म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर कर्ज घ्यावे का? Pudhari File Photo
अर्थभान

म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर कर्ज घ्यावे का?

म्युच्युअल फंडावरील कर्ज हा एक चांगला पर्याय

पुढारी वृत्तसेवा
नीलेश पुजारी

म्युच्युअल फंड गुंतवणुकीवरील कर्ज हा एक सोपा आणि जलद निधी उभारण्याचा मार्ग आहे; मात्र त्याचे फायदे आणि तोटे समजून घेतल्याशिवाय निर्णय घेऊ नये.

व्याजदर, कर्ज मर्यादा आणि बाजारातील परिस्थिती लक्षात घेऊन योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. जर नियोजन चुकले, तर तुमच्या गुंतवणुकीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

म्युच्युअल फंड हे गुंतवणूकदारांसाठी चांगला परतावा मिळवून देणारे साधन म्हणून सिद्ध झाले आहे. परंतु, अनेकांना हे माहीत नसते की, त्यावर कर्जदेखील मिळू शकते. जर आपल्याला तातडीची आर्थिक गरज असेल आणि इतर कर्ज पर्याय महाग किंवा कठीण वाटत असतील, तर म्युच्युअल फंडावरील कर्ज हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

म्युच्युअल फंड गुंतवणुकीवरील कर्ज म्हणजे तुमच्या म्युच्युअल फंड युनिटस्ना गहाण ठेवून घेतलेले कर्ज. बँका किंवा वित्तसंस्था ही सेवा देतात आणि तुम्हाला युनिटस्च्या बाजारमूल्याच्या एका विशिष्ट टक्केवारीपर्यंत कर्ज दिले जाते. इक्विटी फंडसाठी ही मर्यादा साधारणतः 50 % - 70 % आणि डेट फंडसाठी 70 % - 85 % असते.

कर्ज घेण्याची प्रक्रिया पात्रता तपासणी

गुंतवणूक केलेल्या म्युच्युअल फंड योजना पात्र आहेत का, हे तपासा.

बँकेकडे किंवा वित्तसंस्थेकडे निकष जाणून घ्या.

आधार कार्ड, पॅन कार्ड आणि उत्पन्नाचा पुरावा लागतो.

अर्ज प्रक्रिया

संबंधित बँक किंवा वित्तसंस्थेकडे अर्ज सादर करा.

म्युच्युअल फंड स्टेटमेंट आणि इतर आवश्यक दस्तऐवज द्या.

कर्ज रक्कम निश्चिती

कर्जाची रक्कम फंडाच्या बाजारमूल्यावर ठरवली जाते.

वित्तसंस्था तुमच्या फंडाच्या प्रकारानुसार (इक्विटी/डेट) मूल्यांकन करते.

मंजुरी आणि वितरण

सर्व कागदपत्रे योग्य असल्यास मंजुरी मिळते.

मंजुरीनंतर ठरावीक दिवसांत कर्ज तुमच्या खात्यात जमा होते.

फायदे कोणते आहेत?

तुमचे युनिटस् विकण्याची गरज नसते, त्यामुळे मार्केटमधील दीर्घकालीन वाढीचा फायदा मिळतो.

वैयक्तिक कर्जाच्या तुलनेत व्याजदर कमी असतो (10%-12% दरम्यान).

इतर कर्जांपेक्षा कर्ज प्रक्रिया वेगाने पूर्ण होते.

बँकांद्वारे विविध परतफेडीच्या योजना उपलब्ध असतात.

तोटे काय आहेत?

बाजाराच्या चढ-उतारांचा परिणाम : जर बाजार घसरला, तर तुमच्या फंडाचे मूल्य कमी होईल आणि अतिरिक्त कर्ज हमी मागितली जाऊ शकते.

मर्यादित कर्ज रक्कम : फक्त 50%-85% कर्ज उपलब्ध होते. त्यामुळे संपूर्ण निधी उभा करणे कठीण जाऊ शकते.

फंड ब्लॉक होतात : तुमचे म्युच्युअल फंड युनिटस् बँकेकडे तारण ठेवली जातात. त्यामुळे तुम्ही त्यांचा विक्रीसाठी किंवा इतर व्यवहारांसाठी वापर करू शकत नाही.

व्याजाचा अतिरिक्त भार : जर परतफेड वेळेत केली नाही, तर व्याजाचा भार वाढतो आणि गुंतवणुकीच्या परताव्यावर परिणाम होतो.

हे लक्षात घेता, जर तुम्हाला अल्पकालीन आर्थिक गरज असेल आणि तुम्ही ठराविक कालावधीमध्ये परतफेड करू शकत असाल, तर हा पर्याय फायदेशीर ठरू शकतो. मात्र, बाजारातील चढ-उतारांचा विचार करून व्याजदराच्या तुलनेत निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT