Stock Market Closing updates
मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेला भू-राजकीय तणाव, कार्पोरेट कंपन्यांची अपेक्षेपेक्षा कमी कमाई आदी घटकांमुळे गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतलाय. परिणामी, आज शुक्रवारी सलग दुसऱ्या सत्रात भारतीय शेअर बाजार घसरला.
आजच्या सत्रात सेन्सेक्स सुमारे १,१०० अंकांनी घसरला. तर निफ्टी ५० निर्देशांक २३,९०० पर्यंत खाली आला. त्यानंतर दोन्ही निर्देशांक काही प्रमाणात सावरले. सेन्सेक्स ५८८ अंकांनी घसरून ७९,२१२ वर बंद झाला. निफ्टी २०७ अंकांनी घसरून २४,०३९ वर स्थिरावला.
१३ क्षेत्रीय निर्देशांकांपैकी १२ निर्देशांक लाल रंगात बंद झाले. फार्मा, मेटल आणि ऑटो शेअर्समध्ये अधिक घसरण दिसून आली. तर आयटी निर्देशांकाची कामगिरी राहिली. बीएसई मिडकॅप २.४ टक्के आणि स्मॉलकॅप २.५ टक्के घसरला.
बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २५ एप्रिल रोजी ८.८ लाख कोटींनी कमी होऊन ४२०.८३ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले. २४ एप्रिल रोजी बाजार भांडवल ४२९.६३ लाख कोटी रुपयांवर होते. याचाच अर्थ गुंतवणूकदारांच्या कमाईत आज ८.८ लाख कोटी रुपयांची घट झाली.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terror Attack) २६ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे बाजारातील गुंतवणूकदारांचा जोखीम टाळण्याकडे कल दिसून आला. तसेच काही प्रमाणात प्रॉफिट बुकिंग झाल्याने बाजारात घसरण झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
आज बँकिंग आणि फायनान्सियल शेअर्समध्ये अधिक घसरण झाली. सेन्सेक्सवर अदानी पोर्ट्सचा शेअर्स ३.६ टक्के घसरला. ॲक्सिस बँक, Eternal, बजाज फिनसर्व्ह, पॉवर ग्रिड, बजाज फायनान्स, टाटा मोटर्स, टाटा स्टील, एनटीपीसी, मारुती, एसबीआय, भारती एअरटेल हे शेअर्सही १ ते ३.५ टक्क्यांपर्यंत घसरले. तर टीसीएस, इन्फोसिस, टेक महिंद्रा हे शेअर्स तेजीत राहिले.
बँकिंग शेअर्सवर सलग तिसऱ्या दिवशी दबाव राहिला. गेल्या तीन दिवसांत निफ्टी बँक २ टक्केहून अधिक खाली आला आहे. २३ एप्रिल रोजी बँक निफ्टीने ५६ हजारांच्या अंकाला स्पर्श करुन नवा उच्चांक नोंदवला होता. पण आता विक्रीच्या दबावाने हा निर्देशांक ५५ हजारांच्या खाली घसरला. निफ्टी बँकवरील ॲक्सिस बँक, पीएनबी, फेडरल बँक, कॅनरा बँक, एसबीआय हे शेअर्स टॉप लूजर ठरले.