Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Crash: शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स 800 अंकांनी कोसळला; आयटी शेअर्समध्ये विक्रीची त्सुनामी

Stock Market Crash: शुक्रवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली असून सेन्सेक्स 800 हून अधिक अंकांनी कोसळला, तर निफ्टी 200 अंकांपर्यंत घसरला.

पुढारी वृत्तसेवा

Stock Market Crash: आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. शुक्रवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल 800 हून अधिक अंकांनी घसरला, तर निफ्टीही 200 अंकांच्या आसपास कोसळला. विशेष म्हणजे आयटी आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार विक्री झाल्याने बाजारावर मोठा दबाव निर्माण झाला.

व्यवहार सुरू होताच बीएसई सेन्सेक्स 77,409 या मागील बंद पातळीच्या तुलनेत घसरणीसह 76,852 वर उघडला. त्यानंतर विक्रीचा दबाव वाढत गेला आणि काही वेळातच सेन्सेक्स 76,605 या पातळीवर घसरला. म्हणजेच निर्देशांकात 800 हून अधिक अंकांची घसरण झाली.

दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टीही घसरताना दिसला. मागील सत्रात 24,168 वर बंद झालेला निफ्टी 23,991 वर उघडला आणि पुढे 23,939 पर्यंत घसरला. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.

या घसरणीमागे सर्वात मोठा फटका आयटी क्षेत्राला बसल्याचे दिसून आले. इन्फोसिस, टीसीएस, टेक महिंद्रा आणि एचसीएल टेक यांसारख्या दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. इन्फोसिसचा शेअर सुमारे 8.5 टक्क्यांनी घसरला, तर टीसीएसमध्ये 6 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. टेक महिंद्रा आणि एचसीएल टेकचे शेअर्सही 5 टक्क्यांपेक्षा जास्त घसरले.

आयटी क्षेत्रातील या मोठ्या विक्रीमुळे बाजारातील गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास डळमळीत झाल्याचे चित्र दिसून आले. जागतिक बाजारातील अनिश्चितता, अमेरिकेतील आर्थिक घडामोडी आणि तंत्रज्ञान क्षेत्रावरील दबाव यांचा परिणाम भारतीय आयटी कंपन्यांच्या शेअर्सवर झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

बाजारातील या घसरणीमुळे अल्पकालीन गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली असली, तरी दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी घाबरून निर्णय न घेता बाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवावे, असा सल्ला बाजार तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

सध्या बाजारात अस्थिरतेचे वातावरण कायम असून आगामी काही सत्रांमध्ये जागतिक संकेत, परदेशी गुंतवणूकदारांचा निधी आणि आर्थिक आकडेवारी यावर बाजाराची दिशा अवलंबून राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT