Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Today: शेअर बाजारात तेजीचा चौकार; निफ्टी 25,800च्या वर, IT–मेटल शेअर्स चमकले

Stock Market Today: सलग चौथ्या दिवशी शेअर बाजारात तेजी कायम असून निफ्टी 25,800 च्या वर उघडला आहे. IT आणि मेटल शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली, तर बँक निफ्टीत घसरण होत आहे.

Rahul Shelke

Stock Market Today: आज देशांतर्गत शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी कायम आहे. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी तेजीसह सुरुवात केली. निफ्टी 25,800 च्या वर उघडला, तर सेन्सेक्समध्येही सुरुवातीपासूनच खरेदीचा उत्साह दिसून आला. आयटी आणि मेटल क्षेत्रातील शेअर्समध्ये चमक पाहायला मिळाली.

सकाळी साडे नऊच्या सुमारास सेन्सेक्स सुमारे 90 अंकांच्या वाढीसह 83,825 च्या आसपास व्यवहार करत होता. निफ्टी 20 अंकांच्या तेजीसह 25,840 च्या पातळीवर व्यवहार करत होता. मात्र बँक निफ्टीमध्ये किंचित दबाव दिसून आला आणि तो 35 अंकांनी घसरून 61,515 च्या आसपास व्यवहार करत होता. एकूणच बाजारात मिश्र वातावरण होते. काही सेक्टरमध्ये चांगली खरेदी सुरू होती, तर काही क्षेत्रांमध्ये घसरण होत होती.

सेक्टोरल निर्देशांकांकडे पाहिल्यास आयटी, मेटल, हेल्थकेअर, फार्मा आणि ऑटो क्षेत्रात तेजी होती. याउलट मीडिया, रिअॅल्टी, एफएमसीजी, एनबीएफसी, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि खासगी बँकांमध्ये घसरण दिसून आली. त्यामुळे बाजाराचा एकंदर सूर सकारात्मक असला तरी गुंतवणूकदार सावध पवित्रा घेत असल्याचे चित्र आहे.

जागतिक बाजारांकडून संमिश्र संकेत मिळत आहेत. परदेशी गुंतवणूकदारांची जोरदार खरेदी, अमेरिकन बाजारातील तेजी आणि काही कमोडिटी दरांतील वाढ यामुळे भारतीय बाजाराला आधार मिळत आहे. मात्र कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेच्या आगामी धोरणाबाबत असलेली अनिश्चितता गुंतवणूकदारांना सतर्क करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त चलन बाजार बंद असले तरी इक्विटी बाजारात नियमित व्यवहार सुरू आहेत.

दरम्यान, गिफ्ट निफ्टीमध्येही हलकी वाढ दिसून आली. तो सुमारे 20 अंकांनी वाढून 25,850 च्या आसपास व्यवहार करत होता. यामुळे देशांतर्गत बाजारात तेजीसह सुरुवात होण्याचे संकेत आधीच मिळाले होते.

बाजारातील तेजीला सर्वात मोठा आधार परदेशी आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून मिळाला आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) कॅश मार्केट, इंडेक्स आणि स्टॉक फ्युचर्स मिळून जवळपास 2,700 कोटी रुपयांची खरेदी केली आहे. त्याचबरोबर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (डीआयआय) सलग पाचव्या दिवशी गुंतवणूक सुरू ठेवत सुमारे 440 कोटी रुपये बाजारात ओतले आहेत. एफआयआय आणि डीआयआय दोघांचीही सातत्यपूर्ण खरेदी बाजारातील सकारात्मक भावना मजबूत करणारी मानली जात आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे तेलाचे दर जवळपास 4 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 70 डॉलरच्या वर पोहोचले. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांनी इराण संदर्भात केलेल्या विधानानंतर भू-राजकीय जोखीम वाढल्याचे संकेत मिळाले. तेलाच्या वाढत्या किमती भारतासारख्या आयातदार देशांसाठी चिंतेचा विषय ठरू शकतात, कारण याचा थेट परिणाम महागाई आणि चालू खात्याच्या तुटीवर होण्याची शक्यता असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT