सोमवारी सेन्सेक्स ८५६ अंकांनी घसरून ७४,४५४ वर बंद झाला. (AI-generated)
अर्थभान

Stock Market | सेन्सेक्स ८५६ अंकांनी घसरून बंद, गुंतवणूकदारांना मोठा फटका

शेअर बाजारात सलग पाचव्या सत्रांत घसरण

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : ग्राहकांकडून मागणीत झालेली घट, परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा सपाटा आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्‍ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्यांचे भारतीय शेअर बाजारात (Stock Market) पडसाद कायम आहेत. यामु‍ळे आज सोमवारी (दि.२४) सलग पाचव्या सत्रांत सेन्सेक्स- निफ्टी घसरणीसह बंद झाले. आजच्या सत्रात जोरदार विक्रीचा मारा दिसून आला. सेन्सेक्स (Sensex) ८५६ अंकांनी घसरून ७४,४५४ वर बंद झाला. तर निफ्टी ५० (Nifty) निर्देशांक २४२ अंकांच्या घसरणीसह २२,५५३ वर स्थिरावला. सेन्सेक्स- निफ्टीची आजची ही घसरण अनुक्रम १.१ टक्के आणि १.०६ टक्के एवढी होती.

फायनान्सियल आणि आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. निफ्टी आयटी २.७ टक्के घसरला. निफ्टी मेटल २.१ टक्के घसरला. तर बीएसई मिडकॅप ०.७ टक्के आणि स्मॉलकॅप १.३ टक्के घसरून बंद झाला.

गुंतवणूकदारांना ४.२२ लाख कोटींचा फटका

बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २४ फेब्रुवारी रोजी ४.२२ लाख कोटींनी कमी होऊन ३९७.९८ लाख कोटींपर्यंत खाली आले. याआधी २१ फेब्रुवारी रोजी बाजार भांडवल ४०२.२० लाख कोटी रुपयांवर होते. याचाच अर्थ आज गुंतवणूकदारांची संपत्ती ४.२२ लाख कोटींनी कमी झाली.

Sensex Today | कोणते हेवीवेट शेअर्स घसरले?

सेन्सेक्सवर एचसीएल टेक, झोमॅटो, टीसीएस, इन्फोसिस, भारती एअरटेल, टेक महिंद्रा, टाटा स्टील, एनटीपीसी, एलटी, इंडसइंड बँक, अदानी पोर्ट्स, रिलायन्स हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांनी घसरले. तर दुसरीकडे एम अँड एम, कोटक बँक, मारुती हे शेअर्सनी हिरव्या रंगात बंद झाले.

Trump's Tariff Threats | ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा फटका

विशेषतः अमेरिकेच्या बाजारातील घसरणीचा भारतीय बाजारातही दबाव राहिला. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनसह भारतावर रेसिप्रोकल शुल्क लागू करणार असल्याची घोषणा केली आहे. याची गुंतवणूकदारांनी धास्ती लागली आहे.

परदेशी गुंतवणूदारांकडून विक्री कायम

त्यात परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून पैसे काढून घेत आहेत. याचाही दबाव बाजारात राहिला आहे. फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत त्यांनी ३६,९७६ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची विक्री केली आहे. २१ फेब्रुवारी रोजी त्यांनी ३,४४९ कोटी रुपयांचे शेअर्स विकले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT