Stock Market Updates
अमेरिकेच्या २७ ऑगस्टपासून लागू होणाऱ्या अतिरिक्त २५ टक्के टॅरिफची चिंता शुक्रवारी (दि.२२) शेअर बाजारात दिसून आली. परिणामी, चौफेर घसरण झाली. यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीच्या सलग सहा दिवसांच्या तेजीला ब्रेक लागला. सेन्सेक्स ६९३ अंकांनी घसरून ८१,३०६ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक २१३ अंकांच्या घसरणीसह २४,८७० पर्यंत खाली आला.
सेन्सेक्स आणि निफ्टीने सलग सहा दिवस वाढ नोंदवली होती. यामुळे गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुकिंग केले. सेक्टरमधील फार्मा आणि consumer durables वगळता सर्व प्रमुख निर्देशांक लाल रंगात बंद झाले. फायनान्सियल आणि बँकिंग निर्देशांक १ टक्केपर्यंत घसरले. गेल्या तीन सत्रांत ३ टक्के वाढलेला आयटी निर्देशांक आज ०.८ टक्के घसरला. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या भाषणापूर्वी गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगली. यामुळे आयटी शेअर्स घसरले.
एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँक सारख्या हेवीवेट शेअर्समध्ये विक्री दिसून आली. याचा सेन्सेक्स आणि निफ्टीवर दबाव राहिला.
सेन्सेक्सवर एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट, आयटीसी, टाटा स्टील, एचसीएल टेक, कोटक बँक, अदानी पोर्ट्स, टीसीएस एचडीएफसी बँक, टेक महिंद्रा, एसबीआय, रिलायन्स हे शेअर्स १ ते २.५ टक्क्यांपर्यंत घसरले. आयसीआयसीआय बँकेचा शेअर्स ०.६ टक्के घसरला. तर दुसरीकडे एम अँड एम, मारुती, सन फार्मा हे शेअर्स तेजीत राहिले.