Tata Sons AGM: भारताच्या सर्वात मोठ्या उद्योगसमूहांपैकी एक असलेल्या टाटा ग्रुपची होल्डिंग कंपनी टाटा सन्सची वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजेच AGM रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घडामोडीचा संबंध सर रतन टाटा ट्रस्टशी संबंधित एका निर्बंधाशी असल्याचे सांगितले जात आहे.
ही AGM अशा वेळी रद्द झाली आहे, जेव्हा टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता टाटा सन्सच्या पुढील अध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
टाटा सन्समध्ये सुमारे 66 टक्के हिस्सा असलेल्या टाटा ट्रस्ट्सची या निवड प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका असणार आहे. टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा असल्याने, पुढील अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत त्यांचे महत्त्व वाढले आहे.
मात्र, टाटा सन्सच्या पुढील अध्यक्षाची निवड केवळ एका व्यक्तीच्या निर्णयावर होणार नाही. कंपनीच्या नियमांनुसार आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनच्या ठरलेल्या प्रक्रियेनुसारचं केली जाणार आहे.
दरम्यान, मे महिन्यात झालेल्या टाटा सन्सच्या बोर्ड बैठकीत एन. चंद्रशेखरन यांनी समूहाच्या नव्या व्यवसायांची कामगिरी आणि भविष्यातील योजनांबाबत माहिती दिली होती. इलेक्ट्रॉनिक्स आणि विमान वाहतूक क्षेत्रासह विविध व्यवसायांच्या वाढीसाठी किती भांडवल लागेल, यावरही चर्चा झाली होती.
या बैठकीत नोएल टाटा यांनी काही व्यवसायांबाबत चिंता व्यक्त केल्याचे समोर आले होते. विशेषतः एअर इंडिया आणि बिगबास्केटच्या तोट्याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. दुसरीकडे, टाटा इलेक्ट्रॉनिक्सची कामगिरी तुलनेने सकारात्मक असल्याचे चर्चेतून पुढे आले.
नोएल टाटा यांच्यासाठीही पुढील काही महिने महत्त्वाचे ठरणार आहेत. नोव्हेंबरमध्ये वयाची 70 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ते सहा टाटा कंपन्यांच्या संचालक मंडळातून निवृत्त होणार आहेत. यामध्ये ट्रेंट, टाटा स्टील, टायटन, व्होल्टास, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन आणि टाटा इंटरनॅशनल या कंपन्यांचा समावेश आहे. मात्र, ते टाटा सन्सच्या बोर्डावर संचालक म्हणून कायम राहतील.
एन. चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने विमान वाहतूक, इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टरसारख्या क्षेत्रांत मोठा विस्तार केला आहे. आता त्यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या शोधाची प्रक्रिया सुरू झाल्याने टाटा समूहाच्या नेतृत्वातील बदलाकडे उद्योगविश्वाचे लक्ष लागले आहे. या प्रक्रियेत टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष आणि टाटा सन्सचे संचालक म्हणून नोएल टाटा यांची भूमिका विशेष महत्त्वाची आहे.