संदीप पाटील
आजच्या आर्थिक युगात शिस्तबद्ध आणि वाढत्या उत्पन्नानुसार गुंतवणूक करणे आवश्यक बनले आहे. अशा परिस्थितीत, स्टेप-अप एसआयपी ही एक स्मार्ट गुंतवणूक पद्धत ठरते.
सामान्य एसआयपीमध्ये दरमहा एक निश्चित रक्कम गुंतवली जाते; परंतु स्टेप-अप एसआयपीमध्ये ठरावीक कालावधीनंतर तुमची गुंतवणूक रक्कम हळूहळू वाढवता येते.
उदाहरणार्थ, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 5,000 दरमहा गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आणि दरवर्षी 10 टक्के रक्कम वाढवली, तर त्याची गुंतवणूक क्षमता उत्पन्नासोबत वाढत राहते आणि दीर्घकाळात यामुळे जास्त परतावा मिळतो.
1. संपत्ती निर्मितीत वाढ : हळूहळू वाढवलेली गुंतवणूक दीर्घकाळात एक मोठा कोष तयार करते. लहान टप्प्यांत केलेली वाढ शेवटी मोठा आर्थिक फायदा करून देते.
2. महागाईवर मात : जशी महागाई वाढते, तशीच गुंतवणुकीची रक्कमही वाढली पाहिजे. स्टेप-अप एसआयपी महागाईच्या परिणामाला तोंड देण्यासाठी उपयुक्तठरते.
3. लवचिकता आणि सानुकूलता
गुंतवणूकदार आपल्या सोयीप्रमाणे दरवर्षी टक्केवारीने किंवा निश्चित रकमेने वाढवण्याचे प्रमाण ठरवू शकतो . उदाहरणार्थ, रवी नावाचा 30 वर्षीय इंजिनिअर 5,000 रुपये दरमहा एसआयपीने गुंतवणूक करत असेल आणि दरवर्षी 10 टक्के प्रमाणे त्याने ही रक्कम वाढवत नेली, तर 20 वर्षांनंतर त्याचा फंड 1.5 कोटींवर पोहोचतो. जर त्याने ही वाढ केली नसती, तर त्याला फक्त75 लाखच मिळाले असते. अशा प्रकारे हळूहळू वाढलेली गुंतवणूक त्याच्या आर्थिक नियोजनाला मोठा फायदा करून देते आणि तेही जीवनशैलीवर फारसा परिणाम न करता.
बरेच गुंतवणूकदार एसआयपीची रक्कम वाढवताना घाबरतात. कारण, त्यांना आर्थिक ताणाची भीती वाटते; परंतु उपाय साधा आहे. दरवर्षी फक्त500 किंवा 1000 रुपयांनी वाढ करा. या लहानशा वाढीचा दीर्घकाळात मोठा परिणाम होतो. बाजारात अनेक स्टेप-अप एसआयपी कॅल्क्युलेटर उपलब्ध आहेत, जे भविष्यातील कोष किती होईल, हे दाखवतात. अशा साधनांचा वापर मानसिक आत्मविश्वास वाढवतो.
स्टेप-अप एसआयपीमुळे तुमच्या उत्पन्न वाढीसोबत समांतर पद्धतीने तुमचा गुंतवणूक पोर्टफोलिओही वाढतो. महागाईवर मात करत आर्थिक स्थैर्य साधण्यात स्टेप-अप एसआयपी खूप उपयोगी ठरते. तुम्ही नव्याने गुंतवणूक सुरू करत असाल किंवा आधीपासूनच गुंतवणूक करत असाल, तर ही योजना गेम चेंजर ठरू शकते.
ज्यांना नियमित उत्पन्न मिळते, त्यांच्यासाठी ही योजना अधिक उपयुक्त आहे. पगारदार कर्मचार्यांना दरवर्षी वेतनवाढ मिळते. फ्रीलान्सर किंवा छोटे व्यावसायिकही, त्यांचा उत्पन्न प्रवाह नियमित असेल, तर स्टेप-अप एसआयपीसाठी विचार करू शकतात; मात्र लवचिकतेचा विचार करणे आवश्यक आहे.