Stock Market Today
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणांबाबतच्या सततच्या अनिश्चिततेचा परिणाम बुधवारी (दि. ९ जुलै) भारतीय शेअर बाजारावर झाला. यामुळे सेन्सेक्स- निफ्टी घसरले. सेन्सेक्स १७६ अंकांनी घसरून ८३,५३६ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक ४६ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २५,४७६ वर स्थिरावला. आयटी, ऑईल अँड गॅस शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली.
बाजारातील आजच्या घसरणीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल १.१० लाख कोटी कमी होऊन ते ४६१.३७ लाख कोटींपर्यंत खाली आले.
सेन्सेक्सवर एचसीएल टेक, टाटा स्टील, टेक महिंद्रा, रिलायन्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, एलटी, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, भारती एअरटेल, ट्रेंट हे शेअर्स ०.६ ते २ टक्क्यांपर्यंत घसरले. तर बजाज फायनान्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, अल्ट्राटेक सिमेंट, एम अँड एम, पॉवर ग्रिड, एशियन पेंट्स, आयटीसी हे शेअर्स ०.५ ते १.४ टक्क्यांपर्यंत वाढले.
सेक्टर्समध्ये निफ्टी ऑईल अँड गॅस निर्देशांक (Nifty Oil & Gas Index) १.२ टक्के घसरला. मेटल निर्देशांक १.४ टक्के आणि आयटी निर्देशांक जवळपास ०.८ टक्के घसरला. हिंदूस्तान कॉपर आणि वेदांता हे दोन्ही शेअर्स प्रत्येकी ३ टक्के घसरून निफ्टी मेटलवर टॉप लूजर्स ठरले. तर दुसरीकडे एफएमसीजी शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. यामुळे निफ्टी FMCG ०.८ टक्के वाढून बंद झाला.
भारत आणि अमेरिका यांच्यात होणाऱ्या ट्रेड डीलपूर्वी गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगली आहे. याचाही परिणाम बाजारात दिसून येत आहे.