Stock Market Crash Pudhari
अर्थभान

Stock Market Crash: उद्या शेअर बाजारात त्सुनामी येणार? गुंतवणूकदारांची झोप उडणार; नेमकं कारण काय?

Gift Nifty Crash: अमेरिकन शेअर बाजारातील मोठ्या घसरणीचा परिणाम भारतीय बाजारावर दिसण्याची शक्यता आहे.

पुढारी वृत्तसेवा

Stock Market Crash: भारतीय शेअर बाजारासाठी सोमवारचा दिवस धक्कादायक ठरू शकतो, असे संकेत सध्या जागतिक बाजारातून मिळत आहेत. शुक्रवारी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल केला नाही. तसेच परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी RBI ने काही घोषणा केल्या. मात्र त्याचा बाजाराला फारसा फायदा झाला नाही. सेन्सेक्स आणि निफ्टी किरकोळ घसरणीसह बंद झाले. आता मात्र सोमवारच्या व्यवहारापूर्वीच गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारे संकेत मिळत आहेत.

गिफ्ट निफ्टी तब्बल 356 अंकांनी घसरलेला दिसत आहे. याचा अर्थ भारतीय बाजार सोमवारी मोठ्या घसरणीसह उघडू शकतो. अनेक मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अमेरिकन बाजारात मोठी घसरण

भारतीय शेअर बाजारावर दबाव येण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे अमेरिकन शेअर बाजारातील मोठी पडझड. शुक्रवारी अमेरिकेतील प्रमुख निर्देशांकांमध्ये वर्षातील सर्वात मोठी घसरण झाली.

एस अँड पी 500 निर्देशांक 2.64 टक्क्यांनी घसरून 7,383.74 वर बंद झाला. ऑक्टोबर 2025 नंतरची ही सर्वात मोठी एकदिवसीय घसरण मानली जात आहे.

तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअर्सचा निर्देशांक असलेला नॅस्डॅक 4.18 टक्क्यांनी कोसळून 25,709.43 वर बंद झाला. एप्रिल 2025 नंतरची ही सर्वात मोठी घसरण आहे. तर डाऊ जोन्स निर्देशांकही 1.35 टक्क्यांनी घसरला.

घसरणीमागे नेमकं कारण काय?

या घसरणीचं प्रमुख कारण म्हणजे अमेरिकेतील रोजगाराचा आकडा. मे महिन्यात रोजगाराचा आकडा चांगला असल्याने अमेरिकन फेडरल रिझर्व्ह यावर्षी व्याजदर वाढवू शकते, अशी शक्यता पुन्हा वाढली आहे.

सध्या बाजारातील अनेक तज्ज्ञांचा अंदाज आहे की डिसेंबरपर्यंत फेड व्याजदरात 25 बेसिस पॉइंट्सची वाढ करू शकते. व्याजदर वाढल्यास महागाईवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते, पण त्याचवेळी कंपन्यांच्या नफ्यावर आणि आर्थिक वाढीवर दबाव निर्माण होतो. याच भीतीमुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात शेअर्सची विक्री केल्याचे दिसून आले.

टेक शेअर्समध्ये विक्रीचा पूर

विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाली. गेल्या काही महिन्यांतील प्रचंड तेजीमुळे अनेक गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुक करण्याचा निर्णय घेतला. त्याचा थेट परिणाम नॅस्डॅक आणि इतर टेक कंपन्यांच्या शेअर्सवर दिसून आला.

ट्रेझरी यिल्ड वाढल्याने बाजारावर दबाव

अमेरिकेतील सरकारी रोख्यांवरील म्हणजेच ट्रेझरी बाँड्सवरील परतावा वाढू लागला आहे. ट्रेझरी यिल्ड वाढले की गुंतवणूकदारांचा कल सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढतो. त्यामुळे शेअर बाजारातून पैसा बाहेर पडण्यास सुरुवात होते. यामुळेही अमेरिकन बाजारात मोठी विक्री झाली.

VIX निर्देशांक 39 टक्क्यांनी वाढला

बाजारातील अस्थिरतेचं मोजमाप करणारा VIX निर्देशांक एका दिवसात 39 टक्क्यांहून अधिक वाढला. याचा अर्थ गुंतवणूकदारांमध्ये भीती आणि अनिश्चितता वाढत आहे. साधारणपणे VIX वाढला की बाजारातील चढ-उतार वाढण्याची शक्यता असते.

मध्य पूर्वेतील तणावही वाढला

आर्थिक कारणांबरोबरच भू-राजकीय घडामोडींनीही गुंतवणूकदारांची चिंता वाढवली आहे. इस्रायल-लेबनॉन युद्धविरामाबाबत निर्माण झालेली अनिश्चितता, हिजबुल्लाहची भूमिका आणि अमेरिका-इराण चर्चेतील संभ्रम यामुळे जागतिक बाजारात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

या घडामोडींचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींवर होऊ शकतो. तसेच याचा थेट परिणाम भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांवर होण्याची शक्यता आहे.

भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?

तज्ज्ञांच्या मते, जागतिक संकेत नकारात्मक असले तरी घाबरून निर्णय घेऊ नयेत. अल्पकालीन अस्थिरता ही बाजाराचा भाग आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक रणनीती कायम ठेवणे अधिक फायद्याचे ठरू शकते.

मात्र सोमवारी बाजार उघडताना मोठ्या चढ-उतारांची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावध राहून व्यवहार करणे गरजेचे आहे.

सध्या तरी गिफ्ट निफ्टीतील मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारातील विक्री पाहता, दलाल स्ट्रीटवर आठवड्याची सुरुवात घसरणीसह होण्याची शक्यता अधिक दिसत आहे.

(नोंद- शेअर बाजारात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी, तुमच्या आर्थिक सल्लागाराची मदत नक्की घ्या)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT