Stock Market Today: भारतीय शेअर बाजाराची सुरुवात आज (11 नोव्हेंबर) सौम्य वाढीसह झाली. मात्र काही वेळातच बाजार घसरू लागला आणि सेंसेक्स 250 अंकांनी घसरून 83,247 च्या नीचांकावर पोहोचला. तर निफ्टी 75 अंकांनी घसरून 25,500 च्या खाली आला. बँक निफ्टीदेखील 150 अंकांनी घसरला.
आज सकाळी सेंसेक्स 136 अंकांनी वाढून 83,671 वर, निफ्टी 43 अंकांनी वाढून 25,617 वर उघडला. परंतु लवकरच विक्रीचा दबाव वाढला. सर्वच सेक्टर लाल रंगात गेले, फक्त आयटी इंडेक्स तेजीत होता. पीएसयू बँका आणि एनबीएफसी शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली.
अमेरिकेत सरकारी शटडाउन संपण्याची शक्यता आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार सवलतीच्या वक्तव्यामुळे जागतिक बाजारातील भावनांमध्ये सुधारणा झाली. ट्रम्प यांनी भारतावर लावलेले काही टॅरिफ कमी केले जातील, असे सांगितले आहे, ज्यामुळे भारत-अमेरिका व्यापारिक संबंधांबाबत सकारात्मक संकेत मिळाले आहेत.
परदेशी गुंतवणूकदारांनी (FIIs) शुक्रवारी कॅश मार्केटमध्ये ₹4,100 कोटींची विक्री केली. मात्र देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) सलग 51व्या दिवशी खरेदी करत ₹5,800 कोटींची गुंतवणूक केली. त्यामुळे बाजारातील घसरण मर्यादित राहिली.
आज बाजारात अनेक कंपन्यांचे तिमाही निकाल लक्षवेधी ठरले:
बजाज फायनान्सचे निकाल मिश्र राहिले.
ONGCची ऑपरेशनल कामगिरी अपेक्षेपेक्षा कमी होती.
HUDCOने दमदार निकाल सादर केला.
आज बजाज फायनसर्व्ह, भारत फोर्ज, बायोकॉन, कॉन्कोर, मॅक्स फायनान्शियल आणि टॉरेंट पॉवर यांच्या निकालांवर बाजाराची दिशा अवलंबून राहील.
आजपासून PhysicsWallah आणि Emmvee Photovoltaic Power या दोन कंपन्यांचे IPO उघडले, तर Pine Labsचा IPO आज बंद होत आहे. पाइन लॅब्सला अद्याप फक्त 54% सबस्क्रिप्शन मिळालं आहे.