Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; निफ्टी 25,323 वर, गुंतवणूकदारांना 1.2 लाख कोटींचा फटका

Stock Market Today: भारतीय शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात झाली. निफ्टी 64 अंकांनी घसरून 25,323 वर, तर सेन्सेक्स 155 अंकांनी घसरून 82,376 वर उघडला.

Rahul Shelke

Stock Market Today: आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. जागतिक बाजारातील नकारात्मक संकेत, अमेरिका आणि इराणमधील वाढता तणाव तसेच अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअर्समधील विक्रीमुळे भारतीय बाजारावर दबाव दिसून आला. बाजार सुरू होताच गुंतवणूकदारांचे सुमारे 1.2 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

बाजारातील महत्त्वाचे अपडेट्स

- निफ्टी आणि सेन्सेक्स घसरणीसह उघडले : आज सकाळी निफ्टी 64 अंकांच्या घसरणीसह 25,323 वर उघडला. तर सेन्सेक्समध्ये 155 अंकांची घसरण होऊन तो 82,376 वर उघडला.

- गुंतवणूकदारांचे 1.2 लाख कोटींचे नुकसान : बाजार सुरू होताच गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फटका बसला. बीएसईवर नोंदणीकृत कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य घसरून 509.3 लाख कोटी रुपयांवर आले.

- मंगळवारी बाजारात तेजी : याआधी सलग दुसऱ्या दिवशी भारतीय बाजारात तेजी होती. मंगळवारी निफ्टी 96 अंकांनी वाढून 25,387 वर बंद झाला. तर सेन्सेक्स 427 अंकांच्या वाढीसह 82,532 वर पोहोचला होता.

- अमेरिकन बाजारात मोठी घसरण : अमेरिकेतील कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाली. मंगळवारी डाऊ जोन्स 848 अंकांनी घसरला. मागील पाच महिन्यांतील नीचांकी पातळीवर तो बंद झाला. आशियाई बाजारांमध्येही संमिश्र चित्र दिसले. जपानचा निक्केई जवळपास एक टक्क्याने घसरला, तर दक्षिण कोरियाच्या कोस्पीमध्ये 0.35 टक्क्यांची वाढ झाली.

- अमेरिका-इराण तणावाचा बाजारावर परिणाम : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा वाढला आहे. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या पाच जहाजांना लक्ष्य केल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, इराणच्या आसपास अमेरिकेचे 50 हजारांहून अधिक सैनिक आणि अनेक युद्धनौका तैनात आहेत. या परिस्थितीमुळे जागतिक बाजारात अनिश्चितता वाढली आहे. दरम्यान, कच्च्या तेलाचे दर पुरवठा जास्त असल्यामुळे प्रति बॅरल 93 डॉलरच्या आसपास आहेत.

- FII आणि DII ची खरेदी : मंगळवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) भारतीय शेअर बाजारात 4,195 कोटी रुपयांची खरेदी केली. तर सलग 12 दिवस विक्री करणाऱ्या देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) 196 कोटी रुपयांची खरेदी केली.

- रुपया सात महिन्यांच्या उच्चांकावर : भारतीय रुपया सात महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. मात्र, डॉलर निर्देशांक 104 च्या जवळ गेल्याने उदयोन्मुख बाजारांवर दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे. सोने, चांदी, धातू आणि क्रिप्टोकरन्सीमधूनही गुंतवणूकदार पैसे काढत असल्याचे चित्र आहे.

निफ्टीसाठी महत्त्वाचे स्तर कोणते?

SAMCO Securities चे तांत्रिक विश्लेषक ओम मेहरा यांच्या मते, निफ्टीच्या चार्टवर तेजीचे संकेत दिसत आहेत. बाजाराचा मुख्य कल अजूनही मजबूत आहे.

  • निफ्टीसाठी पहिला आधार : 25,300

  • दुसरा आधार : 25,220

  • तेजी आल्यास पहिला अडथळा : 25,500

  • पुढील अडथळा : 25,600

जागतिक घडामोडी आणि परदेशी बाजारातील चढ-उतार यांचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम होत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे आजच्या व्यवहारांवर लक्ष असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT