सेन्सेक्स आज ९०० अंकांनी कोसळला. BSE
अर्थभान

Stock Market Crash | सेन्सेक्स ९०० अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे ४ लाख कोटी उडाले

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क

भारतीय शेअर बाजार (Stock Market Crash) आज शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारातच धडाम झाला. सकाळी ११.१३ वाजता सेन्सेक्स (Sensex) ९०० हून अधिक अंकांनी घसरून ८१,३०० च्या खाली आला. तर निफ्टी ५० निर्देशांक (Nifty) २७७ अंकांनी घसरून २४,९०० च्या खाली आला. सेन्सेक्स आणि निफ्टीची ही १ टक्के घसरण आहे. सर्व क्षेत्रात चौफेर विक्रीचा मारा दिसून येत आहे.

बाजार भांडवलात ४.४६ लाख कोटींची घट

शेअर बाजारातील या घसरणीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ४.४६ लाख कोटींनी कमी होऊन ४६१.२२ लाख कोटी रुपयांवर आले.

क्षेत्रीय निर्देशांकाची काय स्थिती?

क्षेत्रीय निर्देशांकात निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक सुमारे २ टक्क्यांनी घसरला आहे. बँक, ऑटो, मीडिया मेटल हे निर्देशांकही १ टक्के घसरले आहेत. बीएसई मिडकॅप ०.८ टक्के आणि स्मॉलकॅप ०.४ टक्क्यांनी घसरला आहे.

Sensex Today : 'हे' शेअर्स घसरले

सेन्सेक्सवर एसबीआय, अदानी पोर्ट्स, रिलायन्स, एचसीएल टेक, एनटीपीसी, एम अँड एम, एलटी, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा मोटर्स, टायटन, आयटीसी, ॲक्सिस बँक हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. तर बजाज फायनान्स, हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर्स तेजीत आहेत.

बाजारातील घसरणीचे कारण काय?

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीचा आकार आणि गती निश्चित करु शकणाऱ्या नोकऱ्यांबाबतचा अहवालापूर्वी गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. यामुळे बाजारात आज सुरुवातीला मोठी घसरण झाली. एनर्जी आणि बँकिंग शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसून आला.

परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री

परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) भारतीय शेअर्सची पुन्हा विक्री सुरु केली आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी ५ सप्टेंबर रोजी ६८८ कोटी रुपयांच्या शेअर्सची निव्वळ विक्री केली. तर याच दिवशी देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी २,९७० कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केल्याचे आकडेवारीवरुन दिसून आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT