Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; निफ्टी 70 अंकांनी घसरला, हिंदाल्को–इंडिगो शेअर्स कोसळले

Stock Market Today: जागतिक संकेत संमिश्र राहिल्याने आज शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. सेन्सेक्स 280 अंकांनी घसरला तर निफ्टी 100 अंकांनी खाली आला; हिंदाल्को आणि इंडिगोमध्ये जोरदार विक्री झाली.

Rahul Shelke

Stock Market Today: आज देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. जागतिक बाजारांकडून संमिश्र संकेत मिळाल्यानंतर सकाळच्या सत्रात विक्रीचा दबाव दिसून आला. मेटल, रिअॅल्टी आणि फार्मा क्षेत्रात जोरदार विक्री झाली, तर ऑईल अँड गॅस आणि FMCG शेअर्समध्ये काही प्रमाणात खरेदी झाली.

ओपनिंगला BSE Sensex सुमारे 150 अंकांनी घसरला, तर NIFTY 50 जवळपास 70 अंकांनी खाली आला. बँक निफ्टी सपाट आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही किरकोळ घसरण झाली आहे.

सकाळी 9.25 च्या सुमारास सेन्सेक्स 282 अंकांनी घसरून 83,534 वर ट्रेड होत होता, तर निफ्टी 100 अंकांनी घसरून 25,670 च्या आसपास होता. बँक निफ्टीही साधारण 50 अंकांनी घसरून 60,190 वर दिसत होता.

निफ्टी 50 मध्ये आज Hindalco Industries, InterGlobe Aviation (इंडिगो), ट्रेंट, टाटा स्टील, श्रीराम फायनान्स, JSW स्टील आणि BEL हे शेअर्स टॉप लूझर्समध्ये होते. दुसरीकडे HUL, M&M, ONGC, Coal India, Wipro, NTPC आणि SBI या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली.

अमेरिकन बाजारात बुधवारी मोठे चढ-उतार दिसून आले. डाओ जोन्समध्ये जोरदार रिकव्हरी झाली, मात्र टेक शेअर्समधील विक्रीमुळे नॅस्डॅक घसरणीसह बंद झाला. GIFT निफ्टी सपाट राहिला, तर डाओ फ्युचर्सही घसरलेले दिसत होते.

दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत करार न झाल्यास कारवाईचा इशारा दिल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत जवळपास 4 टक्क्यांची वाढ झाली आणि भाव 69 डॉलरपर्यंत पोहोचले. मजबूत डॉलरमुळे कॉपरसह इतर बेस मेटल्समध्ये मात्र घसरण झाली.

सोन्या-चांदीच्या दरांतही मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. देशांतर्गत बाजारात सोनं दिवसाच्या उच्चांकावरून सुमारे 7 हजार रुपयांनी घसरून 1 लाख 53 हजारांच्या आसपास आलं, तर चांदी जवळपास 26 हजार रुपयांनी घसरून 2 लाख 68 हजार 850 वर बंद झाली. मात्र जागतिक बाजारात सोन्यात सुमारे 100 डॉलरची वाढ झाली आणि चांदीत 7 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली.

परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) कॅश, इंडेक्स आणि स्टॉक फ्युचर्स मिळून सुमारे 2,427 कोटी रुपयांची खरेदी केली. देशांतर्गत फंडांनीही जवळपास 250 कोटी रुपये बाजारात गुंतवले.

कंपन्यांच्या निकालांवरही बाजाराची नजर होती. Trent ने मजबूत निकाल सादर केले. Bajaj Holdings ची कामगिरी चांगली राहिली. Tata Power, Cummins आणि Samman Capital यांचे निकाल संमिश्र होते, तर NHPC चे निकाल अपेक्षेपेक्षा कमकुवत आले.

आज निफ्टीतील Bharti Airtel, Tata Motors PV आणि Max Healthcare यांचे निकाल जाहीर होणार आहेत. F&O सेगमेंटमध्ये Mazagon Dock, PFC, Godrej Properties, Hero Moto, IOC, Kaynes Tech आणि Nykaa यांसह अनेक कंपन्यांचे निकाल येणार आहेत.

दरम्यान, Competition Commission of India ने इंडिगोविरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत. मोठ्या प्रमाणावर उड्डाणे रद्द होणे आणि कथित गैरप्रकारांबाबत तपास केला जाणार आहे.

बाजाराचे लक्ष आता Reserve Bank of Indiaच्या पतधोरण बैठकीकडे लागले आहे. MPC बैठकीचा आज दुसरा दिवस असून उद्या व्याजदरांबाबत काय निर्णय घेतला जातो, यावर गुंतवणूकदारांची नजर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT