पुढारी ऑनलाईन डेस्क : आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी (दि.१२) शेअर बाजारात (Stock Market) विक्री कायम राहिली. सकाळी बाजार हिरव्या रंगात खुला झाला होता. पण आयटी शेअर्समधील मोठ्या विक्रीने बाजाराला खाली ओढले. दरम्यान, सेन्सेक्स ७२ अंकांनी घसरून ७४,०२९ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक (Nifty) २७ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २२,४७० वर स्थिरावला.
अमेरिकेतील आर्थिक स्थितीबद्दलची चिंता, आयात शुल्क लागू करण्याच्या घोषणा आणि त्याचे संभाव्य परिणाम यामुळे बाजारातील भावना कमकुवत झाल्या आहेत. याचा सर्वाधिक फटका आयटी शेअर्संना बसला. निफ्टी आयटी २.९ टक्के घसरला. निफ्टी आयटीवरील एल अँड डी टेक्नॉलॉजीचा शेअर्स ५.४ टक्के घसरून टॉप लूजर ठरला. त्याचबरोबर इन्फोसिसचा शेअर्स ४.२ टक्के घसरला. LTIMindtree, विप्रो, कोफोर्ज हे शेअर्स प्रत्येकी ३ टक्के घसरले.
पीएसयू बँक आणि मेटल शेअर्समध्येही दबाव दिसून आला. बीएसई मिडकॅप ०.५ टक्के आणि स्मॉलकॅप ०.४ टक्के घसरला.
फायनान्सियल आणि बँकिंग शेअर्समध्ये तेजी दिसून आली. इंडसइंड बँकेचा शेअर्स मंगळवारच्या २७ टक्क्यांच्या घसरणीतून सावरला. आज हा शेअर्स ४.४ टक्के वाढून बंद झाला. कोटक बँक, एचडीएफसी बँक हे शेअर्सही तेजीत राहिले.
सेन्सेक्सवर इन्फोसिस, टेक महिंद्रा, नेस्ले इंडिया, टीसीएस, एचसीएल टेक, एशियन पेंट्स, ॲक्सिस बँक, झोमॅटो, हिंदुस्तान युनिलिव्हर, एसबीआय हे शेअर्स १ ते ४ टक्क्यांपर्यंत घसरले. तर इंडसइंड बँकसह टाटा मोटर्स, कोटक बँक, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, आयटी, सन फार्मा हे शेअर्स तेजीत राहिले.