TCS Layoffs Continue 2026: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसमध्ये सुरू असलेली कर्मचारी कपात अजून थांबलेली नाही. AI मुळे सुरू झालेली ही कपात 2026 मध्येही सुरू राहू शकते, असे स्पष्ट संकेत कंपनीने दिले आहेत. त्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.
टीसीएसने तिसऱ्या तिमाहीचे (Q3) निकाल जाहीर केल्यानंतर सांगितले की, सध्या सुरू असलेल्या पुनर्रचना प्रक्रियेअंतर्गत कर्मचारी कपातीची प्रक्रिया पुढील तिमाहीतही सुरू राहील. प्रत्येक कर्मचाऱ्याला कामावरुन काढून टाकताना त्याला कारण दिले जाणार आणि कर्मचारी कपातीचे नियम पाळले जाणार, असेही कंपनीने सांगितले आहे.
मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, टीसीएसच्या सुदीप कुन्नुमल यांनी सांगितले की, ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत सुमारे 1,800 कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकले. मात्र, कंपनीच्या अधिकृत पत्रकानुसार, दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत एकूण कर्मचारीसंख्येत तब्बल 11 हजारांहून अधिक घट झाली आहे.
याचा अर्थ असा की, या कालावधीत काही कर्मचाऱ्यांना थेट कामावरून कमी करण्यात आले, तर अनेक कर्मचाऱ्यांनी स्वतःहून नोकरी सोडली. या रिक्त जागा पुन्हा भरल्या न गेल्याने एकूण कर्मचारीसंख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीत टीसीएसमधील कर्मचारीसंख्या 11,151 ने कमी झाली. त्यामुळे डिसेंबरअखेरीस कंपनीत 5,82,163 कर्मचारी होते, जे मागील तिमाहीत 5,93,314 होते. सलग दुसऱ्या तिमाहीत ही घट झाली आहे.
सप्टेंबर तिमाहीतही सुमारे 19,755 कर्मचाऱ्यांची कपात केली होती. त्यामुळे मागील सहा महिन्यांत एकूण सुमारे 30 हजार कर्मचारी टीसीएसमधून बाहेर पडल्याचे चित्र आहे.
सध्या आयटी क्षेत्रात AI साधनांचा वापर वाढत असल्याने नोकरकपात होत असल्याचे चित्र आहे. मात्र, ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या एका अहवालानुसार, अनेक कंपन्या AI पेक्षा कमी कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काढून टाकत आहेत. खर्च कमी करणे आणि कार्यक्षमता वाढवणे यासाठी कर्मचारी कपात केली जात आहे.
टीसीएसने मात्र अशा कोणत्याही कारणाची अधिकृत माहिती दिलेली नाही. कंपनीचा दावा आहे की, प्रत्येक निर्णय वैयक्तिक कामगिरी आणि गरजेनुसार घेतला जात आहे.
टीसीएसमध्ये वर्क फ्रॉम ऑफिसचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. काही कर्मचाऱ्यांनी आवश्यक ऑफिसचे दिवस पूर्ण न केल्यामुळे त्यांच्या वार्षिक मूल्यांकनावर (appraisal) स्थगिती आल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
सतत कमी होत चाललेली कर्मचाऱ्यांची संख्या, नोकरकपातीचे संकेत, कडक हजेरीचे नियम आणि रखडलेली मूल्यांकन प्रक्रिया यामुळे टीसीएसमधील अनेक कर्मचारी सध्या तणावात आहेत. 2026 मध्ये ही स्थिती आणखी बिघडणार का? याकडे संपूर्ण आयटी क्षेत्राचे लक्ष आहे.