SIP Investment | पगार वाढल्यास ‘एसआयपी’ वाढवावी का? 
अर्थभान

SIP Investment | पगार वाढल्यास ‘एसआयपी’ वाढवावी का?

पुढारी वृत्तसेवा

सुभाष वैद्य

नोकरीच्या सुरुवातीला दोन-पाच हजार रुपयांची एसआयपी पुरेशी वाटू शकते. मात्र, पगार दुप्पट होऊनही गुंतवणूक तेवढ्यावरच थांबल्यास पगार वाढूनही संपत्ती मात्र त्यावेगाने वाढत नाही.

दरवर्षी पगारवाढ झाली की घरखर्चाची मर्यादा थोडी सैल होते. नवा फोन, मोठी गाडी, चांगले घर, प्रवास किंवा बाहेर खाण्यावरचा खर्च वाढतो. या वाढीत अनेकदा मागे राहते ती गुंतवणूक. अलीकडे प्रसिद्ध झालेल्या 3 वेगवेगळ्या व्यक्तींच्या आर्थिक प्रवासातून हाच मुद्दा समोर आला.

एका व्यक्तीने पीपीएफ आणि एनपीएससारख्या साध्या पर्यायांतून ३ कोटींपेक्षा अधिक निवृत्ती निधी उभा केला. दुसर्‍याने २,५०० रुपयांच्या सुरुवातीच्या पगारापासून उत्पन्न वाढत गेले तसे एसआयपी आणि मालमत्तेतील गुंतवणूक वाढवून कोटींपेक्षा अधिक मालमत्ता तयार केली. तिसर्‍या उदाहरणात वार्षिक उत्पन्न ८० लाखांपर्यंत पोहोचूनही उत्पन्नाचा स्रोत अचानक बंद झाल्यानंतर आर्थिक अडचण निर्माण झाली. धडा एकच : मोठा पगार आणि मोठी संपत्ती या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

पगारवाढीचा नियम ठरवा

पगार १० टक्के वाढला म्हणून जीवनशैलीचा खर्चही १० टक्के वाढविण्याची गरज नसते. वाढलेल्या उत्पन्नातील ठरावीक हिस्सा आधी गुंतवणुकीकडे वळवता येतो. उदाहरणार्थ, मासिक पगार ५०,००० रुपयांवरून ५५,००० झाला तर वाढीव ५,००० पैकी २,००० एसआयपीत टाकण्याचा नियम करता येईल. पुढील वेतनवाढीतही तोच नियम पाळल्यास गुंतवणूक उत्पन्नाबरोबर वाढते.

पाच हजारांची एसआयपी किती वाढेल?

समजा, वयाच्या ३०व्या वर्षी ५,००० रुपयांची मासिक एसआयपी सुरू केली आणि पुढील २० वर्षे तीच रक्कम कायम ठेवली. वार्षिक सरासरी १२ टक्के परतावा गृहीत धरल्यास २० वर्षांनी सुमारे ५० लाखांचा निधी तयार होऊ शकतो. हा परतावा हमीचा नाही; गणित समजण्यासाठी घेतलेले गृहीतक आहे. पण दरवर्षी एसआयपीमध्ये १० टक्के वाढ केली तर चित्र लक्षणीय बदलते. पहिल्या वर्षी ५,००० रुपये, दुसर्‍या वर्षी ५,५०० रुपये, तिसर्‍या वर्षी ६,०५० रुपये अशी गुंतवणूक वाढत जाते. पगारवाढीचा काही भाग गुंतवणुकीकडे वळल्यामुळे दीर्घ काळात चक्रवाढीला अधिक मोठी रक्कम मिळते.

उत्पन्न थांबण्याचीही तयारी

संपत्ती तयार करताना केवळ एसआयपी पुरेशी नाही. आपत्कालीन निधी, आरोग्य विमा आणि योग्य मुदतीचा जीवन विमा यांचीही व्यवस्था आवश्यक आहे. उत्पन्न अचानक कमी झाले तर गुंतवणूक मोडण्याची वेळ येऊ नये, हा त्यामागचा उद्देश. आर्थिक प्रगती मोजताना ‘माझा पगार किती वाढला?’ यापेक्षा ‘पगारवाढीपैकी किती रक्कम मालमत्तेत रूपांतरित झाली?’ हा हिशेब अधिक महत्त्वाचा. कारण वेतन दर महिन्याला मिळते; संपत्ती मात्र वर्षानुवर्षांच्या शिस्तीतून तयार होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT