मुलांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी टर्म इन्शुरन्स घ्यावा की जीवनविमा?  Pudhari File Photo
अर्थभान

मुलांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी टर्म इन्शुरन्स घ्यावा की जीवनविमा?

पुढारी वृत्तसेवा
सत्यजित दुर्वेकर

टर्म इन्शुरन्स म्हणजे काय?

टर्म इन्शुरन्स हा शुद्ध संरक्षणात्मक विमा प्रकार आहे. यात विमाधारकाच्या मृत्यूनंतर नामनिर्देशित व्यक्तीला ठराविक विमा रक्कम दिली जाते. मात्र, पॉलिसीच्या कालावधीत विमाधारक जिवंत असेल, तर कोणतेही परतावे मिळत नाहीत.

टर्म इन्शुरन्सचे फायदे :

कमी प्रीमियममध्ये मोठे विमा संरक्षण मिळते. उदाहरणार्थ, 30 वर्षांच्या व्यक्तीला 1 कोटी विमा संरक्षण अवघ्या 10,000 ते 15,000 वार्षिक प्रीमियममध्ये मिळू शकते. यामध्ये पालकांच्या अकाली मृत्यूच्या परिस्थितीत मुलांना आर्थिक मदत मिळते. त्यांच्या शिक्षण, उदरनिर्वाह आणि इतर गरजांसाठी ही रक्कम उपयोगी पडते.

आयकर अधिनियमाच्या कलम 80 सी नुसार टर्म इन्शुरन्सच्या प्रीमियमवर कर सवलत मिळते. मृत्यूनंतर मिळणार्‍या रकमेवरही कलम 10(10डी) नुसार कर सवलत मिळते.

यामध्ये कागदपत्रांची प्रक्रिया तुलनेने सोपी असते. कोणत्याही गुंतागुंतीशिवाय विमा रक्कम निश्चित केली जाते.

टर्म इन्शुरन्सचे तोटे :

पॉलिसीच्या कालावधीत विमाधारक जिवंत राहिला, तर कोणतीही रक्कम मिळत नाही. यामुळे काही लोकांना हा पर्याय कमी आकर्षक वाटतो. या पॉलिसीमध्ये आरोग्यविषयक खर्च, वृद्धापकाळातील गुंतवणूक किंवा संपत्ती निर्मिती यासाठी कोणताही फायदा मिळत नाही.

जीवन विमा म्हणजे काय?

जीवन विमा म्हणजे आर्थिक सुरक्षिततेबरोबरच बचतीचा पर्यायही मानला जातो. यात विमाधारकाच्या मृत्यूनंतर कुटुंबाला विमा रक्कम मिळतेच; पण त्याचबरोबर पॉलिसीची मुदत संपल्यानंतर विमाधारकाला एकत्रित रक्कम मिळते.

जीवन विम्याचे फायदे :

टर्म इन्शुरन्सप्रमाणे मृत्यूसोबतच आर्थिक परतावा मिळतो. तसेच बहुतांश पॉलिसी मुदत संपल्यानंतर संपूर्ण रक्कम बोनस आणि व्याजासह परत करतात. मुदत संपल्यानंतर मिळणार्‍या रकमेचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी करता येतो. त्यामुळे हा एक दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय ठरतो.

जीवन विमा पॉलिसीवर कर्ज मिळू शकते, जे आपत्कालीन गरजांसाठी उपयुक्त ठरते. टर्म इन्शुरन्सप्रमाणेच यावरही कलम 80 सी आणि 10(10डी) अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो.

जीवन विम्याचे तोटे :

टर्म इन्शुरन्सच्या तुलनेत जीवन विम्यासाठी अधिक प्रीमियम भरावा लागतो. उदाहरणार्थ, 1 कोटी विमा संरक्षणासाठी वार्षिक 50,000 ते 1,00,000 प्रीमियम भरावा लागू शकतो.

जीवन विम्यातून मिळणार्‍या रकमेचा परतावा मर्यादित असतो आणि तो गुंतवणुकीच्या इतर पर्यायांपेक्षा कमी असतो. उदा. म्युच्युअल फंडस् किंवा शेअर बाजारातील गुंतवणुकीत अधिक परतावा मिळू शकतो.

अनेक जीवन विमा पॉलिसी ठराविक कालावधीसाठीच असतात आणि त्यातील बदल मर्यादित असतात.

मुलांसाठी कोणता पर्याय योग्य?

जर पालकांचे प्राथमिक उद्दिष्ट फक्त आर्थिक सुरक्षा असेल, तर टर्म इन्शुरन्स हा सर्वोत्तम पर्याय आहे. जर सुरक्षेसोबत काही प्रमाणात बचत आणि गुंतवणूक हवी असेल, तर जीवन विमा उपयुक्त ठरू शकतो.

थोडक्यात, टर्म इन्शुरन्स आणि जीवन विमा दोन्हीचे वेगळे फायदे आणि मर्यादा आहेत. पालकांनी आपल्या आर्थिक स्थितीनुसार आणि मुलांच्या भविष्यासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक सुरक्षेच्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडावा. कमी खर्चात जास्त संरक्षण हवे असेल, तर टर्म इन्शुरन्स सर्वोत्तम आहे. संरक्षणासोबत दीर्घकालीन गुंतवणूक हवी असेल, तर जीवन विमा हा एक पर्याय ठरतो.

मुलांच्या भविष्यासाठी योग्य आर्थिक नियोजन करताना विमा हा एक महत्त्वाचा घटक आहे; पण त्यासोबत इतर गुंतवणूक पर्याय (म्युच्युअल फंड, रोख ठेव, पीपीएफ) यांचा विचार करून संतुलित आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT