स्वाती देसाई
भारतीय शेअर बाजाराने गेल्या काही दिवसांमध्ये नवे विक्रम नोंदवले. सेन्सेक्स आणि निफ्टीने गाठलेल्या उच्चांकामुळे आर्थिक वातावरण उत्साहवर्धक झाले असले, तरी गुंतवणूकदारांसमोर एक जुना पण महत्त्वाचा प्रश्न पुन्हा उभा राहिला आहे. बाजार एवढा वर असताना वर्षातून एकदा मोठी रक्कम एकरकमी गुंतवावी की, महिन्याला दहा हजार रुपये एसआयपीद्वारे हळूहळू गुंतवणूक करावी, याचा विचार प्रत्येकाने करावा लागतो.
त्वरित कंपाऊंडिंगची मोहकता आणि टप्प्याटप्प्याने प्रवेश करण्याची सुरक्षितता- या दोन गोष्टींच्या दरम्यान गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराला निर्णय घ्यावा लागतो.
शुद्ध गणिताच्या द़ृष्टीने पाहता एकरकमी गुंतवणूक नेहमीच पुढे असते. कारण, संपूर्ण रक्कम वर्षभर गुंतलेली राहते आणि कंपाऊंडिंगचा परिणाम अधिक मिळतो. वार्षिक 10%, 12% किंवा 15% परताव्याच्या गृहितकांवर विचार केला, तर एक वर्षात 1.2 लाख रुपये एकदाच गुंतवणे आणि तेच पैसे 10,000 रुपयांच्या मासिक एसआयपीद्वारे गुंतवणे - या दोन मार्गांत शेवटी मिळणार्या रकमेत फरक दिसतो. एकरकमी गुंतवणुकीला वेळेचा आधार मिळतो आणि वाढ अधिक होते. पण, हा फायदा तेव्हाच ठोस दिसतो, जेव्हा बाजार सतत वर जात राहतो आणि अशी सरळ दिशा इक्विटी बाजारात क्वचितच दिसते.
मार्केटमध्ये सुरुवातीला मोठी घसरण आली तर एकरकमी गुंतवणूक मोठा फटका खाते. 20 ते 40% घट लगेचच झाली तर दीर्घकालीन परतावा खूप कमी होतो. या जोखमीला ‘सीक्वेन्स रिस्क’ म्हणतात. याउलट एसआयपी अस्थिरतेचा फायदा घेते. दरमहा किंमत कमी असताना अधिक युनिटस् मिळतात आणि बाजार पुन्हा वाढला की त्या युनिटस्ची किंमतही वाढते.
2008 च्या आर्थिक मंदी किंवा 2020 च्या कोव्हिड संकटात घसरलेल्या एनएव्ही दरांवर घेतलेल्या युनिटस्नी पुढील वर्षांत परतावा मोठ्या प्रमाणात वाढवला. त्यामुळे अस्थिर बाजारात एसआयपी ही सरासरी किंमत नियंत्रित ठेवणारी आणि भावनिक निर्णयांपासून वाचवणारी पद्धत ठरते.
बहुतांश लोकांचे उत्पन्न मासिक असते. त्यामुळे एसआयपी ही नैसर्गिकरीत्या त्यांच्या आर्थिक शिस्तीत बसणारी पद्धत आहे. वेळ साधण्याचा ताण राहत नाही. बाजार खाली असला तरी गुंतवणूक सुरूच राहते, आणि गोंधळाच्या काळात घाईगडबडीत विक्री करण्याची शक्यता कमी होते. वारंवार 10-20% करेक्शन दिसणार्या भारतीय बाजारात नियमित एसआयपी ही दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी अत्यंत वास्तववादी वाटचाल मानली जाते.
सर्व परिस्थितीत एसआयपीच सर्वोत्तम असते असे नाही. मोठी बाजारघट झाल्यानंतर, बोनस किंवा वारसा स्वरूपात अचानक आलेली रक्कम, किंवा 15 वर्षांहून अधिक कालावधीचा गुंतवणूक द़ृष्टिकोन असेल तर एकरकमी गुंतवणूक खर्या अर्थाने चमकते. बाजाराचे मूल्यांकन आकर्षक असेल आणि गुंतवणूकदाराची जोखीम झेलण्याची क्षमता जास्त असेल तर वर्षातून एकदा गुंतवलेली रक्कम उत्तम परिणाम देऊ शकते.
केवळ एसआयपी किंवा केवळ एकरकमी यावर भर न देता दोन्हींचा योग्य मेळ बसवणे, ही आजच्या बाजारासाठी अधिक व्यावसायिक आणि व्यवहार्य रणनीती ठरते. नियमित एसआयपी ही मुख्य गुंतवणूक म्हणून ठेवावी. त्यासोबत बाजार घसरला, तर त्वरित एकरकमी गुंतवणूक करून संधीचा लाभ घ्यावा. तसेच दरवर्षी पगारवाढीनुसार एसआयपीमध्ये
‘टॉप-अप’ करून गुंतवणुकीची गतीही वाढवता येते. ही मिश्र पद्धत जोखीम कमी करते, प्रवेशाची सरासरी किंमत सुधारते आणि बाजारातील संधींचा वेळेत उपयोग करून घेण्याची क्षमता देते. दीर्घकालीन संपत्ती निर्माण करताना सातत्य, शिस्त आणि लवचिकता या तिन्ही गोष्टी एकत्र आणणारा हा सर्वाधिक प्रभावी मार्ग मानला जातो.