पुढारी ऑनलाईन डेस्क : पाच सत्रांतील घसरणीनंतर आज सोमवारी (दि. २८) भारतीय शेअर बाजार (Stock Market) सावरला. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स (Sensex) सुमारे १,१०० अंकांनी वाढला. तर निफ्टीने (Nifty) २४,,४५० वर व्यवहार केला. त्यानंतर सेन्सेक्स ६०२ अंकांनी वाढून ८०,००५ वर स्थिरावला. तर निफ्टी ५० निर्देशांक १५८ अंकांच्या वाढीसह २४,३३९ वर बंद झाला. खरेदीदारांनी कमी मुल्यांकनाचा घेतलेला फायदा आणि कच्च्या तेलाच्या दरातील घसरण आणि आशिया बाजारातील तेजीचा मागोवा घेत आज भारतीय शेअर बाजाराने घसरणीतून जोरदार रिकव्हरी केल्याचे दिसून आले.
बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल आज ४.५६ लाख कोटींनी वाढून ४४१.५४ लाख कोटींवर पोहोचले.
बाजारातील तेजीत फायनान्सियल, मेटल आणि आयटी शेअर्स आघाडीवर राहिले. निफ्टी ऑटो, बँक, फार्मा, मेटल, पीएसयू बँक, हेल्थकेअर, रियल्टी आणि मीडिया हे क्षेत्रीय निर्देशांक १ ते ४ टक्क्यापर्यंत वाढले. विशेष म्हणजे निफ्टी ऑटोच्या पाच दिवसांच्या घसरणीला आज ब्रेक लागला. बीएसई मिडकॅप ०.७ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप १.१ टक्के वाढला.
सेन्सेक्सवर आयसीआयसीआय बँकेचा (ICICI Bank Share) शेअर्स ३ टक्के वाढला. त्याचबरोबर अदानी पोर्ट्स, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, एम अँड एम, सन फार्मा, हिंदुस्तान युनिलिव्हर, एसबीआय, टाटा मोटर्स, एशियन पेंट्स, बजाज फिनसर्व्ह, एचसीएल टेक हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांपर्यंत वाढले. तर ॲक्सिस बँक, कोटक बँक, टेक महिंद्रा या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
निफ्टीवर श्रीराम फायनान्स, अदानी एंटरप्रायजेस, आयसीआयसीआय बँक, जेएसडब्ल्यू स्टील, विप्रो हे शेअर्स २ ते ५ टक्क्यांनी वाढले. तर कोल इंडिया, बजाज ऑटो, ॲक्सिस बँक, हिरो मोटोकॉर्प हे शेअर्स १ ते ४ टक्क्यांपर्यंत घसरले.
सोमवारी कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ४ डॉलरहून अधिक घसरल्या. मध्य पूर्वेतील संघर्षामुळे गेल्या काही दिवसांत कच्च्या तेलाचे दर वाढले होते.