Sharp India Open Offer Pudhari
अर्थभान

Sharp India Open Offer: शार्प इंडियामध्ये मोठा बदल; कंपनीचा ताबा आता पुण्याच्या कंपनीकडे, ओपन ऑफरची घोषणा

Sharp India Open Offer: शार्प इंडिया लिमिटेडमध्ये मोठा मालकीहक्क बदल होणार आहे. स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी 75% हिस्सा खरेदी करून नवा प्रवर्तक बनणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

Sharp India Open Offer: भारतातील इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी शार्प इंडिया लिमिटेडमध्ये मोठा बदल होणार असून, कंपनीचे मालकी हक्क बदलण्याची शक्यता आहे. जपानमधील मूळ कंपनी शार्प कॉर्पोरेशनने आपल्या संपूर्ण हिस्सेदारीची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता कंपनीचा ताबा पुणेस्थित स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडकडे जाणार आहे.

14 एप्रिल 2026 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या व्यवहाराची अधिकृत माहिती घेण्यात आली. या करारानुसार, शार्प कॉर्पोरेशन जपान आपल्या मालकीतील 1 कोटी 94 लाख 58 हजार इक्विटी शेअर्स विकणार आहे. हे कंपनीच्या एकूण भागभांडवलाच्या 75 टक्के इतके आहे. प्रत्येक शेअरची किंमत 10 रुपये निश्चित करण्यात आली असून या व्यवहाराची एकूण किंमत सुमारे 19.45 कोटी रुपये आहे.

या व्यवहारानंतर सेबीच्या नियमांनुसार ओपन ऑफर जाहीर करणे आवश्यक असल्याने, स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडकडून सार्वजनिक भागधारकांसाठी खुली ऑफरही जाहीर करण्यात आली आहे. या ऑफरअंतर्गत सुमारे 64 लाख 86 हजार शेअर्स खरेदी करण्याचा प्रस्ताव आहे. या ऑफरची किंमतही प्रति शेअर 10 रुपये ठेवण्यात आली आहे.

या प्रक्रियेसाठी नॅव्हिगंट कॉर्पोरेट ॲडव्हायझर्स लिमिटेड यांची अधिकृत व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सेबीच्या ‘Substantial Acquisition of Shares and Takeovers’ नियमांनुसार पार पडत आहे.

या व्यवहारानंतर स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे नवीन प्रवर्तक (Promoter) बनतील. तर शार्प कॉर्पोरेशनचा प्रवर्तक म्हणून असलेला दर्जा संपुष्टात येईल आणि त्याची नोंद सार्वजनिक भागधारक म्हणून केली जाईल.

दरम्यान, या घडामोडींमुळे शेअर बाजारातही कंपनीच्या शेअर्सबाबत उत्सुकता वाढली आहे. गेल्या काही महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. मागील पाच दिवसांतच कंपनीच्या शेअर्समध्ये 76 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, तर पाच वर्षांत गुंतवणूकदारांना तब्बल 170 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळाला आहे.

या मालकी बदलामुळे कंपनीच्या भविष्यातील धोरणांमध्ये काय बदल होणार आणि याचा गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार, याकडे आता बाजाराचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT