अर्थभान

एक्‍झिट पोल ‘इफेक्‍ट’..! सेन्सेक्स, निफ्टीचा सर्वकालीन उच्चांक, गुंतवणूकदारांच्‍या संपत्तीत 12 लाख कोटी रुपयांनी वाढ

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा निवडणुकीच्‍या मतदानानंतर सर्वच एक्झिट पोलने केंद्रात पुन्‍हा एकदा भाजप नेतृत्त्‍वाखालील एनडीए सरकार स्‍थापन होण्‍याचे संकेत दिले आहेत. याचे सकारात्‍मक परिणाम आज (3 जून) देशांतर्गत शेअर बाजारात उमटले. निफ्टी प्रथमच 23,300 च्या वर उघडला. निफ्टी बँकेत सुमारे 1600 अंकांची वाढ दर्शवली. तर सेन्सेक्सही पहिल्यांदाच 76,000 च्या पुढे व्यवहार करताना दिसला. या तेजीच्‍या वार्‍यामुळे पहिल्या 2 तासात शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची संपत्ती 12 लाख कोटी रुपयांनी वाढली आहे. आजचे व्‍यवहार बंद होताना सेन्‍सेक्‍स तब्‍बल 2,507.47 (3.39%) अंकांनी वधारत  76,468.78 वर तर निफ्‍टी 776.55 (3.45%) अंक उसळी घेत 23,307.25 अशा सर्वकालीन उच्‍चाकांवर बंद झाला.

आज सुरुवातीच्‍या व्‍यवहारात काय घडलं?

    • निफ्टी 807 अंकांनी वाढून 23,337 वर तर सेन्सेक्स 2,622 अंकांनी वधारत 76,583 वर उघडला.
    • निफ्टी बँक 1906 अंकांनी वाढून 50,889 वर व्‍यवहार करताना दिसला.
    • रुपया 47 पैशांनी मजबूत झाला आणि 83.46 च्या तुलनेत 82.99/$ वर उघडला.

शनिवारी जाहीर झालेल्या एक्झिट पोलनुसार मोदी सरकार तिसऱ्यांदा पुनरागमन करेल, असे भाकित करण्‍यात आले आहे. मंगळवार, ४ जून रोजी लोकसभा निवडणूक निकाल जाहीर होणार आहेत. शुक्रवारी बाजार सावरले होते आणि निफ्टी 42 अंकांनी वाढून 22,530 वर बंद झाला होता. सेन्सेक्स 75 अंकांनी वाढून 73,961 वर आणि निफ्टी बँक 301 अंकांनी वाढून 48,983 वर बंद झाला होता. आज व्‍यवहाराची सुरुवात सकारात्‍मक झाली. निफ्टी प्रथमच 23,300 च्या वर उघडला. निफ्टी बँकेत सुमारे 1600 अंकांची वाढ दर्शवत सेन्सेक्सही पहिल्यांदाच 76,000 च्या पुढे व्यवहार करताना दिसला.

सर्व क्षेत्रांतील शेअर्सची जोरदार मुसंडी

बहुतांश एक्झिट पोल भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए केंद्रात परत येण्याचे संकेत देतात. त्यामुळे शेअर बाजारात मोठी तेजी असून PSU समभागांची मोठी खरेदी झाली. पायाभूत सुविधा क्षेत्राच्या शेअर्समध्येही चांगली वाढ झाली. शेअर बाजारात तेजीचे वारे वाहिले. जवळपास प्रत्येक क्षेत्रात खरेदी होताना दिसली. सकाळी 10:20 च्या सुमारास सेन्सेक्स 2,118.84 अंकांनी वाढून 76,080.15 वर, तर निफ्टी50 665.60 अंकांनी वाढून 23,196.30 वर पोहोचला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक सुरू ठेवण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांचा आत्‍मविश्‍वास वाढला. निफ्टी एनर्जी, निफ्टी पीएसयू बँक आणि निफ्टी रिॲल्टी हे प्रत्येकी 4-5% च्या दरम्यान वाढले. 'बीएसई'वरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ११ लाख कोटींनी वाढले, ज्यामुळे गुंतवणूकदार अधिक श्रीमंत झाले.

सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयू) रेल्वे, संरक्षण आणि उर्जा यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सरकारकडून सतत मजबूत भांडवली खर्चाच्या अपेक्षेदरम्यान PSU शेअर्स व्यापार सत्रात गगनाला भिडले. मिड आणि स्मॉलकॅप निर्देशांक नवीन उच्चांकाला गाठले. सर्व क्षेत्र हिरव्या चिन्हात दिसले. अदानी समूहाच्या शेअर्स आणि सरकारी कंपन्यांमध्ये सर्वाधिक वाढ दिसली. सर्वच क्षेत्रातील शेअर्सनी तेजी अनुभवली.

खरेदीला उधाण

सेन्सेक्समधील 30 पैकी 29 समभागांमध्ये खरेदी दिसून आली. तर निफ्टी बँकेच्या सर्व 12 शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. निफ्टीच्या 50 पैकी 47 समभागांमध्ये खरेदी दिसून आली. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, अदानी पोर्ट्स, अदानी एंटरप्रायझेस, श्रीराम फायनान्स आणि एनटीपीसी हे निफ्टीमध्ये मोठे लाभार्थी ठरले. तर . निफ्टीच्या जवळपास सर्व क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाढ दिसून आली. सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात दिसले. BSE बँक निर्देशांकात आज 3% ची वाढ दिसून आली आहे. बँक ऑफ बडोदा, एसबीआय, ॲक्सिस बँक टॉप गेनर्स म्हणून व्यवहार करताना दिसले. दुपारी 12:30 पर्यंत सेन्सेक्स सुमारे 2300 अंकांनी, निफ्टी सुमारे 700 अंकांनी वधारला. निफ्टी बँकेत सुमारे 1900 अंकांची वाढ झाली. तर मिडकॅपमध्ये सुमारे 1600 अंकांची आणि स्मॉलकॅपमध्ये सुमारे 420 अंकांची वाढ झाली.

गुंतवणूदारांच्‍या संपत्तीत १२ लाख कोटी रुपयांची वाढ

सेन्सेक्स आणि निफ्टीने त्यांचे पूर्वीचे सर्व रेकॉर्ड मोडून नवे विक्रम रचले. सेन्सेक्स 2,700 अंकांच्या बंपर उसळीसह उघडला. निफ्टीने 4 टक्क्यांच्या वाढीसह प्रथमच 22,300 चा स्तर पार केला. अगदी बँक निफ्टी, बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांनीही आज त्यांच्या नवीन सार्वकालिक उच्चांकाला स्पर्श केला. या तेजीने गुंतवणूकदारांना श्रीमंत केले. पहिल्या 2 तासात शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 12 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

'एसबीआय'च्‍या शेअरमध्‍ये मोठी वाढ, किंमत ५२ आठवड्यांच्‍या नवीन उच्‍चांकावर

आज BSE वर SBI (स्टेट बँक ऑफ इंडिया) चे शेअर्स 867.95 रुपयांच्या वाढीसह उघडले. दिवसभरात 9.78 टक्क्यांनी वाढ अनुभवत 911.30 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. मागील ५२ आठवड्यातील ही उच्‍चांकी वाढ आहे. बँकेचे मार्केट कॅप 8.10 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. 2024 मध्ये SBI चे शेअर्स 40 टक्क्यांनी वाढले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअर्समध्ये सुमारे 10 टक्क्यांनी वाढ झाली. ही वाढ 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांकावर पोहोचली. यासह बँकेच्या बाजार भांडवल 8 लाख कोटी रुपयांचा आकडा पार केला. 8 लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅप असलेल्या देशातील सूचीबद्ध कंपन्यांची संख्या 7 झाली आहे. यामध्‍ये रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक पूर्वीपासून आहेत.

अदानी समूहाचे भागभांडवल पोहाेचले 20 लाख कोटींच्या नजीक

अदान समुहाच्‍या शेअर्सने कमालीची तेजी अनुभवली. समूहाच्या सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप मिळून 20 लाख कोटी रुपयांच्या जवळ पोहोचले. सुरुवातीच्या व्यवहारात अदानी समूहाच्या शेअर्सचे मार्केट कॅप सुमारे 3 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल प्रसिद्ध होण्यापूर्वी त्याची मार्केट कॅप सुमारे 24 लाख कोटी रुपये होती. फेब्रुवारी 2023 च्या अखेरीस त्याचे मार्केट कॅप 7 लाख कोटी रुपयांच्या खाली आले होते.

HPCL, BPCL शेअर्सही वधारले

सरकारी तेल कंपन्या HPCL, BPCL च्या शेअर्समध्ये 8% वाढ झाली आहे. HPCL, BPCL विक्रमी बोनस जारी करण्याच्या तारखेपूर्वी 8% पेक्षा जास्त वाढले. HPCL ने 21 जून ही शेअर्सच्या बोनस इश्यूसाठी रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केली आहे. बीपीसीएलच्या बोनसची तारीख 22 जून निश्चित करण्यात आली आहे.

बांधकाम क्षेत्रातील कंपनी IRB इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली. स्टॉकमधील ट्रेडिंग 12 टक्क्यांहून अधिक वाढीसह सुरू झाले. गेल्या एक वर्षापासून या शेअरमध्ये जोरदार तेजी आहे. सोमवारपासून देशभरातील 1100 टोलनाक्यांवर 5% पर्यंत टोल वाढ लागू करण्यात आली आहे. याचा परिणाम बांधकाम क्षेत्रातील कंपनीच्‍या शेअर्सवर झाल्‍याचे दिसले.

शेअर बाजार तेजीची 'ही' आहेत पाच प्रमुख कारणे

१ )एक्‍झिट पोलने दिले भक्‍कम सरकार स्‍थापन होण्‍याचे संकेत

लोकसभा निवडणुकीच्या सर्व एक्झिट पोलने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार सलग तिसऱ्यांदा पूर्ण बहुमताने सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे आर्थिक स्‍थिरतेचे संकेत शेअर बाजाराला पसंतीस पडले आणि बाजारातील व्‍यवहारात मोठी वाढ झाली. भाजपच्या विजयामुळे केंद्रीय पातळीवर राजकीय स्थैर्य आणि आर्थिक धोरणे सुरू राहतील अशी अपेक्षा असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

2 ) जीडीपी आकडेवारी सकारात्‍मक

शुक्रवारी 31 मे रोजी शेअर बाजार बंद झाल्यानंतर केंद्र सरकारने जीडीपीची आकडेवारी जाहीर केली होती. जानेवारी ते मार्च या तिमाहीत देशाचा जीडीपी ७.८ टक्के होता, असे सरकारच्‍या वतीने स्‍पष्‍ट करण्‍यात आले . तर संपूर्ण आर्थिक वर्ष 2024 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 8.2 टक्के दराने वाढली. हा आकडा अनेक अर्थतज्ज्ञांच्या अंदाजापेक्षा अधिक असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. त्यामुळे गुंतवणूकदारांचा देशाच्‍या विकासाच्‍या वाटचालीवरील विश्वास अधिक दृढ झाल्‍याचे मानले जात आहे.  याशिवाय सरकारची वित्तीय तूटही सुधारली आहे. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात वित्तीय तूट जीडीपीच्या ५.८ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता, तर जीडीपीच्या ५.६३ टक्के होता. यामुळे गुंतवणूकदारांचा आत्‍मविश्‍वास वाढला आहे.

3) सरकारी रोखे उत्पन्नात झालेली घट

शेअर बाजारातील आजच्या वाढीमागील महत्त्वाचे कारण म्हणजे 10 वर्षांच्या सरकारी रोख्यांच्या उत्पन्नात झालेली घट. सोमवारी या रोख्यांचे उत्पन्न 0.37 टक्क्यांनी घसरून 6.96 टक्क्यांवर आले.  गुंतवणूकदारांची जोखम घेण्‍याचे मानसिकता दिसत आहे. आता ते रोख्यांऐवजी अधिक परताव्याच्या शोधात शेअर बाजाराकडे वळत दिसत असल्‍याचे तज्ज्ञांचे मत आहे.

4 )अस्थिरता निर्देशांकात घट  गुंतवणूकदारांनी केली चौफेर खरेदी

अस्थिरता निर्देशांक, इंडिया VIX, सोमवारी 18.3 टक्क्यांनी घसरला आणि 20 अंकांवर आला. या घसरणीमुळे शेअर बाजारातील अस्थिरतेची शक्यता कमी झाल्याचे दिसून आली. त्यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह अधिक वाढला.  या उत्साहाने, गुंतवणूकदारांनी आजच्‍या व्‍यवहारात चौफेर खरेदी केली, ज्यामुळे स्मॉलकॅप, मिडकॅप, बँक निफ्टी आणि निफ्टी पीएसयू निर्देशांकांनी नवीन सर्वोच्च पातळी गाठल्‍याचे मानले जाते.

5. जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत

जागतिक बाजारातून मिळालेल्या मजबूत संकेतांचाही भारतीय शेअर बाजारावर सकारात्‍मक परिणाम दिसत आहे. अमेरिका आणि युरोप या दोन्ही देशांमध्ये व्याजदर कपातीची शक्यता अलीकडे वाढली आहे. याशिवाय अनेक आशियाई देशांकडूनही सकारात्मक आर्थिक आकडेवारी समोर आली  आहे. या सर्वांचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावर सकारात्‍मक झाल्‍याचे दिसते.

SCROLL FOR NEXT