Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Today: शेअर बाजारात तेजीची लाट! निफ्टी 23,500च्या वर; गुंतवणूकदारांची 3 लाख कोटींची कमाई

Stock Market Today: गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3 लाख कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली. बीएसईवरील कंपन्यांचे बाजारमूल्य 485.15 लाख कोटी रुपयांवर पोहोचले.

Rahul Shelke

Stock Market Today: शेअर बाजारात आज (मंगळवारी) उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. आठवड्याच्या एक्सपायरीच्या दिवशी बाजाराने दमदार सुरुवात केली. सुरुवातीलाच निफ्टीने 23,500 चा टप्पा ओलांडला, तर सेन्सेक्समध्येही मोठी वाढ झाली. या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल 3 लाख कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली. जागतिक बाजारातील काही नकारात्मक संकेत असूनही भारतीय बाजारात खरेदीचा जोर कायम असल्याचे चित्र दिसत आहे.

मंगळवारी सकाळी बाजार उघडताच निफ्टी 141 अंकांच्या वाढीसह 23,582 वर पोहोचला. तर सेन्सेक्सने 595 अंकांची झेप घेत 76,288 अंकांवर सुरुवात केली. या तेजीमुळे बीएसईवर नोंदणीकृत कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य वाढून 485.15 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. सोमवारच्या व्यवहारातही बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली होती. निफ्टी 388 अंकांनी वाढून 23,440 वर बंद झाला होता.

बाजारातील तेजीमागे कोणती तीन कारणे?

शेअर बाजारातील तेजीला तीन प्रमुख कारणांचा आधार मिळत आहे. पहिले कारण म्हणजे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी घसरण. कच्च्या तेलाचे दर 10 डॉलरने कमी होऊन प्रति बॅरल 105 डॉलरवर आले आहेत. तेलाच्या किमती कमी झाल्यास भारताच्या आयात खर्चावरील दबाव कमी होण्यास मदत होते.

दुसरे कारण म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांना दीर्घकालीन भांडवली नफ्यावरील (LTCG) करात सवलत देण्याचा सरकारचा विचार. यामुळे परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय बाजाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होऊ शकतो. तिसरे कारण म्हणजे कंपन्यांचे अपेक्षेपेक्षा चांगले आर्थिक निकाल. कंपन्यांची दमदार कामगिरी बाजारातील गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवत आहे.

मात्र, जागतिक बाजारातील चित्र संमिश्र आहे. अमेरिकेतील काही प्रमुख बाजारांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली. आशियाई बाजारातही दक्षिण कोरियाचा कोस्पी अडीच टक्क्यांनी, तर जपानचा निक्केई सुमारे पाव टक्क्याने घसरला.

निफ्टी 23,700 पर्यंत जाणार?

SAMCO Securities चे तांत्रिक विश्लेषक ओम मेहरा यांच्या मते, निफ्टीसाठी 23,200 हा महत्त्वाचा आधार आहे. त्यानंतर 23,000 ही पुढील आधारपातळी असेल. दुसरीकडे, 23,550 वर पहिला अडथळा असून 23,700 ही पुढील महत्त्वाची पातळी आहे.

HDFC Securities चे नंदीश शाह यांनीही बाजाराबाबत सकारात्मक मत व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, निफ्टीने 23,175 ही महत्त्वाची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे बाजारात अल्पकालीन तेजीचे संकेत आहेत.

23,175 ही पातळी टिकून राहिल्यास निफ्टीमध्ये तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. आगामी काळात निफ्टी 23,500 ते 23,600 या पातळ्यांकडे वाटचाल करू शकतो. त्यामुळे पुढील व्यवहारांमध्ये गुंतवणूकदारांचे लक्ष निफ्टीच्या या महत्त्वाच्या पातळ्यांवर असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT