सेन्सेक्स- निफ्टी आज घसरणीसह बंद झाले. (file photo)
अर्थभान

सेन्सेक्स- निफ्टी घसरणीसह बंद, SmallCap शेअर्समध्ये खरेदी

Stock Market Today | बाजारात आज नेमकं काय घडलं?

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुरुवातीला तेजी आणि नंतर घसरण असे चढ-उताराचे वातावरण आज मंगळवारी (दि.१५) भारतीय शेअर बाजारात राहिले. विशेषतः आज रिलायन्स तसेच फायनान्सियल आणि आयटी शेअर्समध्ये घसरण दिसून आली. सेन्सेक्स १५२ अंकांनी घसरून ८१,८२० वर बंद झाला. तर एनएसई निफ्टी ७० अंकांच्या किरकोळ घसरणीसह २५,०५७ वर स्थिरावला.

क्षेत्रीय पातळीवर काय स्थिती?

क्षेत्रीय पातळीवर निफ्टी ऑटो निर्देशांक ०.८ टक्क्यांनी घसरला. निफ्टी आयटी निर्देशांक सुरुवातीला वाढला होता. पण त्यानंतर तो ०.३ टक्क्यांनी घसरून बंद झाला. रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर्स सुमारे २ टक्के घसरला. बीएसई मिडकॅप ०.२ टक्के आणि स्मॉलकॅप १ टक्के वाढून बंद झाला.

घसरणीचे कारण काय?

वाढत्या महागाईमुळे देशांतर्गत व्याजदर कपातीला विलंब होणार असल्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. परिणाम आज बाजारात घसरण झाली.

Sensex Today : कोणते शेअर्स घसरले?

सेन्सेक्सवर बजाज फायनान्स, रिलायन्स, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, इंडसइंड बँक, मारुती हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांपर्यंत घसरले. तर आयसीआयसीआय बँक, भारतीय एअरटेल, एशियन पेंट, एचसीएल टेक, अदानी पोर्ट्स हे शेअर्स तेजीत राहिले.

सेन्सेक्सवर बजाज फायनान्सचा शेअर्स टॉप लूजर ठरला.

एनएसई निफ्टीवर एचडीएफसी लाईफ, विप्रो, बजाज ऑटो, बजाज फायनान्स, हिंदाल्को हे शेअर्स २ ते ३ टक्क्यांनी घसरले. तर आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, बीपीसीएल, ब्रिटानिया, एशियन पेंट्स हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत वाढले.

एनएसई निफ्टी ७० अंकांच्या किरकोळ घसरणीसह २५,०५७ वर स्थिरावला.

Crude Oil Prices : कच्च्चा तेलाच्या दरात घसरण, 'हे' शेअर्स तेजीत

तेल उत्पादक देशांच्या संघटना ओपेकने मागणीबाबतचा अंदाज कमी केल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे ३ टक्क्यांनी घसरण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज पेंट आणि टायर कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. निफ्टीवर एशियन पेंटचा शेअर्स १ टक्के वाढला. त्याचबरोबर बर्गर पेंट्स, शालीमार पेंट्स या शेअर्समध्येही वाढ झाली. कच्च्या तेलाच्या दराचा सर्वाधिक परिणाम डेकोरेटिव्ह पेंट व्यवसायावर पडतो. मंगळवारी सकाळच्या व्यवहारात डिसेंबर ब्रेंट ऑइल फ्यूचर्सचा दर ३ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ७५.१३ डॉलरवर होता. तर वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटवर नोव्हेंबर क्रूड ऑइल फ्यूचर्सचा दर ३ टक्क्यांनी घसरून ७१.५९ डॉलवर होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT