अर्थभान

शेअर बाजारात येणारा आठवडा कसा असेल? ‘या’ कंपन्‍या अनुभवतील तेजी

Arun Patil

मागील सोमवारच्या लेखात म्हटले होते की, वरती जाण्यासाठी निफ्टी आता 'ट्रिगर्स'च्या शोधात आहे. तिमाहीच्या निकालांचे सत्र अजूनही सुरू असले तरी त्यातील कवित्व ओसरू लागले आहे. बँका, नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या, ऑटो कंपन्या त्यांनी उत्कृष्ट निकाल दिले. बर्‍याच कंपन्यांनी अपेक्षांपेक्षा कमी आकडे दिले असले तरी खूप मोठी पडझड होईल, अशी सुमार कामगिरी कोणी केली नाही. रिलायन्स, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी, बजाज ऑटो, हिरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स, नेस्ले आणि एसबीआय लाईम यांनी बाजाराच्या अंदाजापेक्षा कितीतरी अधिक चांगले आर्थिक निकाल दिल्यामुळे निफ्टी 18000 च्या वर टिकून आहे.

अमेरिकेत फेडरल रिझर्व्ह बँक दर कमी न करण्याच्या बाबत अजूनही ठाम आहे. चीनमध्ये Slow Down येण्याची भीती बाजाराला आहे. त्यामुळे जगभराचे बाजार दोलायमान अवस्थेत आहेत. भारतामध्ये महागाई कमी होत आहे. 15 मे रोजी भारत सरकारने WPI म्हणजे Wholesale Price Index चे आकडे जाहीर केले. WPI हा निर्देशांक बाजारातील कमोडिटज्च्या घाऊक किमतीमध्ये होणार्‍या बदलांचा अभ्यास करतो. हा आकडा जितका अधिक, तितका त्याचा महागाई दर वाढण्यावर प्रभाव अधिक! त्यामुळे शेअर बाजाराच्या तेजीच्या आणि अर्थव्यवस्थेच्या स्वास्थ्यांच्या द़ृष्टीने तो आटोक्यात राहणे आवश्यक असते. मार्च 2023 मध्ये तो 1.34 होता, तर एप्रिल 2023 मध्ये तो उणे 0.92 झाला.

दुसरा महत्त्वाचा आकडा असतो, तो म्हणजे CPI (Consumer Price Index) हासुद्धा WPI प्रमाणे दर महिन्याला प्रसिद्ध केला जातो. CPI चा आकडा हा ग्राहकांना प्रत्यक्षपणे वस्तू खरेदी करताना किती पैसे मोजावे लागतात, त्यावर आधारित असल्याने महागाई दर ठरविताना तो WPI पेक्षा अधिक महत्त्वाचा ठरतो. मार्च 2023 मध्ये तो 5.66 होता. एप्रिल 2023 मध्ये तो 4.40 पर्यंत खाली आला. आता प्रतीक्षा आहे, रिझर्व्ह बँकेच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीच्या व्याज दर कमी करण्याच्या निर्णयाची!

26 एप्रिलपासून अव्याहतपणे सुरू असलेल्या FII चा खरेदीचा ओस शुक्रवार, दि. 19 मे रोजी थोडा थांबला. साडे एकशे तेरा कोटी रुपयांची विक्री त्यांनी केली, तरीही या आठवड्यात त्यांची फक्त खरेदी झाली रु. 4098.20 कोटी! निफ्टीचे फार्मा आणि एनर्जी हे निर्देशांक खाली होते. तर निफ्टी बँक आणि रिअल्टी हे निर्देशांक पॉझिटिव्ह झोनमध्ये होते. ऑटो इंडेक्सही ग्रीन झोनमध्ये राहिला. इंटलेक्ट डिझाईन अ‍ॅरेना, क्रेडिट अ‍ॅक्सेस ग्रामीन, अंबेर एंटरप्राईजेस हे शेअर्स 15 टक्क्यांहून अधिक वधारले तर अदानी टोटल ग्रीन, अदानी ट्रान्समिशन हे शेअर्स कोसळले.

येणारा आठवडा कसा राहील? निफ्टी 18000 ते 18400 च्या रेेंजमध्येच रेंगाळत राहण्याची शक्यता आहे. बँक निफ्टीने (43969.40)44000 चा टप्पा पार करून वरती राहणे अपेक्षित आहे.

येणारे काही दिवस खतनिर्मिती करणार्‍या कंपन्यांचे असतील. मान्सून नॉर्मल राहण्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. कोरोमंडल इंटरनॅशनल चंबळ फर्टिलायझर्स, गुजरात नर्मदा व्हॅली, दीपक फर्टिलायझर्स या काही प्रसिद्ध कंपन्या आहेत. यापैकी गुजरात नर्मदा व्हॅली फर्टिलायझर्स आणि केमिकल्स लिमिटेड GNFC ही गुजरात राज्य सरकारच्या दोन उपकंपन्यांच्या मालकीची कंपनी आहे. कंपनी कर्जमुक्त आहे. शुक्रवारचा तिचा बंद भाव होता रु. 591 केवळ 6.27 चा तिचा पोई आहे. तीन वर्षांची सरासरी विक्री वाढ 26 टक्के आहे, तर नफा वाढ 43% आहे. या शेअरमध्ये FIIS नी 20 टक्के वाटा आहे. 800 रुपयांच्या स्तरापाशी जाऊन हा शेअर खाली आला आहे. मध्यम कालावधी नजरेसमोर ठेवून (किमान 3 वर्षे) हा शेअर खरेदी केला तर तो 1000 रुपयांचा भाव दाखवेल, असा विश्वास वाटतो.

भरत साळोखे,
संचालक, अक्षय प्रॉफीट अँड वेल्थ प्रा.लि.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT