Stock Market Today: देशाच्या अर्थसंकल्पापूर्वीच आज शेअर बाजाराची सुरुवात जोरदार घसरणीसह झाली. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स सुमारे 450 अंकांनी घसरून 82,100 च्या आसपास व्यवहार करत होता, तर निफ्टीत 160 अंकांची घसरण होऊन तो 25,250 च्या जवळ व्यवहार करत होता. बँक निफ्टीतही 228 अंकांची घसरण दिसून आली.
आजच्या व्यवहारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर विक्रीचा दबाव दिसून आला. विशेषतः मेटल क्षेत्रात जोरदार घसरण झाली असून मेटल इंडेक्स 3 टक्क्यांहून अधिक घसरला. आयटी शेअर्समध्येही सुमारे 1 टक्क्यांची घसरण झाली. जवळपास सर्वच सेक्टोरल इंडेक्स लाल रंगात होते. बाजारातील अस्थिरता मोजणारा इंडिया VIX निर्देशांक 3.5 टक्क्यांहून अधिक वाढला, यावरून गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मेटल क्षेत्रातील शेअर्सवर आज मोठा ताण होता. हिंदाल्कोमध्ये सुमारे 5 टक्क्यांची घसरण होऊन तो निफ्टीतील सर्वात मोठा घसरणारा शेअर ठरला. टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, कोल इंडिया, इन्फोसिस, एचसीएल टेक, ओएनजीसी या शेअर्समध्येही घसरण झाली. मात्र दुसरीकडे एफएमसीजी क्षेत्रातील काही शेअर्स तुलनेने मजबूत राहिले. नेस्ले इंडिया, आयटीसी, एचयूएल, एशियन पेंट्स, टायटन, टाटा कन्झ्युमर, मारुती सुझुकी आणि अपोलो हॉस्पिटल्स हे शेअर्स वाढीसह व्यवहार करत होते.
आधीच्या बंद भावाच्या तुलनेत सेन्सेक्स 619 अंकांनी घसरून 81,947 वर, निफ्टी 171 अंकांनी घसरून 25,247 वर, तर बँक निफ्टी 415 अंकांनी घसरून 59,542 वर उघडला. दरम्यान, रुपया मात्र डॉलरच्या तुलनेत 4 पैशांनी वाढून 91.91 प्रति डॉलरवर उघडला.
अमेरिकन बाजारात मागील सत्रात मोठी अस्थिरता पाहायला मिळाली. डाओ जोन्स तब्बल 700 अंकांच्या रेंजमध्ये हालचाल करून अखेर किरकोळ वाढीसह बंद झाला. सलग सहा दिवसांच्या तेजीनंतर नॅस्डॅकमध्ये मात्र सुमारे 170 अंकांची घसरण झाली. आजच्या फ्युचर्स व्यवहारातही अमेरिकन बाजारावर दबाव दिसून येत आहे.
आशियाई बाजारांकडूनही फारसे सकारात्मक संकेत मिळत नाहीत. गिफ्ट निफ्टी सुमारे 140 अंकांनी घसरला असून, त्यामुळे भारतीय बाजारात कमकुवत सुरुवातीचे संकेत मिळाले होते. जपानचा निक्केई निर्देशांकही आज घसरणीत होता.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी रोख बाजारात मर्यादित खरेदी केली असली तरी, सुमारे 7,800 कोटी रुपयांची निव्वळ विक्री केली आहे. दुसरीकडे, देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी सलग 106व्या दिवशी खरेदी सुरू ठेवत सुमारे 2,600 कोटी रुपये बाजारात गुंतवले आहेत. ही खरेदी बाजाराला मोठ्या घसरणीपासून काही प्रमाणात आधार देऊ शकते.
कमोडिटी बाजारातही आज मोठी उलथापालथ दिसून आली. चांदीने व्यवहारादरम्यान 4.20 लाख रुपयांचा नवा उच्चांक गाठला, तर सोन्यानेही 1.93 लाख रुपयांचा टप्पा पार करत विक्रमी पातळी गाठली. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने आणि चांदी नवनवे उच्चांक गाठताना दिसत आहेत.
दरम्यान, मध्यपूर्वेतील तणाव वाढल्याने कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. कच्चे तेल सुमारे 3 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 70 डॉलरच्या वर पोहोचले आहे, त्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे.
एलएमई कॉपरमध्ये 16 वर्षांतील सर्वात मोठी इंट्राडे वाढ पाहायला मिळाली. दिवसभरात किंमती 11 टक्क्यांपर्यंत वाढल्या आणि अखेरीस विक्रमी पातळीवर बंद झाल्या. एकूणच, बजेटपूर्वी जागतिक घडामोडी, कमोडिटी किमतीतील प्रचंड चढ-उतार आणि परदेशी गुंतवणूकदारांची विक्री यामुळे शेअर बाजारावर ताण आहे.