Stock Market Today: जागतिक घडामोडींमुळे गेल्या काही दिवसांत अस्थिर असलेल्या भारतीय शेअर बाजाराने आज जोरदार पुनरागमन केले. कालच्या मोठ्या घसरणीनंतर आज बाजाराची सुरुवात तेजीसह झाली. आठवड्याच्या एक्सपायरीच्या दिवशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यामुळे बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे 700 अंकांनी वाढून व्यवहार करत होता, तर निफ्टी जवळपास 200 अंकांच्या वाढीसह 24,200 च्या आसपास पोहोचला. बँकिंग क्षेत्रातही चांगली खरेदी दिसून आली आणि बँक निफ्टी सुमारे 500 अंकांनी वाढला.
आजच्या व्यवहारात पीएसयू बँक, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. बाजारातील अस्थिरतेचा निर्देशांक मानला जाणारा India VIX सुमारे 7 टक्क्यांनी घसरला, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला.
या सकारात्मक सुरुवातीमागे प्रमुख कारण म्हणजे जागतिक बाजारातील बदलते संकेत. पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाली. ट्रम्प यांनी संकेत दिले की इराणसोबत सुरू असलेला संघर्ष लवकरच संपुष्टात येऊ शकतो, तसेच अमेरिकेने स्ट्रेट ऑफ हॉर्मुजवरच्या नियंत्रणासाठी तयारी सुरू केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
या वक्तव्याचा परिणाम तात्काळ कमोडिटी बाजारावर दिसून आला. ब्रेंट क्रूडची किंमत एका टप्प्यावर 119 डॉलर प्रति बॅरलपर्यंत गेल्यानंतर जवळपास 25 टक्क्यांनी घसरून 90 डॉलरच्या खाली आली. कच्च्या तेलाच्या या घसरणीमुळे जगभरातील बाजारांना दिलासा मिळाला. आज गुंतवणूकदारांचे लक्ष G7 देशांच्या ऊर्जा मंत्र्यांच्या बैठकीकडेही लागले आहे, कारण या बैठकीत तेल बाजाराबाबत महत्त्वाचे संकेत मिळू शकतात.
दरम्यान, इराणकडूनही कठोर इशारा देण्यात आला आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधून जाणाऱ्या जहाजांनी सावधगिरी बाळगावी असे सांगितले आहे. त्यामुळे भू-राजकीय अनिश्चितता कायम असल्याचे दिसून येत आहे.
जागतिक बाजारातही सकारात्मक वातावरण दिसले. अमेरिकेतील बाजारांनी जोरदार पुनरागमन केले. डाओ जोन्स निर्देशांक दिवसाच्या तळातून 1125 अंकांनी वाढत सुमारे 250 अंकांच्या वाढीसह बंद झाला, तर नॅस्डॅक निर्देशांकही सुमारे 300 अंकांनी वाढला. आशियाई बाजारातही तेजीचे वातावरण दिसले. जपान आणि दक्षिण कोरियाचे बाजार 3 ते 6 टक्क्यांनी वाढले, तर GIFT निफ्टी सुमारे 250 अंकांनी वाढून 24,400 च्या आसपास व्यवहार करत होता.
चलन आणि कमोडिटी बाजारातही मोठ्या हालचाली दिसून आल्या. डॉलर इंडेक्स तीन महिन्यांच्या उच्चांकावरून घसरून 99 च्या खाली आला. सोन्या-चांदीच्या किंमतीतही चढ-उतार झाले. देशांतर्गत बाजारात सोने सुमारे 1300 रुपयांनी घसरून ₹1,60,300 च्या आसपास बंद झाले, तर चांदी 1100 रुपयांनी घसरून ₹2,67,100 च्या आसपास आली.