पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजारात (Stock Market) बुधवारी (दि.२९) सलग दुसऱ्या दिवशी तेजी दिसून आली. सेन्सेक्स (Sensex) ६३१ अंकांनी वाढून ७६,५३२ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक (Nifty) २०५ अंकांच्या वाढीसह २३,१६३ वर स्थिरावला.
विशेष म्हणजे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर निर्णयापूर्वी आणि या आठवड्याच्या शेवटी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात तेजीचा माहौल राहिला.
दरम्यान, आज २९ जानेवारी रोजी बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ७.९४ लाख कोटींनी वाढून ४१६.९४ लाख कोटींवर पोहोचले. २८ जानेवारी रोजी ते ४०९ लाख कोटी रुपयांवर होते. याचाच अर्थ गुंतवणूकदारांनी आज ७.९४ लाख कोटींची कमाई केली.
आजच्या तेजीत आयटी आणि फायनान्सियल शेअर्स आघाडीवर राहिले. निफ्टी आयटी २.६ टक्के आणि निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस निर्देशांक १ टक्के वाढला. बीएसई मिडकॅप २.५ टक्के आणि स्मॉलकॅप ३.२ टक्के वाढला. निफ्टी एफएमसीजी निर्देशांक वगळता उर्वरित १२ क्षेत्रीय निर्देशांक आज हिरव्या रंगात बंद झाले.
सेन्सेक्सवर झोमॅटोचा शेअर्स सर्वाधिक तब्बल ६.७ टक्के वाढून २२२ रुपयांवर पोहोचला. तसेच टाटा मोटर्स, इन्फोसिस, अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्रा, एम अँड एम, बजाज फायनान्स, अदानी पोर्ट्स, सन फार्मा, कोटक बँक, टाटा स्टील, पॉवर ग्रिड, टीसीएस, एचसीएल, इंडसइंड बँक हे शेअर्स १ ते ३ टक्के वाढले.
दरम्यान, आज ITC Hotelsचा शेअर्स १८८ रुपयांवर शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. पण काही मिनिटातच त्याला ५ टक्क्यांचे लोअर सर्किट लागले. त्याचबरोबर भारती एअरटेल, मारुती, एशियन पेंट्स हे शेअर्सही घसरले.
टेक कंपन्यांच्या शेअर्समधील वाढीच्या जोरावर काल अमेरिकेतील शेअर बाजार तेजीत बंद झाला. चीनच्या स्वस्त DeepSeek एआय मॉडेलच्या पार्श्वभूमीवर चिपमेकर एनव्हीडियाचे शेअर्स दोन दिवसांपूर्वी १७ टक्क्यांनी घसरले होता. दरम्यान, काल एनव्हीडियाच्या शेअर्समध्येही रिकव्हरी दिसून आली. ८.९ टक्के वाढीसह बंद झाले. नॅस्डॅक निर्देशांक २ टक्के वाढ दिसून आली. एस अँड पी ५०० निर्देशांक ३.६ टक्के वाढून बंद झाला.