोहोचली आहे. फ्लेक्सी कॅप फंडस्नंतर (५.८१ लाख कोटी रु.) हा भारतातील दुसरा सर्वात मोठा इक्विटी म्युच्युअल फंड प्रकार ठरला आहे.
लक्षणीय कामगिरीमुळे प्रकाशझोतात
गेल्या ५ वर्षांत (२०२१ ते २०२६) भारतीय शेअर बाजाराच्या उलाढालीत झालेली मोठी वाढ आणि केंद्र सरकारचे संरक्षण, उत्पादन, पायाभूत सुविधा यासारख्या क्षेत्रांना धोरणात्मक प्राधान्य यामुळे या फंडस्नी संमिश्र पण लक्षणीय कामगिरी केली आहे. गेल्या ५ वर्षांत बाजारातील विविध थीम्स विशेषतः वीज, इन्फ्रास्ट्रक्चर, संरक्षण आणि मॅन्युफॅक्चरिंग या सेक्टोरल/थिमॅटिक संकल्पांनानी ऐतिहासिक परतावा दिला आहे.
अनेक योजनांनी या काळात बाजारातील लार्ज कॅपला मागे टाकले आहे. या श्रेणीतील आघाडीच्या थिमॅटिक फंडस्नी गेल्या ५ वर्षांत सरासरी १८ ते २५ टक्के वार्षिक चक्रवाढ परतावा दिला आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल इंफ्रास्ट्रक्टर फंड, निप्पॉन इंडिया पॉवर अँड इंफ्रा फंड आणि क्वॉट इन्फ्रास्ट्रक्टर फंड यांनी दीर्घ मुदतीत उत्कृष्ट परतावा म्हणजे दुहेरी अंकात सरासरी १५ टक्क्यांचा परतावा दिलेला आहे. मात्र, काही विशिष्ट थीम्स (उदा. कमोडिटीज किंवा आयटी) मंदीच्या काळात मागेही पडल्या आहेत. डिफेन्स आणि मॅन्युफॅक्चरिंग थीम्सने गेल्या ३ ते ५ वर्षांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट ते तिप्पट करून दिले आहेत. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मॅन्युफॅक्चरींग आणि एसबीआय इनोव्हेटीव्ह ऑपॉर्च्युनिटीज फंडांनी गुंतवणूकदारांना मालामाल केलेले आहे. एसबीआय पीएसयू फंड, आदित्य बिर्ला सनलाईफ पीएसयू इक्विटी फंडांनी दुहेरी अंकात परतावा देत गुंतवणूकदारांना खूष केलेले आहे.
इन्फ्रास्ट्रक्चर आणि पॉवर थीम्सने देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाचा वेग वाढल्यामुळे या फंड्सने उच्च दुहेरी अंकात परतावा दिला आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात टाटा डिजिटल फंड आणि आयसीआयसीआय प्रुडेन्शियल फंड टेक्नॉल़ॉजी फंड यांनी दुहेरी अंकात परतावा दिलेला आहे. आता तर हे फंड आगामी काळाचे स्टार ठरणार आहेत. एआयमुळे हे फंड पुन्हा प्रकाशझोतात आले आहेत. भारतात विशिष्ट क्षेत्रावर आधारित फंड्स १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात सुरू झाले. उदाहरणार्थ, १९९९ मध्ये आलेला 'आयक्युआय प्रुडेन्शियल इंफ्रास्ट्रक्चर फंड किंवा तत्सम इन्फ्रास्ट्रक्चर आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रावर आधारित फंडस्नी याची पायाभरणी केली. सुरुवातीला हे फंडस् वेगवेगळ्या नावांनी विकले जात होते. परंतु, ऑक्टोबर २०१७ मध्ये सेबीने म्युच्युअल फंडस्च्या फेररचनेचे नियम जारी केले. या नियमांनुसार २०१८ पासून अधिकृतपणे 'सेक्टरल आणि थिमॅटिक फंडस्' हा एक स्वतंत्र वर्ग तयार करण्यात आला. गेल्या ३ ते ५ वर्षांच्या कालावधीत सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या आणि सर्वाधिक नवीन निधी (एनएफओ) आकर्षित करणाऱ्या श्रेणींमध्ये हा वर्ग पहिल्या क्रमांकावर राहिला आहे.
वैशिष्टपूर्ण संकल्पनाआधारे गुंतवणूक करणाऱ्या थिमॅटिक इक्विटी म्युच्युअल फंड्सपैकी भारतातील सर्वाधिक जुना असलेल्या ‘फ्रँकलिन इंडिया ऑपॉर्च्युनिटीज फंड’ने आपला २६ वा वर्धापनदिन साजरा करताना यशाचा दुहेरी टप्पा सर केला आहे. एकीकडे २६ वर्षांची प्रदीर्घ वाटचाल आणि दुसरीकडे गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या एकूण निधीने (एयूएम) तब्बल ९,१०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. टेम्पलटन ग्लोबल इन्व्हेस्टमेंटस्च्या इंडिया इक्विटीजचे पोर्टफोलिओ मॅनेजर किरण सेबॅस्टियन यांच्या मते, भारत आपल्या आर्थिक परिवर्तनाच्या पुढच्या टप्प्यात प्रवेश करत असताना आपल्या सर्वांना उत्पादन क्षेत्रातील वाढ, ग्राहकांच्या वाढत्या महत्त्वाकांक्षा आणि वेगाने होणारा डिजिटलचा स्वीकार या बदलांमुळे उत्तम आणि आकर्षक संधी निर्माण होताना दिसत आहेत. या दीर्घकालीन रचनात्मक तसेच पायाभूत बदलांचा फायदा घेऊ शकणारे दर्जेदार उद्योग क्षेत्र शोधण्यावर या फंडने आपले लक्ष केंद्रित केलेले दिसून येत आहे.
बाजाराच्या विविध चढ-उतारांच्या प्रवाहांमध्ये गुंतवणुकीत टिकून राहण्याचे फायदे
या फंड योजनेने शेअरबाजाराच्या विविध चढ-उतारांच्या चक्रांमध्ये आधारभूत निर्देशांक 'निफ्टी ५००' पेक्षा सरस कामगिरी करताना गुंतवणूकदारांसाठी दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचा मजबूत कामगिरीचा इतिहास आपल्या नावावर नोंदविला आहे. फंडच्या आरंभी १०,००० रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली असती तर १३.१४ टक्के चक्रवाढ वृध्दीदराने तिचे मूल्य आजच्या घडीला तब्बल २५ पटीने वाढून अंदाजे २.५९ लाख रुपये झाले असते. त्याचप्रमाणे फंडाच्या पहिल्या महिन्यापासून दरमहा १०,००० रुपयांची एसआयपी केली असती, तर आज अंदाजे ४.२१ कोटी रुपयांचा निधी जमा झाला असता. यातून शिस्तबद्ध गुंतवणूकीचे महत्त्व स्पष्ट होते, तसेच दीर्घकालीन चक्रवाढीची ताकद दिसून येते. फंडाचा दीर्घकालीन संपत्ती निर्मितीचा इतिहास बाजाराच्या विविध चढ-उतारांच्या प्रवाहांमध्ये गुंतवणुकीत टिकून राहण्याचे फायदे स्पष्ट करतो.
गत तीन वर्षांत सरस कामगिरीत आघाडीवर राहिलेल्या एलआयसी इंफ्रास्ट्रक्चर फंडाने २५.०७ टक्के तर सरकारी कंपन्यांत गुंतवणूक करणाऱ्या एसबीआय पीएसयू फंडाने २३.९३ टक्के परतावा दिला आहे. तर आदित्य बिर्ला सनलाईफ पीएसयू इक्विटी फंडानेसुध्दा सरकारी कंपन्यात गुंतवणूक करत २३.१४ टक्के परतावा दिला आहे. निप्पॉन इंडिया पॉवर अँड इंफ्रा फंडाने २१.१५ टक्के परतावा दिलेला आहे. डीएसपी टायगर इंडिया फंडाने पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रातील कंपन्यात गुंतवणूक करत २२.१७ टक्के परतावा दिलेला आहे. ‘निप्पॉन इंडिया पॉवर अँड इंफ्रा’ने २१.१५ टक्के परतावा दिला आहे. त्यामुळे या फंडाचा गुंतवणूकदारांनी अवश्य विचार करावा.
भारताच्या दीर्घकालीन विकास संकल्पनांमध्ये गुंतवणूक
थिमॅटिक फंडांची संकल्पनाधारीत गुंतवणूक चौकट खालील मुद्यांभोवती गुंफली गेलेली आहे.
मेक इन इंडिया : नव्याने उदयास येत असलेले इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्र, लष्करी साहित्य खरेदीचे स्वदेशीकरण, ऊर्जाक्षेत्राशी संबंधित नवीन मूल्यसाखळी, अतिअचूक अभियांत्रिकी उपकरणे यासारख्या संकल्पनांशी निगडीत असलेल्या कंपन्या यांचा समावेश होतो.
वाढती समृध्दी : लोकांच्या खर्च करण्यायोग्य उत्पन्नात वाढ झाल्यामुळे बदलणाऱ्या ग्राहकांच्या पसंतीनुरूप काम करणाऱ्या किंवा त्यांच्याशी सुसंगत असलेल्या कंपन्या, मार्केट कंपन्या, ऑनलाईन शॉपिंग साईटस्, इ.चा समावेश आहे. डिजिटलायझेशन : भारतात वेगाने होत असलेल्या डिजिटल परिवर्तनाला चालना देणारे किंवा त्या डिजिटल परिवर्तनाचा थेट फायदा मिळवणारे उद्योग/व्यवसाय इ.