Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Today: शेअर बाजाराचे जोरदार कमबॅक! सेन्सेक्स 505 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांना 2 लाख कोटींचा फायदा

Stock Market Today: शेअर बाजाराने आठवड्याच्या शेवटच्या सत्राची दमदार तेजीसह सुरुवात केली असून सेन्सेक्स 505 अंकांनी वधारून 76,657 वर खुला झाला.

Rahul Shelke

Stock Market Today: आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या सत्रात भारतीय शेअर बाजाराची सुरुवात तेजीसह झाली. बाजार उघडताच सेन्सेक्स 505 अंकांनी वधारून 76,657 अंकांवर पोहोचला, तर निफ्टीने 57 अंकांची वाढ नोंदवत 23,930 अंकांवर व्यवहार सुरू केला.

या तेजीमुळे बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुरुवातीलाच सुमारे 2 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. बीएसईवर कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) बाजाराच्या सुरुवातीच्या तेजीमुळे वाढून तब्बल 489.07 लाख कोटी रुपये झाले.

जागतिक बाजारातूनही सकारात्मक संकेत

भारतीय बाजाराला जागतिक बाजारातील तेजीचा आधार मिळाला आहे. आशियाई बाजारांमध्येही उत्साहाचे वातावरण असून, जपानचा निक्केई आणि दक्षिण कोरियाचा KOSPI निर्देशांक प्रत्येकी सुमारे 1 टक्क्यांनी वाढला आहे.

अमेरिकन शेअर बाजारातही गुरुवारी जोरदार रिकव्हरी पाहायला मिळाली. डॉलर इंडेक्स आणि बॉन्ड यील्डमध्ये झालेली घसरण यामुळे डाऊ जोन्स 624 अंकांनी वधारला, तर नॅस्डॅकमध्ये 1.4 टक्क्यांची वाढ झाली.

सलग चार दिवसांच्या घसरणीनंतर बाजारात तेजी

याआधी भारतीय शेअर बाजारात सलग चार सत्रांमध्ये घसरण झाली होती. गुरुवारी निफ्टी 41 अंकांनी घसरून 23,873 अंकांवर, तर सेन्सेक्स 418 अंकांच्या घसरणीसह 76,152 अंकांवर बंद झाला. या सलग चार दिवसांच्या घसरणीत निफ्टी तब्बल 302 अंकांनी खाली आला.

तज्ज्ञांच्या मते, 23,800 ते 24,000 हा निफ्टीसाठी अत्यंत महत्त्वाचा झोन आहे. या पातळीच्या वर किंवा खाली बाजाराची पुढील दिशा अधिक स्पष्ट होऊ शकते.

अमेरिका-इराण तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमतीवर नजर

बाजारासाठी अमेरिका-इराणमधील वाढता तणाव हा महत्त्वाचा जोखीम घटक आहे. त्याचबरोबर कच्च्या तेलाच्या किमतीही सुमारे 96 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास आहेत. त्यामुळे बाजारातील अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे.

गुरुवारी रोख बाजारात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) 2,345 कोटी रुपयांची विक्री केली. त्याचवेळी देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) 4,977 कोटी रुपयांची खरेदी केली.

24,000-24,200 च्या पट्ट्यात निफ्टीसमोर मोठा अडथळा

एचडीएफसी सिक्युरिटीजचे डेप्युटी व्हाइस प्रेसिडेंट नंदीश शाह यांच्या मते, निफ्टीसाठी 24,000 ते 24,200 हा महत्त्वाचा रेजिस्टन्स झोन आहे. निफ्टी या पातळीच्या जवळ पोहोचला की विक्रीचा दबाव वाढताना दिसतो. त्यामुळे रिकव्हरीनंतर पुन्हा घसरण होण्याची शक्यता आहे.

निफ्टीने 23,800 ची पातळी तोडल्यास तो 23,600 च्या दिशेने घसरू शकतो. मात्र 23,800 ची पातळी टिकवण्यात यश आले, तर बाजार काही काळ कन्सोलिडेशनच्या टप्प्यात राहू शकतो. व्यापक चित्र पाहता, बाजारातील डाउनट्रेंड अद्याप कायम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT