Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात तेजी; काही मिनिटांत गुंतवणूकदारांना 1 लाख कोटींचा फायदा, काय घडलं?

Stock Market Today: भारतीय शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी तेजी कायम असून सुरुवातीलाच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

Rahul Shelke

Stock Market Today: भारतीय शेअर बाजाराची आज तेजीसह सुरुवात झाली. विकली एक्सपायरीच्या दिवशी निफ्टी आणि सेन्सेक्स हिरव्या रंगात उघडले. बाजाराच्या सुरुवातीलाच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल 1 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. अमेरिकन बाजारातील तेजी, आशियाई बाजारांमधील सकारात्मक वातावरण आणि कच्च्या तेलाच्या दरातील नरमाईचा भारतीय बाजाराला फायदा होताना दिसत आहे.

आज बाजाराच्या सुरुवातीला निफ्टी 40 अंकांच्या वाढीसह 23,454 अंकांवर, तर सेन्सेक्स 42 अंकांच्या वाढीसह 74,901 अंकांवर उघडला. तेजीच्या पार्श्वभूमीवर BSE वर लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल वाढून 482.64 लाख कोटी रुपये झाले.

सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी

भारतीय शेअर बाजारात गेल्या काही सत्रांपासून सातत्याने तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या व्यवहारातही बाजाराने दमदार कामगिरी केली होती. सोमवारी निफ्टी 68 अंकांनी वाढून 23,414 अंकांवर, तर सेन्सेक्स 564 अंकांच्या वाढीसह 74,858 अंकांवर बंद झाला होता.

SAMCO Securities चे टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट ओम मेहरा यांच्या मते, निफ्टीने सध्या 23,410 अंकांवरील 23.6% Fibonacci retracement पातळी टिकवून ठेवली आहे. निफ्टीने ही पातळी पार करून तेजी कायम ठेवली, तर पुढील लक्ष्य 23,600 अंकांपर्यंत असू शकते. त्याआधी 23,550 अंकांवर महत्त्वाचा अडथळा असल्याचे त्यांनी सांगितले.

दुसरीकडे, निफ्टीसाठी 23,300 अंकांवर सपोर्ट असून त्याखाली 23,270 अंकांवर पुढील सपोर्ट पातळी असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे.

अमेरिकन बाजारातही जोरदार तेजी

भारतीय बाजाराला जागतिक बाजारातूनही सकारात्मक संकेत मिळत आहेत. अमेरिकन शेअर बाजारात मंगळवारी विविध प्रमुख निर्देशांकांमध्ये तेजी पाहायला मिळाली. Dow Jones सुमारे 366 अंकांनी वाढला, तर Nasdaq ने विक्रमी उच्च पातळीवर क्लोजिंग दिले.

चिप आणि टेक्नॉलॉजी कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीचा परिणाम आशियाई बाजारांवरही दिसून आला. जपानचा Nikkei सुमारे 1.4% आणि दक्षिण कोरियाचा KOSPI सुमारे 1.7% वाढला.

इराण संकटावर चर्चेच्या शक्यतेने बाजाराला आधार

जागतिक बाजारातील तेजीमागे अमेरिका-इराण तणाव कमी होणे हे एक कारण आहे. इराण संकटावर चर्चा होण्याची शक्यता निर्माण झाल्याने गुंतवणूकदार उत्साहात आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध संपवण्यासाठी चर्चेचे संकेत दिले आहेत, तर इराणकडूनही प्रस्ताव आल्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले.

याशिवाय कच्च्या तेलाच्या दरातील घसरणीमुळेही शेअर बाजाराला आधार मिळत आहे. कच्च्या तेलाचा दर घसरून 101 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास आला आहे.

मेटल्समध्येही तेजी

जगभरातील मेटल्समध्येही चांगली तेजी दिसून येत आहे. त्याचवेळी डॉलर इंडेक्स 100 च्या वर असल्याने बाजारातील काही गुंतवणूकदारांसाठी ही चिंतेची बाब मानली जात आहे.

दरम्यान, आजपासून संयुक्त राष्ट्रांची बैठक सुरू होत असून या बैठकीत इराणचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. त्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम किंवा तणाव कमी करण्यासंदर्भात काही सकारात्मक घडामोडी घडतात का, याकडे जागतिक बाजारांचे लक्ष आहे.

FII ची विक्री, DII ची जोरदार खरेदी

भारतीय बाजारातील परदेशी आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या व्यवहारांवरही लक्ष आहे. मागील सत्रात FII म्हणजेच परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी कॅश मार्केटमध्ये 576 कोटी रुपयांची विक्री केली, तर DII म्हणजे देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2,797 कोटी रुपयांची खरेदी केली. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री सुरू असतानाही देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांची खरेदी बाजाराला आधार देताना दिसत आहे.

नोंद: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT