Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Today: शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स 300 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदार चिंतेत, नेमकं काय घडलं?

Stock Market Today: आज शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली असून सेन्सेक्स 300 अंकांनी खाली आला. मध्यपूर्वेतील तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Stock Market Today: आज देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली असून गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण दिसून येत आहे. सकाळी व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स सुमारे 300 हून अधिक अंकांनी घसरून 76,900 च्या आसपास व्यवहार करत होता, तर निफ्टी 24,000 च्या खाली घसरला. बँक निफ्टीतही घसरण दिसून आली.

आजच्या घसरणीमागचं प्रमुख कारण म्हणजे जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेत आणि मध्यपूर्वेत वाढलेला तणाव. इराण आणि यूएईमधील संघर्ष तीव्र झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड जवळपास 114 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्याने भारतासारख्या आयात करणाऱ्या देशांवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.

सेक्टरनिहाय पाहिल्यास NBFC, प्रायव्हेट बँक आणि ऑटो क्षेत्रात सर्वाधिक घसरण दिसली. कोटक महिंद्रा बँक, भारती एअरटेल, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, ओएनजीसी आणि टीसीएस हे शेअर्स घसरले होते. तर दुसरीकडे Adani Ports, Eicher Motors, Reliance Industries आणि Adani Enterprises यांसारख्या काही शेअर्समध्ये वाढ दिसून आली.

जागतिक बाजारांचाही परिणाम भारतीय बाजारावर दिसत आहे. अमेरिकन बाजारात मोठी घसरण झाली असून डाऊ जोन्स, नॅस्डॅक आणि S&P 500 हे निर्देशांक लाल रंगात बंद झाले. त्याचबरोबर GIFT निफ्टीतही घसरण दिसून आली, ज्यामुळे भारतीय बाजारावर दबाव वाढला.

मध्यपूर्वेतील तणावामुळे गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चितता वाढली आहे. इराणने यूएईमधील तेल प्रकल्पांवर हल्ला केल्याच्या बातम्यांमुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. यामुळे जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, रुपयाची स्थितीही कमकुवत होत असून तो डॉलरच्या तुलनेत जवळपास विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. याचा आयात-आधारित कंपन्यांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

सकारात्मक बाब म्हणजे परदेशी गुंतवणूकदार (FII) काही दिवसांच्या विक्रीनंतर पुन्हा खरेदीकडे वळले आहेत, ज्यामुळे बाजाराला काही प्रमाणात आधार मिळू शकतो.

आता पुढील दिशा ठरवण्यात कच्च्या तेलाच्या किमती, जागतिक परिस्थिती आणि मोठ्या कंपन्यांचे येणारे निकाल महत्त्वाची भूमिका बजावतील. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सध्या सावध भूमिका घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT