कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील (ईपीएफ) व्याज संबंधित कर नियमांमध्ये 2021 मध्ये एक मोठा बदल करण्यात आला. हा बदल प्रामुख्याने ईपीएफमध्ये मोठ्या प्रमाणात जमा करून कर सवलतीचा लाभ घेत असलेल्या कर्मचार्यांना लक्षात घेऊन करण्यात आला आहे.
बदललेल्या नियमांनुसार एखाद्या कर्मचार्याचे ईपीएफमध्ये वार्षिक योगदान 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर या अतिरिक्त रकमेवरील व्याज करपात्र आहे. त्यापूर्वी, ईपीएफवर मिळणारे संपूर्ण व्याज करमुक्त होते. हा बदल 2021 च्या अर्थसंकल्पात घोषित करण्यात आला आणि 1 एप्रिल 2021 पासून लागू झाला होता. या नियमानुसार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना प्रत्येक कर्मचार्यासाठी दोन खाती तयार करतात. 2.5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम आणि त्यावर मिळणारे व्याज पहिल्या खात्यात ठेवले जाईल, जे पूर्णपणे करमुक्त असेल. 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम आणि त्यावर मिळणारे व्याज दुसर्या खात्यात ठेवले जाईल, जे करपात्र असेल. हे करपात्र व्याज कर्मचार्यांच्या एकूण उत्पन्नात जोडले जाईल आणि त्यांच्या कर स्लॅबनुसार कर आकारला जाईल.
2021 मध्ये बदललेल्या नियमानुसार, कर्मचार्याचे करपात्र व्याज 5,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास त्यावर टीडीएस (टॅक्स डिडक्टेड अॅट सोर्स) कापला जाईल. पॅन कार्ड लिंक केले असेल, तर टीडीएस दर 10 टक्के असेल, तर जर पॅन कार्ड लिंक नसेल, तर दर 20 टक्केे असेल.
समजा, एखाद्या कर्मचार्याचे वार्षिक योगदान 4 लाख रुपये आहे आणि ईपीएफवर 8 टक्के व्याजदर आहे. 2.5 लाख रुपयांच्या पहिल्या योगदानावर 20,000 रुपयांचे व्याज करमुक्त असेल. 1.5 लाख रुपयांच्या उर्वरित योगदानावरील 12,000 रुपयांचे व्याज करपात्र असेल. हे करपात्र व्याज कर्मचार्यांच्या एकूण उत्पन्नात जोडले जाईल आणि त्यांच्या कर स्लॅबनुसार कर आकारला जाईल.
नवीन नियमापूर्वी ईपीएफवर मिळणारे संपूर्ण व्याज करमुक्त होते. त्यामुळे कर्मचार्यांची मोठी बचत झाली; परंतु 2021 नंतर 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त योगदानावरील व्याज करपात्र होईल. हा बदल विशेषत: उच्च उत्पन्न श्रेणीतील कर्मचार्यांवर परिणाम करतो, जे ईपीएफमध्ये मोठी रक्कम जमा करतात.
ईपीएफमध्ये मोठी रक्कम जमा करून कर लाभ मिळवणार्या उच्च उत्पन्न गटातील लोकांना लक्ष्य करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. कर प्रणाली अधिक संतुलित करण्यासाठी आणि समानता आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले.
तुम्हाला अतिरिक्त कर टाळायचा असेल, तर ईपीएफमध्ये गुंतवणूक करताना तुमचे योगदान 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसेल याची खात्री करावी लागेल, तसेच टीडीएस टाळण्यासाठी तुमचे पॅन कार्ड लिंक करणे खूप महत्त्वाचे आहे.