राधिका बिवलकर
मुलांच्या भविष्यासाठी बचत करायची, पण सुरुवात किती रकमेपासून करावी, हा प्रश्न अनेक पालकांना पडतो. केंद्र सरकारच्या ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेतून अगदी कमी रकमेपासून मुलाच्या नावाने दीर्घकालीन गुंतवणुकीला सुरुवात करता येते. मात्र, ही योजना केवळ बचतीची नसून निवृत्तीविषयक गुंतवणूक व्यवस्थेशी जोडलेली असल्याने तिचे नियम समजून घेणे महत्त्वाचे आहे.
१८ वर्षांखालील मुलाच्या नावाने पालक किंवा कायदेशीर पालक ‘एनपीएस वात्सल्य’ खाते उघडू शकतात. खाते मुलाच्या नावावर असते आणि त्याला कायमस्वरूपी निवृत्ती खाते क्रमांक दिला जातो. वर्षाला किमान २५० रुपयांपासून योगदान सुरू करता येते. गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. त्यामुळे अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांनाही मुलाच्या भविष्यासाठी नियमितपणे निधी उभारण्याचा पर्याय उपलब्ध होतो. मुलाचे नातेवाईक किंवा मित्रदेखील या खात्यात योगदान देऊ शकतात. ही बाजाराशी निगडित योजना असल्याने परतावा निश्चित नसतो; मात्र उदाहरणासाठी सरासरी १० टक्के वार्षिक परतावा गृहीत धरल्यास त्याचे गणित लक्षवेधी ठरते.
दरमहा १,००० म्हणजे वर्षाला १२,००० गुंतवले, तर १८ वर्षांत पालकांची एकूण गुंतवणूक २.१६ लाख होईल. सरासरी १० टक्के परतावा मिळाल्यास हा निधी अंदाजे ५.४७ लाखांपर्यंत पोहोचू शकतो. हाच पैसा २१ वर्षे गुंतवला तर सुमारे ७.६८ लाख, तर २५ वर्षे गुंतवणूक सुरू ठेवली तर अंदाजे ११.८ लाख होऊ शकतात.
दरमहा २,००० गुंतवले तर वर्षाला २४,००० आणि १८ वर्षांत एकूण ४.३२ लाख भरले जातील. १० टक्के परताव्याच्या उदाहरणात ही रक्कम सुमारे १०.९४ लाख होऊ शकते. दरमहा ३,००० म्हणजे वर्षाला ३६,००० गुंतवल्यास १८ वर्षांनंतर अंदाजे १६.४२ लाख निधी तयार होऊ शकतो. २१ वर्षे हीच गुंतवणूक सुरू राहिल्यास तो अनुक्रमे सुमारे १५.३६ लाख आणि२३.०४ लाख होऊ शकतो.
मात्र, हे आकडे केवळ उदाहरणासाठी आहेत. एनपीएस वात्सल्यातील गुंतवणूक बाजाराशी जोडलेली असल्यामुळे १० टक्के परतावा हमखास मिळेलच असे नाही. तसेच १८ वर्षांनंतर खात्यावर लागू होणारे निर्गमनाचे नियम आणि उपलब्ध पर्याय लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे मुलाच्या शिक्षणासाठीची बचत आणि एनपीएस वात्सल्यातील दीर्घकालीन गुंतवणूक यांचे स्वतंत्र नियोजन करणे अधिक शहाणपणाचे ठरते. खरी ताकद आहे ती मोठी रक्कम एकदम गुंतवण्यात नव्हे, तर लहान रक्कम सातत्याने आणि दीर्घकाळ गुंतवण्यात.