Stock Market Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. सोमवारच्या सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टीने जोरदार वाढ केली. मात्र, काही वेळातच गुंतवणूकदारांनी नफा वसुली सुरू केल्याने बाजारातील तेजी ओसरली. विशेष म्हणजे, बँक निफ्टीने सुरुवातीला 65 हजारांचा टप्पा ओलांडत नवा उच्चांक गाठला होता. त्यानंतर त्यातही मोठी घसरण झाली.
शेअर बाजारातील महत्त्वाचे अपडेट्स
सोमवारी बाजार उघडताच निफ्टी 128 अंकांच्या वाढीसह 25,929 वर पोहोचला.
सेन्सेक्स 502 अंकांच्या वाढीसह 84,421 वर उघडला.
बाजारातील सुरुवातीच्या तेजीमुळे गुंतवणूकदारांना तब्बल 2.4 लाख कोटी रुपयांचा फायदा झाला.
बीएसईवर नोंदणीकृत कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य 516.6 लाख कोटी रुपयांवर पोहोचले.
बँक निफ्टीने 65 हजारांचा टप्पा ओलांडत ऐतिहासिक उच्चांक गाठला.
मात्र, सुरुवातीच्या व्यवहारानंतर नफा वसुली सुरू झाली. निफ्टी 200 अंकांपेक्षा अधिक घसरून 25,600 च्या खाली आला.
बँक निफ्टीमध्येही 900 अंकांपेक्षा अधिक घसरण झाली आणि तो 64 हजारांच्या खाली घसरला.
गेल्या आठवड्यात निफ्टीमध्ये 2.6 टक्क्यांची वाढ
गेल्या शुक्रवारी निफ्टी 286 अंकांच्या वाढीसह 25,800 वर बंद झाला होता. संपूर्ण आठवड्याचा विचार करता निफ्टीमध्ये 2.6 टक्क्यांची वाढ झाली. विशेष म्हणजे, सलग चौथ्या आठवड्यात भारतीय शेअर बाजार सकारात्मक स्थितीत बंद झाला.
मात्र, छोट्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये काहीशी घसरण दिसली. मिडकॅप शेअर्स स्थिर राहिले, तर स्मॉलकॅप शेअर्समध्ये 0.8 टक्क्यांची घसरण झाली. बँकिंग क्षेत्रात सर्वाधिक 5.6 टक्क्यांची वाढ झाली. ऑटो आणि एफएमसीजी क्षेत्रातही तेजी होती. दुसरीकडे, कॅपिटल गुड्स आणि मेटल क्षेत्रातील शेअर्सवर दबाव दिसला.
जागतिक बाजारातील घसरणीचा परिणाम
अमेरिकेतील शेअर बाजारात मोठी विक्री झाल्याने जागतिक बाजारांमध्ये चिंता वाढली आहे. शुक्रवारी डाऊ जोन्स 2 टक्के, नॅस्डॅक 5.25 टक्के आणि S&P 500 जवळपास 3.75 टक्क्यांनी घसरला. त्याचा परिणाम आशियाई बाजारांवरही झाला. जपानचा निक्केई 5.4 टक्के, तर दक्षिण कोरियाचा कोस्पी 4.5 टक्क्यांनी घसरला.