Stock Market Pudhari
अर्थभान

Stock Market Today: शेअर बाजारात पुन्हा ‘रेड अलर्ट’; निफ्टी 24,350 च्या खाली, गुंतवणूकदारांची अस्वस्थता वाढली

Stock Market Today: भारतीय शेअर बाजाराची सुरुवात संथ झाल्यानंतर निफ्टी जवळपास 100 अंकांनी घसरून 24,350 च्या खाली गेला, तर IT, फार्मा, मेटल्स आणि बँकिंग शेअर्स घसरले आहेत.

Rahul Shelke

Stock Market Today: आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात काहीशी संथ झाली. बाजार उघडताना निफ्टी 4 अंकांनी घसरून 24,431 वर, तर सेन्सेक्स 145 अंकांच्या वाढीसह 78,111 वर उघडला. मात्र बाजार सुरू झाल्यानंतर लगेचच विक्रीचा दबाव वाढला आणि निफ्टी जवळपास 100 अंकांनी घसरून 24,350 च्या खाली गेला. बुधवारी निफ्टी 35 अंकांनी घसरून 24,435 वर बंद झाला होता. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी बाजारात घसरण दिसत आहे.

IT, फार्मा आणि बँकिंग शेअर्सवर दबाव

आजच्या व्यवहारात काही मोजके सेक्टर वगळता बहुतांश क्षेत्रांमध्ये घसरण दिसत आहे. IT, फार्मा, मेटल्स, बँकिंग आणि फायनान्शियल सेक्टरचे इंडेक्स लाल रंगात आहेत. दुसरीकडे ऑटो आणि मीडिया इंडेक्समध्ये तेजी दिसत आहे.

सेन्सेक्सच्या टॉप-30 कंपन्यांमध्ये जवळपास निम्मे शेअर्स वाढीसह, तर निम्मे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. इंडिगो, टेक महिंद्रा आणि इटरनल यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसत आहे. तर अल्ट्राटेक सिमेंट, टायटन आणि रिलायन्स यांच्या शेअर्सवर विक्रीचा दबाव आहे.

अमेरिकन बाजाराचा संमिश्र कल

महागाईची आकडेवारी समोर आल्यानंतर बुधवारी अमेरिकन शेअर बाजारात संमिश्र व्यवहार पाहायला मिळाला. दुसरीकडे AI क्षेत्रातील कंपन्यांच्या चांगल्या निकालांमुळे आशियाई बाजारांमध्ये उत्साह दिसत आहे. जपानच्या निक्केईमध्ये सुमारे 1.5 टक्के, तर दक्षिण कोरियाच्या KOSPI मध्ये 4.2 टक्क्यांची तेजी दिसत आहे. मात्र या सकारात्मक संकेतांचा भारतीय बाजारावर सध्या फारसा परिणाम झालेला दिसत नाही.

कच्च्या तेलाच्या किमतीही महत्त्वाच्या

भारतीय बाजारासाठी कच्च्या तेलाच्या किमती हा देखील महत्त्वाचा घटक आहे. सध्या क्रूड ऑइल सुमारे 88 डॉलर प्रति बॅरल पातळीवर आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यास भारताच्या आयात खर्चावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्याचा रुपया आणि शेअर बाजाराच्या भावनेवरही परिणाम होऊ शकतो.

महागाई 19 महिन्यांच्या उच्चांकावर

देशातील किरकोळ महागाई 4.45 टक्क्यांवर पोहोचली आहे. ही गेल्या 19 महिन्यांतील उच्च पातळी आहे. महागाई वाढल्यामुळे बाजारातील गुंतवणूकदारांच्या भावनेवर दबाव येऊ शकतो. त्यामुळे आजच्या व्यवहारात महागाईची आकडेवारीही बाजारासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

रुपयात घसरण, FII ची विक्री

डॉलरच्या तुलनेत रुपया 9 पैशांनी घसरुन 95.30 च्या पातळीवर बंद झाला. दरम्यान, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजेच FII ने बुधवारी भारतीय शेअर बाजारात 1,002 कोटी रुपयांची विक्री केली. मात्र देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजेच DII ने तब्बल 5,841 कोटी रुपयांची खरेदी केली.

गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा

भारतीय शेअर बाजार सध्या भरकटला आहे. एका बाजूला आशियाई बाजारांमध्ये तेजी, AI कंपन्यांचे चांगले निकाल आणि DIIची मोठी खरेदी यामुळे सकारात्मक संकेत आहेत. तर दुसरीकडे कच्च्या तेलाच्या किमती, वाढती महागाई, रुपयाची घसरण आणि FIIची विक्री यामुळे बाजारावर दबाव आहे.

त्यामुळे आज 24,340 ते 24,550 ही निफ्टीची रेंज महत्त्वाची ठरणार आहे. निफ्टी 24,340 च्या खाली टिकतो की पुन्हा 24,550 च्या दिशेने वाटचाल करतो, यावर बाजाराची पुढील दिशा स्पष्ट होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT