Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी 22,964 वर, सेन्सेक्सही वधारला, पुढे काय होणार?

Stock Market Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात तेजीसह झाली. निफ्टी 28 अंकांनी वाढून 22,964 वर, तर सेन्सेक्स 48 अंकांनी वाढून 74,199 वर उघडला.

Rahul Shelke

Stock Market Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली आहे. शुक्रवारी (30 ऑक्टोबर) बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी आघाडी घेतली. निफ्टी 28 अंकांच्या वाढीसह 22,964 वर उघडला. तर सेन्सेक्स 48 अंकांच्या वाढीसह 74,199 वर पोहोचला.

मात्र, सुरुवातीच्या व्यवहारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये जवळपास अर्ध्या टक्क्यांची घसरण दिसून आली. त्यामुळे मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी असली, तरी छोट्या आणि मध्यम कंपन्यांमध्ये विक्रीचा दबाव कायम असल्याचे चित्र आहे.

याआधी गुरुवारी शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली होती. निफ्टी 238 अंकांच्या वाढीसह 22,937 वर बंद झाला होता. तर सेन्सेक्सने तब्बल 905 अंकांची झेप घेत 74,151 वर व्यवहाराची सांगता केली होती. गुरुवारी दिवसभरात निफ्टीने 22,656 चा नीचांक आणि 22,961 चा उच्चांक गाठला. या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल 4.7 लाख कोटी रुपयांची वाढ झाली होती.

आज बाजारात काय होणार?

आजच्या व्यवहारात आंतरराष्ट्रीय घडामोडींचा मोठा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढत असल्याने बाजारात चिंता निर्माण झाली आहे. त्यातच आठवड्याच्या शेवटी अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सावध भूमिका घेऊ शकतात.

दुसरीकडे, बाजारात मोठी घसरण झाल्यास खालच्या पातळीवरून पुन्हा खरेदी होण्याची शक्यता आहे. संभाव्य करकपातीच्या अपेक्षा आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांची (DIIs) खरेदी बाजाराला आधार देऊ शकते. याशिवाय आयटी क्षेत्रातील शेअर्समुळेही बाजाराला बळ मिळण्याची अपेक्षा आहे.

बाजाराला कोणाचा आधार?

गेल्या दोन आठवड्यांपासून किरकोळ गुंतवणूकदारांची भूमिका बाजारासाठी महत्त्वाची ठरत आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FIIs) आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार (DIIs) यांची खरेदी-विक्री तुलनेने मर्यादित आहे. बाजार घसरताना त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात विक्री होत नाही आणि तेजीच्या काळातही मोठी खरेदी दिसत नाही. गुरुवारच्या तेजीमध्येही या दोन्ही गटांची खरेदी कमी होती.

निफ्टीसाठी 22,800 महत्त्वाची पातळी

HDFC सिक्युरिटीजचे तांत्रिक विश्लेषक नागराज शेट्टी यांच्या मते, गुरुवारी निफ्टीने 22,800 च्या वर जाऊन महत्त्वाची पातळी पार केली आहे. त्यामुळे बाजारात खरेदीदारांचा जोर वाढल्याचे संकेत मिळत आहेत. निफ्टीची अल्पकालीन दिशा सकारात्मक दिसत आहे. मात्र, घसरण झाल्यास 22,800 ते 22,750 ही महत्त्वाची आधार पातळी ठरू शकते.

SAMCO सिक्युरिटीजचे ओम मेहरा यांनीही 22,800 ही निफ्टीसाठी महत्त्वाची पातळी असल्याचे सांगितले आहे. निफ्टीसाठी 22,700 वर पुढील आधार आहे. तर तेजी कायम राहिल्यास 23,000 वर पहिला अडथळा येऊ शकतो. त्यानंतर 23,200 ही पुढील महत्त्वाची पातळी असेल. त्यामुळे आजच्या व्यवहारात कच्च्या तेलाच्या किमती, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांची भूमिका यावर बाजाराची पुढील दिशा अवलंबून असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT