* गतसप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकांमध्ये एकूण अनुक्रमे 525.40 अंक व 1650.73 अंकांची वाढ होऊन दोन्ही निर्देशांक 25637.8 अंक व 84058.9 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये 2.09 टक्के, तर सेन्सेक्समध्ये 2.00 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. मागील सहा सप्ताहांतील ही सर्वात मोठी वाढ आहे. यामध्ये बँक निफ्टी निर्देशांक 2.12 टक्के वाढून सर्वोच्च विक्रमी पातळीवर म्हणजेच 57443.90 अंकांच्या पातळीपर्यंत गेला. सेन्सेक्सने पुन्हा एकदा 9 महिन्यांनंतर 84 हजारांच्यावर बंदभाव दिला. सप्ताहाचा एकूण विचार करता बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे भांडवल-बाजारमूल्य सुमारे 12.4 लाख कोटींनी वधारून 461.13 लाख कोटींवर पोहोचले. मागील सहा ट्रेडिंग सेशन्समध्ये भांडवलबाजार मूल्यामध्ये तब्बल 17.3 लाख कोटींची भर पडली. सप्ताहात सर्वाधिक वाढ होणार्या समभागांमध्ये जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस (9.9 टक्के), अदानी एन्टरप्राईझेस (8.1 टक्के), हिंडाल्को इंडस्ट्रीज (7.4 टक्के), अदानी पोर्टस (6.7 टक्के), अल्ट्राटेक सिमेंट (6.6 टक्के) या कंपन्यांचा समावेश झाला. तसेच सर्वाधिक घट होणार्या समभागांमध्ये ओएनजीसी (-3.6 टक्के), डॉ. रेड्डीज लॅब (-1.3 टक्के), टेकमहिंद्रा (-1.3 टक्के), मारुती सुझुकी (-1.2 टक्के), एचसीएल टेक (-1.0 टक्का) या कंपन्यांचा समावेश झाला. मध्यपूर्वेत इस्रायल-अमेरिका आणि इराण या देशात झालेल्या युद्धविरामाच्या घोषणेने जगभरातील भांडवल बाजारांना दिलासा मिळाला. या पार्श्वभूमीवर भू-राजकीय तणाव निवळण्याच्या आशेने निफ्टी-सेन्सेक्स निर्देशांकांमध्ये वाढ बघावयास मिळाली.
* इराण-इस्रायलच्या युद्धविरामाच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर रुपया चलनात डॉलरच्या तुलनेत मजबुती. गतसप्ताहात रुपया डॉलरच्या समोर तब्बल 1.3 टक्के मजबूत झाला. जानेवारी 2023 नंतरची एकाच सप्ताहात झालेली मागील अडीच वर्षांतील रुपया चलनातील ही सर्वात मोठी वाढ ठरली आहे. शुक्रवारच्या सत्रात रुपया 24 पैसे मजबूत होऊन 85.4750 रुपये प्रतिडॉलर स्तरावर बंद झाला. याआधी गुरुवारच्या सत्रातदेखील रुपया 36 पैसे मजबूत झाला होता. परदेशातून रोखे बाजारात तसेच इक्विटी प्रकारात आलेल्या गुंतवणुकीच्या ओढ्याने रुपया चलन मजबूत झाले. ट्रम्प यांनी सर्व राष्ट्रांवर लावलेल्या आयात शुल्क विरामाची कालमर्यादा 9 जुलै रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर काही मोठ्या घोषणा होण्याचे संकेत ट्रम्प यांनी सोशल मीडियावर दिले आहेत. याचाही परिणाम भारतीय चलन रुपयावर पाहायला मिळाला.
* भारतीय अर्थव्यवस्थेसाठी दिलासादायक बातमी. मध्यपूर्वेतील युद्धविरामाच्या घोषणेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव जबर आपटले. याचप्रमाणे खनिजतेल उत्पादक देशांची संघटना ओपेक प्लस ऑगस्टमध्ये दर दिवशी 4.11 लाख अधिकच्या खनिजतेल बॅरलचे उत्पादन घेण्याच्या तयारीत असल्याचे समजते. यामुळे एकाच आठवड्यात खनिजतेलाचे भाव 12 टक्क्यांनी कोसळले. युद्ध सुरू झाल्याने ब्रेंट क्रूडचे भाव 80 डॉलर प्रतिबॅरलपर्यंत वाढले होते. 12 दिवस युद्ध चालल्यानंतर जेव्हा युद्ध थांबले, तेव्हा ब्रेंट क्रूड पुन्हा 67 डॉलर्स प्रतिबॅरलपर्यंत खाली आले, तर अमेरिकेचे डब्ल्यूटीआय क्रूड 65 डॉलर प्रतिबॅरलपर्यंत खाली आले. मार्च 2023 नंतर एकाच आठवड्यात खनिज तेलात झालेली ही सर्वात मोठी घट आहे.
* जेएसडब्ल्यू पेंटस् लवकरच अॅक्झो नोबेल इंडिया खरेदी करणार. बाजारात ‘ड्यूलक्स’ नावाने उपलब्ध असणारी रंग कंपनीची मालक ‘अॅक्झोनोबेल इंडिया’ कंपनी आहे. यासाठी जेएसडब्ल्यू पेंटस् 8,986 कोटी रुपये मोजणार असल्याचे समजते. या अधिग्रहणपश्चात एशियन पेंटस्, बर्जर पेंटस् आणि कन्साई नेरोलॅक नंतरची सर्वात मोठी रंगकंपनी जेएसडब्ल्यू पेंटस् असेल. या दोन्ही कंपन्यांचा एकत्रित महसूल सुमारे 6 हजार कोटींच्या जवळपास असून, एकूण बाजारातील हिस्सा 9 टक्क्यांच्या जवळपास आहे. सध्या भारतीय रंग बाजारपेठेत एशियन पेंटस्चे 52 टक्के हिश्श्यासह आणि 33,855 कोटींच्या विक्रीसह एकहाती वर्चस्व आहे.
* देशातील दोन सर्वात मोठे उद्योगसमूह रिलायन्स आणि अदानी यांच्यामध्ये भागीदारीसाठी करार. अदानी टोटल गॅस लिमिटेड आणि रिलायन्स-बीपी या दोन्ही कंपन्यांच्या पंपांवर एकमेकांची उत्पादने मिळणार. रिलायन्स-बीपी कंपनीचे देशभरात 2 हजार पेट्रोल पंप आहेत. त्यांच्या पंपावर अदानी टोटल गॅसतर्फे सीएनजी भरण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध होणार. तसेच अदानी टोटलच्या सीएनजी पंपावर रिलायन्सतर्फे पेट्रोल-डिझेल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार. अदानी टोटलचे देशात 600 सीएनजी स्टेशन्स आहेत.
* जागतिक पतमानांकन संस्था ‘एस अँड पी’ ने आर्थिक वर्ष 2025-26 सालासाठी भारताच्या जीडीपी वृद्धिदराचा 6.5 टक्क्यांपर्यंत वाढवला. यापूर्वी मे महिन्यात भू-राजकीय अस्थिरतेमुळे तसेच डॉलरच्या तुलनेत घसरणार्या रुपया चलनामुळे हा जीडीपी वृद्धिदर अंदाज 6.3 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आला होता. परंतु, सध्याची भारताची समतल भूमिका आणि अर्थव्यवस्थेची आव्हानांना तोंड देण्याची लवचिकता पाहता हा वृद्धिदर अंदाज 6.5 टक्क्यांवर नेण्यात आला.
* लवकरच पोस्ट खात्यामध्ये डिजिटल पेमेंट स्वीकारण्याचा पर्याय दिला जाणार. सर्वसामान्य जनता साधी भाजी घेताना देखील ‘यूपीआय’चा वापर करून पैसे देत असताना दीड लाखापेक्षा अधिक कार्यालयांचे जाळे असलेल्या टपाल खात्याचे बहुतांश व्यवहार रोखीने होत आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्थेत आज देखील टपाल खात्याकडे महत्त्वाचे सरकारी केंद्र म्हणून पाहिले जाते. ‘इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक’ डिजिटल सेवादेखील देत आहे. परंतु, टपाल कार्यालयाच्या काऊंटरवर आजदेखील रोखीने व्यवहार चालतात. ऑगस्टपासून डायनामिक क्यूआर कोडद्वारे रक्कम स्वीकारण्याचा पर्याय असणार आहे. त्यामुळे ग्राहक स्पीड पोस्ट, पार्सल किंवा रजिस्टर्ड पोस्ट बुक करताना डिजिटल पेमेंट करू शकतील. प्रायोगिक तत्त्वावर याची सुरुवात कर्नाटकमध्ये झाली असून, ऑगस्टपासून देशभरात ही सुविधा उपलब्ध होणार.
* ‘यूपीआय’ ट्रान्स्झॅक्शन फेल गेले, तर वापरकर्त्याला लगेच रिफंड मिळणार. तसेच चुकीच्या यूपीआय नंबरवर पैसे पाठवले गेल्यास ते पैसे परत मागवून घेण्याचा पर्यायदेखील असेल. सध्या यूपीआय व्यवहार फेल गेल्यास वापरकर्त्याला पैसे जमा होण्यासाठी अनेक दिवस वाट पाहावी लागते. परंतु, नवीन चार्जबॅक प्रणालीमुळे ही प्रक्रिया अधिक जलद होईल. यापूर्वी (डिक्लाईन) नाकारलेल्या यूपीआय (ट्रान्स्झॅक्शन) व्यवहारांसाठी ‘एनपीसीआय’ या केंद्रीय संस्थेला मध्ये पडावे लागत होते आणि रिफंड द्यावा लागत होता. ही प्रक्रिया खूप वेळखाऊ आणि गुंतागुंतीची होती. आता बँका स्वतःच ही प्रकरणे निकाली काढू शकतील. 15 जुलैपासून हा नवा नियम लागू होईल.
* 20 जूनअखेर संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश चलन गंगाजळी 1.02 अब्ज डॉलर्सनी घटून 697.93 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली.