आज दुपारच्या व्यवहारात सेन्सेक्स तब्बल १,२०० अंकांनी घसरला.  (source- AI generated image)
अर्थभान

शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्स १,०१८ अंकांनी घसरुन बंद, ९.३२ लाख कोटींचा चुराडा

Stock market crash | सेन्सेक्सवरील सर्व शेअर्स लाल रंगात

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक कमकुवत संकेत, कमकुवत कॉर्पोरेट कमाई, विदेशी गुंतवणूकदारांची पैसे काढून घेण्याची कायम राहिलेली भूमिका तसेच बँकिंग, मेटल आणि आयटी शेअर्स घसरणीचा फटका आज मंगळवारी भारतीय शेअर बाजाराला (Stock market) बसला. आज सलग पाचव्या सत्रांत सेन्सेक्स- निफ्टीची घसरण कायम राहिली. आज दुपारच्या व्यवहारात सेन्सेक्स तब्बल १,२०० अंकांनी घसरून ७६,०८४ पर्यंत खाली आला. तर निफ्टी ५० निर्देशांक २३ हजारांपर्यंत खाली घसरला. त्यानंतर सेन्सेक्स १,०१८ अंकांच्या घसरणीसह ७६,२९३ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक ३०९ अंकांनी घसरून २३,०७१ वर स्थिरावला. सेन्सेक्स आणि निफ्टीची आजची घसरण प्रत्येकी १.३ टक्के एवढी राहिली.

गुंतवणूकदारांचे ९.३२ लाख कोटींचे नुकसान

दरम्यान, आजच्या मोठ्या घसरणीचा गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. ११ फेब्रुवारी रोजी बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ९.३२ लाख कोटींनी कमी होऊन ४०८.५० लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले. १० फेब्रुवारी रोजी ते ४१७.८२ लाख कोटी रुपयांवर होते. याचाच अर्थ असा की आज गुंतवणूकदारांचे ९.३२ लाख कोटींचे नुकसान झाले.

क्षेत्रीय निर्देशांक गडगडले

सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद झाले. कन्झ्युमर ड्युरेबल्स, कॅपिटल गुड्स, ऑईल अँड गॅस, एफएमसीजी, हेल्थकेअर, पॉवर, पीएसयू, रियल्टी हे निर्देशांक २ ते ३ टक्क्यांनी घसरले. निफ्टी मिडकॅप २.७ टक्के घसरला. बीएसई मिडकॅप २.८ टक्के आणि स्मॉलकॅप ३.४ टक्के घसरला.

Sensex Today | कोणते शेअर्स टॉप लूजर्स?

सेन्सेक्सवरील एक शेअर्स वगळता इतर २९ शेअर्स घसरले. झोमॅटोचा शेअर्स ५.२ टक्के घसरून २१५ रुपयांवर बंद झाला. टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह, पॉवर ग्रिड, एलटी, टाटा मोटर्स, कोटक बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयटीसी, अल्ट्राटेक सिमेंट, सन फार्मा, टीसीएस, एम अँड एम, टेक महिंद्रा, रिलायन्स, एनटीपीसी, मारुती, एशियन पेंट्स हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांपर्यंत घसरले.

निफ्टी ५० वर आयशर मोटर्सचा शेअर्स ६.७० टक्के घसरला. अपोलो हॉस्पिटल, श्रीराम फायनान्स, कोल इंडिया हे शेअर्स ३ ते ६ टक्के घसरले. तर अदानी एंटरप्रायजेस, ग्रासीम, ट्रेंट हे शेअर्स तेजीत राहिले.

US Tariff Hike | ट्रेड वॉरची तीव्रता वाढणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच सर्व स्टील आणि ॲल्युमिनियम आयातीवर २५ टक्के नवीन कर लागू करण्याचा इशारा दिला. व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने पुष्टी केली आहे की नवीन आयात कर ४ मार्चपासून लागू होईल. कॅनडा, ब्राझील, मेक्सिको, दक्षिण कोरिया आणि इतर काही देशांच्या आयात उत्पादनांवर हा कर लागू होणार आहे. यामुळे जागतिक पातळीवर ट्रेड वॉरची तीव्रता वाढणार असल्याच्या चिंतेचे पडसाद बाजारात उमटले.

विदेशी गुंतवणूकदारांचे (FII) पैसे काढून घेण्याचे सत्र कायम

भारतीय बाजारात विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा सुरुच आहे. या वर्षी आतापर्यंत त्यांनी ९.९४ अब्ज डॉलर्स किमतीच्या भारतीय शेअर्सची विक्री केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात आयकर कमी करून मध्यमवर्गीय नोकरदारांना दिलासा दिला. पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या कर लागू करण्याच्या घोषणांमुळे बाजारात 'टॅरिफ टेन्शन'चा परिणाम दिसून येत असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT