पुढारी ऑनलाईन डेस्क : गुरुवारच्या जोरदार तेजीनंतर शुक्रवारी (३ जानेवारी २०२५) शेअर बाजार (Stock Market) धडाम झाला. जागतिक कमकुवत संकेतांदरम्यान सेन्सेक्स आणि निफ्टी घसरले. सेन्सेक्स (Sensex) आज ७२० अंकांनी घसरून ७९,२२३ वर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) १८३ अंकांच्या घसरणीसह २४,००४ वर स्थिरावला. आज विशेषतः बँकिंग आणि आयटी शेअर्समध्ये दबाव राहिला. कच्च्या तेलाच्या दरात झालेली वाढ, प्रतिकूल मॅक्रो परिस्थिती, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून कमी व्याजदर कपातीचे संकेत आदी घटक बाजारातील घसरणीमागे कारणीभूत ठरल्याचे बाजार विश्लेषक सांगतात.
सेन्सेक्सवर झोमॅटोचा शेअर्स ४.२ टक्के घसरणीसह टॉप लूजर ठरला. त्याचबरोबर एचडीएफसी बँक २.४ टक्के, टेक महिंद्रा २.२ टक्के, अदानी पोर्ट्स, टीसीएस प्रत्येकी २ टक्के, आयसीआयसीआय १.८ टक्के, सन फार्मा १.५ टक्के, एचसीएल टेक शेअर्स १.४ टक्के घसरला. तर दुसरीकडे टाटा मोटर्सचा शेअर्स ३.३ टक्के वाढला. टायटन, नेस्ले इंडिया, हिंदुस्तान युनिलिव्हर, रिलायन्स हे शेअर्सही तेजीत राहिले.
क्षेत्रीय आघाडीवर बँक कॅपिटल गुड्स, आयटी आणि आयटी निर्देशांक प्रत्येकी १ टक्के घसरले. तर ऑईल अँड गॅस, मीडिया निर्देशाकात १ टक्के वाढ झाली. बीएसई मिडकॅप ०.३ टक्के घसरला. तर स्मॉलकॅप सपाट पातळीवर बंद झाला.
दूरसंचार विभागाच्या अंतर्गत असलेल्या सरकारी मालकीच्या ITI लिमिटेडच्या शेअर्सने आज २० टक्के वाढ नोंदवली. या शेअर्सला आज अप्पर सर्किट लागले. बीएसईवर हा शेअर्स ४५७ रुपयांच्या नवीन सार्वकालीन उच्चांकावर पोहोचला. (ITI Share Price) या शेअर्सने ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे.
सेन्सेक्सववरील ३० पैकी १० शेअर्स आज वाढीसह बंद झाले. तर उर्वरित २० शेअर्समध्ये घसरण झाली. बीएसईवर आज वधारुन बंद झालेल्या शेअर्सची संख्या अधिक राहिली. एकूण ४,१०३ शेअर्समध्ये व्यवहार दिसून आली. यातील २,११७ शेअर्स तेजीसह बंद झाले. तर १,८६६ शेअर्समध्ये घसरण झाली. १२० शेअर्स कोणत्याही चढ-उताराविना बंद झाले.