पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक पातळीवर व्यापाराबाबत अनिश्चितता तसेच विदेशी गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक काढून घेतली जात असल्याने भारतीय शेअर बाजारावर दबाव कायम राहिला आहे. शेअर बाजारात बुधवारच्या अस्थिर सत्रात चढ-उतार दिसून आला. सेन्सेक्स २८ अंकांच्या किरकोळ घसरणीसह ७५,९३९ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक १२ अंकांच्या घसरणीसह २२,९३२ वर स्थिरावला.
आजच्या सत्रात सर्वाधिक फटका आयटी आणि फार्मा शेअर्संना बसला. निफ्टी आयटी निर्देशांक १.३ टक्के घसरला. निफ्टी फार्मा ०.७ टक्के घसरून बंद झाला. तर मेटल, रियल्टी शेअर्समध्ये तेजी दिसून आली. निफ्टी रियल्टी आणि मेटल निर्देशांक प्रत्येकी १ टक्केहून अधिक वाढले. बीएसई मिडकॅप १.३ टक्के आणि स्मॉलकॅप २.४ टक्के वाढला.
सेन्सेक्सवर झोमॅटोचा शेअर्स ४.८ टक्के वाढून टॉप गेनर ठरला. त्याचबरोबर ॲक्सिस बँक, एलटी, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी, टाटा स्टील, इंडसइंड बँक हे शेअर्स तेजीत राहिले. तर इन्फोसिस, टीसीएस, हिंदुस्तान युनिलिव्हर, भारती एअरटेल, पॉवर ग्रिड, सन फार्मा, बजाज फिनसर्व्ह, एचसीएल टेक हे शेअर्स घसरले.
शेअर बाजाराची (Stock Market) आज घसरणीसह सुरुवात झाली होती. पण त्यानंतर लगेच बाजारात रिकव्हरी दिसून आली होती. सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्स २५० हून अधिक अंकांनी वाढून ७६,२३० वर पोहोचला होता. तर निफ्टी ५० निर्देशांक ७३ अंकांच्या वाढीसह २३ हजारांवर गेला होता. पण त्यानंतर दोन्ही निर्देशांक सपाट पातळीवर बंद झाले.
देशांतर्गंत संस्थात्मक गुंतवणूकदारांचा (Domestic institutional investors) यावर्षी शेअर बाजारात खरेदीचा जोर कायम राहिला आहे. त्यांनी २०२५ मध्ये आतापर्यंत केलेली खरेदी एकूण १ लाख कोटी पार झाली आहे. तर दुसरीकडे विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचे भारतीय बाजारातून पैसे काढून घेण्याचे सत्र कायम आहे. एनएसईच्या (NSE) आकडेवारीनुसार, देशांतर्गंत गुंतवणूकदारांनी २०२५ च्या सुरुवातीलाच भारतीय शेअर बाजारात १.२ लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली. तर विदेशी गुंतवणूकदारांनी १.०६ लाख कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची विक्री केली आहे. याचा बाजारात दबाव दिसून येत आहे.