Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Crash: सेन्सेक्समध्ये 1,700 अंकांची घसरण; अचानक शेअर बाजार कोसळण्यामागची 3 मोठी कारणं कोणती?

Stock Market Crash: अमेरिका-इराण संघर्ष, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती आणि जागतिक बाजारातील संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली.

पुढारी वृत्तसेवा

Stock Market Crash: भारतीय शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळाली. दिवसाच्या व्यवहारादरम्यान सेन्सेक्स तब्बल 1,700 अंकांपर्यंत घसरला, तर निफ्टी 24,100 च्या खाली घसरला. अमेरिका-इराणमधील वाढता संघर्ष, कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ आणि जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांमधील विक्रीचा दबाव यामुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर फ्रॉफिट बुक केला.

दुपारच्या व्यवहारात सेन्सेक्स 77 हजारांच्या आसपास, तर निफ्टी 24,100 च्या खाली व्यवहार करत होता. बाजारातील बहुतांश क्षेत्रांमध्ये विक्रीचा दबाव दिसून आला.

1. अमेरिका-इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ

शेअर बाजारातील घसरणीचं सर्वात मोठं कारण म्हणजे अमेरिका आणि इराणमधील वाढलेला तणाव. अमेरिकेने इराणवर नव्याने लष्करी कारवाई केल्यानंतर ब्रेंट क्रूडचा भाव 76 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेला.

भारत आपल्या गरजेपैकी सुमारे 85 टक्के कच्चे तेल आयात करतो. त्यामुळे तेल महाग झाल्यास आयात खर्च वाढतो, महागाईवर दबाव येतो आणि कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होण्याची शक्यता वाढते. याच कारणामुळे इंधनावर अवलंबून असलेल्या अनेक क्षेत्रांमध्ये मोठी घसरण झाली.

2. अमेरिकन टेक शेअर्समधील घसरणीचा जागतिक बाजारावर परिणाम

अमेरिकेतील प्रमुख निर्देशांक मंगळवारी घसरणीसह बंद झाले. विशेषतः नॅस्डॅकमध्ये 1 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. AI आणि सेमीकंडक्टर कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे जागतिक गुंतवणूकदारांचा उत्साह कमी झाला. त्याचा परिणाम आशियाई बाजारांवरही झाला आणि भारतीय बाजारातही आयटी व टेक क्षेत्रातील शेअर्सवर दबाव वाढला.

3. AI क्षेत्रातील अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार सावध

दक्षिण कोरियातील सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने मजबूत आर्थिक निकाल जाहीर केला, तरीही कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाली. AI क्षेत्रातील वेगाने वाढणारा व्यवसाय पुढेही कायम राहील का, याबाबत गुंतवणूकदारांमध्ये साशंकता आहे.

याशिवाय चीनची AI कंपनी DeepSeek स्वतःची AI चिप विकसित करत असल्याच्या वृत्तामुळे जागतिक सेमीकंडक्टर कंपन्यांच्या मूल्यांकनाबाबतही चिंता वाढली आहे.

परदेशी गुंतवणूकदारांकडून मात्र सकारात्मक संकेत

बाजारात घसरण असली तरी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) भारतीय बाजारात खरेदी करत आहेत. मंगळवारी FIIs ने 393 कोटी रुपयांची निव्वळ खरेदी केली, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) 383 कोटी रुपयांची विक्री केली.

तज्ज्ञांच्या मते, दक्षिण कोरिया आणि तैवानसारख्या बाजारांतील अनिश्चिततेमुळे काही परदेशी गुंतवणूकदार भारताकडे वळत आहेत. मात्र मध्य पूर्वेतील तणाव आणखी वाढल्यास ही परिस्थिती बदलू शकते.

गुंतवणूकदारांनी आता कोणत्या गोष्टींवर लक्ष ठेवावे?

तज्ज्ञांच्या मते, पुढील काही दिवसांत तीन गोष्टी बाजाराची दिशा ठरवतील. अमेरिका-इराण संघर्षाची पुढील घडामोड, कच्च्या तेलाच्या किमतीतील बदल आणि जून तिमाहीतील कंपन्यांचे आर्थिक निकाल यावर गुंतवणूकदारांचे लक्ष असेल.

जोपर्यंत या मुद्द्यांवर स्पष्टता येत नाही, तोपर्यंत भारतीय शेअर बाजारात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT