पुढारी ऑनलाईन डेस्क : ट्रम्प ‘टॅरिफ’च्या (Trump Tariffs) सोमवारच्या जबरदस्त तडाख्यातून मंगळवारी भारतीय शेअर बाजार सावरला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ( Stock Market) १,२०० अंकांनी वाढून ७४,३४० वर पोहोचला. तर निफ्टी ५० निर्देशांक (Nifty 50) ३५० हून अधिक अंकांनी वाढून २२,५४० वर व्यवहार करत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चुकीच्या टॅरिफ शुल्काचे तीव्र पडसाद सोमवारी भारतीय शेअर बाजारात उमटले होते. सेन्सेक्स २,२२६ आणि निफ्टी निर्देशांक ७४२ अंकांनी घसरून बंद झाला होता. निर्देशांकांतील गेल्या दहा महिन्यांतील ही सर्वात मोठी घसरण ठरली. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या खिशाला तब्बल १४ लाख कोटी रुपयांची झळ बसली. सोबतच, जगभरातील प्रमुख शेअर बाजारांनाही ‘ट्रम्प इफेक्ट’चा जबरदस्त तडाखा बसला.
Nifty Midcap 100 आणि Nifty Smallcap 100 हे निर्देशांक प्रत्येकी २ टक्के वाढले आहेत. सर्व क्षेत्रीय निर्देशांकही तेजीत खुले झाले आहेत. निफ्टी रियल्टी, मेटल आणि आयटी निर्देशांक ३ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. बीएसई मिडकॅप १.८ टक्के आणि स्मॉलकॅप १.९ टक्के वाढला आहे.
आज सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सवर टायटनचा शेअर्स ५ टक्के वाढला. त्याचबरोबर अदानी पोर्ट्स, टाटा स्टील, ॲक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट, एसबीआय, टाटा मोटर्स, बजाज फायनान्स, एलटी, इन्फोसिस हे शेअर्स २ ते ३ टक्क्यांनी वाढले आहेत. एकमेव टीसीएसचा शेअर्स घसरला आहे.
अमेरिका ९० दिवसांनी शुल्क लागू करण्याचा विचार करत असल्याच्या एका रिपोर्टनंतर अमेरिकेतील शेअर्स बाजारात संमिश्र परिस्थिती दिसून आली. डाऊ जोन्स ०.९१ टक्के घसरला. एस अँड पी ५०० निर्देशांक ०.२३ टक्के घसरला. तर नॅस्डॅक कंपोझिट सपाट पातळीवर स्थिरावला. दरम्यान, आशियाई बाजारात मंगळवारी तेजी दिसून आली. जपानचा निक्केई निर्देशांकाने सुमारे ६ टक्क्यांची वाढ नोंदवली. विशेष म्हणजे गेल्या सत्रातील निचांकी पातळीवरून ही वाढ झाली.