Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Today: अमेरिका-इराण करारानंतरही शेअर बाजारात उत्साह नाही; निफ्टीची घसरणीसह सुरुवात, गुंतवणूकदार सावध

Stock Market Today: अमेरिका-इराण करारानंतर आशियाई बाजारांमध्ये तेजी दिसून आली असली, तरी भारतीय शेअर बाजाराने सावध सुरुवात केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Stock Market Today: अमेरिका आणि इराण यांच्यात महत्त्वाचा करार झाल्याने जागतिक बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असले, तरी भारतीय शेअर बाजाराने मात्र त्याला फारसा प्रतिसाद दिलेला नाही. गुरुवारी बाजाराची सुरुवात किंचित घसरणीसह झाली. निफ्टी 12 अंकांनी घसरून 24,073 वर, तर सेन्सेक्स 24 अंकांच्या घसरणीसह 77,131 वर उघडला.

विशेष म्हणजे, आशियाई बाजारांमध्ये मात्र या कराराचे सकारात्मक पडसाद उमटले. जपानचा निक्केई निर्देशांक जवळपास 1.75 टक्क्यांनी तर दक्षिण कोरियाचा कोस्पी सुमारे 1.5 टक्क्यांनी वधारला. त्याच्या तुलनेत भारतीय बाजारात गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले.

गेल्या चार सत्रांपासून भारतीय बाजारात तेजीचे वातावरण आहे. बुधवारी निफ्टी 96 अंकांनी वधारून 24,085 वर बंद झाला होता, तर सेन्सेक्सने 347 अंकांची वाढ घेत 77,155 चा टप्पा गाठला होता. त्यामुळे काही गुंतवणूकदार नफा वसुलीकडे वळल्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतही घसरण झाली असून ब्रेंट क्रूडचा भाव 78 डॉलरच्या आसपास आहे. भारतासाठी ही सकारात्मक बाब मानली जात आहे. मात्र रुपयाने आज घसरणीसह सुरुवात केली. डॉलरच्या तुलनेत रुपया 13 पैशांनी घसरून 94.66 वर उघडला.

परदेशी गुंतवणूकदारांच्या (FII) हालचालीकडे पाहिले असता, बुधवारी त्यांनी रोख बाजारात 101 कोटी रुपयांची किरकोळ खरेदी केली. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) तब्बल 1,561 कोटी रुपयांची खरेदी केली.

अमेरिका-इराण करारातील महत्त्वाचे मुद्दे

या करारानुसार दोन्ही देशांनी संघर्ष थांबवण्यास सहमती दर्शवली आहे. पुढील 60 दिवसांत अणु कार्यक्रमावर अंतिम करार होण्याची शक्यता आहे. अमेरिकेने निर्बंध हटवण्याची आणि सैन्य मागे घेण्याची तयारी दर्शवली असून, इराणने होर्मूज सामुद्रधुनीतून जहाजांची सुरक्षित वाहतूक करण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय इराणच्या आर्थिक विकासासाठी मोठ्या गुंतवणुकीचीही चर्चा आहे.

पुढे काय?

बाजार तज्ज्ञांच्या मते, अमेरिका-इराण करारामुळे जागतिक स्तरावरील सर्वात मोठा धोका काही प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीवरील दबाव कमी होण्यास मदत होईल. तसेच परदेशी गुंतवणूकदारांची विक्रीही कमी होण्याची शक्यता आहे.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर कायम ठेवले असले तरी महागाईबाबत सावध भूमिका घेतली आहे. त्यामुळे जागतिक बाजारातील अस्थिरता पूर्णपणे संपलेली नाही.

निफ्टीसाठी महत्त्वाची पातळी कोणती?

तांत्रिक विश्लेषकांच्या मते, निफ्टीसाठी 24,125 ते 24,250 हा महत्त्वाचा रेझिस्टंट आहे. या पातळीच्या वर बंद झाल्यास बाजारात नव्या तेजीची सुरुवात होऊ शकते आणि निफ्टी 24,500 च्या दिशेने वाटचाल करू शकतो.

दुसरीकडे, 23,900 हा निफ्टीसाठी महत्त्वाचा आधार मानला जात आहे. त्यामुळे सध्या बाजारात "Buy on Dips" म्हणजेच घसरणीत खरेदी करण्याची रणनीती फायदेशीर ठरू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

एकूणच, अमेरिका-इराण करारामुळे जागतिक बाजारातील चिंता कमी झाली असली, तरी भारतीय गुंतवणूकदार अजूनही पुढील संकेतांची वाट पाहत आहेत. त्यामुळे निफ्टी 24,125 चा अडथळा पार करतो की पुन्हा नफा वसुलीचा दबाव वाढतो, याकडे बाजाराचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT