Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Today: शेअर बाजारात भूकंप! सेन्सेक्स 473 अंकांनी कोसळला; गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी एका झटक्यात बुडाले

Stock Market Today: जागतिक बाजारातील घसरण, अमेरिका-इराण तणाव आणि कच्च्या तेलाच्या दरातील वाढीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला असून निफ्टी जवळपास 200 अंकांनी घसरला.

Rahul Shelke

Stock Market Today: भारतीय शेअर बाजारात आज सकाळी व्यवहार सुरू होताच मोठी घसरण पाहायला मिळाली. जागतिक बाजारातील नकारात्मक संकेत, कच्च्या तेलाच्या दरातील मोठी वाढ आणि अमेरिका-इराणमधील वाढता तणाव याचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारावर झाला. सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी जवळपास 200 अंकांनी घसरला, तर सेन्सेक्समध्येही 470 अंकांहून अधिक घसरण झाली.

बुधवारी निफ्टी 198 अंकांच्या घसरणीसह 23,858 अंकांवर, तर सेन्सेक्स 473 अंकांनी घसरून 76,471 अंकांवर उघडला. बाजारातील या मोठ्या घसरणीमुळे बीएसईवर लिस्टेड कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवलात मोठी घट झाली. सुरुवातीच्या काही मिनिटांतच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल 2 लाख कोटी रुपयांची घट झाल्याचे चित्र दिसून आले. बीएसईवरील कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप सुमारे 486.30 लाख कोटी रुपयांवर आले.

बाजारावर एकाच वेळी अनेक संकटांचा दबाव

सध्या भारतीय शेअर बाजारासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक नकारात्मक घटक सक्रिय आहेत. अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा तीव्र झाल्याने कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. त्याचबरोबर जागतिक बॉन्ड यील्डमध्येही वाढ होत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

याशिवाय आशियाई बाजारांमध्येही मोठी घसरण दिसून आली. जपानचा निक्केई आणि दक्षिण कोरियाचा KOSPI या दोन्ही निर्देशांकांमध्ये सुमारे 3 टक्क्यांची घसरण झाली. त्याचा परिणाम भारतीय बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारावरही झाला. मंगळवारीही बाजारात फारशी सकारात्मक स्थिती नव्हती. निफ्टी 25 अंकांनी घसरून 24,055 अंकांवर बंद झाला होता.

कच्च्या तेलाचा भडका; दर 96 डॉलरच्या पुढे

अमेरिका-इराण संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी तेजी आली आहे. क्रूड ऑइलच्या किमतीत सुमारे 5 ते 6 टक्क्यांची वाढ होऊन दर 96 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेल्याचे चित्र आहे.

कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने भारतासारख्या मोठ्या तेल आयातदार देशासाठी चिंता वाढते. त्यामुळे महागाई, चालू खात्यातील तूट आणि कंपन्यांच्या खर्चावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे, त्यामुळे या गोष्टी बाजारातील गुंतवणूकदारांच्या चिंतेचा विषय ठरत आहेत.

बाजारासाठी सध्या कोणते घटक चिंताजनक?

बाजारातील सध्याच्या घसरणीमागे प्रामुख्याने खालील घटक कारणीभूत ठरत आहेत:

  • अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा वाढला

  • कच्च्या तेलाच्या किमती 96 डॉलरच्या पुढे गेल्या

  • जागतिक बॉन्ड यील्डमध्ये वाढ

  • अमेरिकन आणि आशियाई बाजारांमध्ये घसरण

  • अमेरिका-इराण यांच्यातील तणाव लवकर निवळण्याची शक्यता कमी

  • जागतिक पातळीवर गुंतवणूकदारांमध्ये सावध वातावरण

देशांतर्गत अर्थव्यवस्थेची स्थिती मात्र मजबूत

जागतिक पातळीवरील दबावामुळे शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाली असली तरी भारतीय अर्थव्यवस्थेच्या मूलभूत स्थितीबाबत काही सकारात्मक संकेत आहेत. जीडीपी वाढ, वित्तीय तूट, कर्जवाढ आणि जीएसटी संकलनासारख्या महत्त्वाच्या आर्थिक आकडेवारीत तेजी दिसून आली आहे.

कंपन्यांचे तिमाही निकालही तुलनेने चांगले राहिले आहेत. याशिवाय देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून बाजारात खरेदी सुरू असून, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या विक्रीचा दबावही काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसते. रुपयानेही अलीकडे काही प्रमाणात सुधारणा केली आहे. म्हणूनच सध्याची घसरण ही प्रामुख्याने जागतिक घडामोडींमुळे निर्माण झालेली असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे.

निफ्टीसाठी कोणते स्तर महत्त्वाचे?

SAMCO Securitiesचे टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट ओम मेहरा यांच्या मते, निफ्टीसाठी 23,990 हा महत्त्वाचा सपोर्ट लेव्हल आहे. हा स्तर सध्या टिकवून ठेवणे बाजारासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

गेल्या दोन सत्रांमध्ये निफ्टी इंट्राडे व्यवहारात 24,000 अंकांच्या खाली गेला होता. मात्र, त्याने महत्त्वाचा सपोर्ट कायम ठेवला. आता 23,950 आणि त्यानंतर 23,900 हे निफ्टीसाठी महत्त्वाचे सपोर्ट स्तर मानले जात आहेत.

दुसरीकडे बाजारात पुन्हा खरेदीचा जोर वाढल्यास 24,250 हा महत्त्वाचा रेसिस्टन्स ठरू शकतो. त्यामुळे आजच्या व्यवहारात 23,900-23,950 हा सपोर्ट झोन आणि 24,250 हा रेसिस्टन्स गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा असेल.

पुढील दिशा काय?

जागतिक बाजारातील घडामोडी, कच्च्या तेलाचे दर आणि अमेरिका-इराणमधील संघर्षाची तीव्रता यावर आगामी काळात भारतीय शेअर बाजाराची दिशा मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे सध्या गुंतवणूकदारांनी घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी बाजारातील महत्त्वाच्या सपोर्ट आणि रेसिस्टन्स पातळींसह जागतिक संकेतांवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT