सेन्सेक्स आज ८०,०४९ वर बंद झाला. file photo
अर्थभान

Stock Market Closing Bell | शेअर बाजार सुसाट! गुंतवणूकदारांना १.९५ लाख कोटींचा फायदा

सलग चौथ्या सत्रात विक्रमी कामगिरी कायम

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

मजबूत जागतिक संकेत आणि आयटी तसेच बँकिंग शेअर्समधील तेजीच्या जोरावर भारतीय शेअर बाजाराची गुरुवारी (दि.४) चौथ्या सत्रात विक्रमी कामगिरी कायम राहिली. सेन्सेक्सने आजच्या ट्रेड्रिंग सत्रात ८०,३९२ च्या उच्चांकाला स्पर्श केला. त्यानंतर तो ६२ अंकांच्या किरकोळ वाढीसह ८०,०४९ वर स्थिरावला. तर निफ्टीने २४,४०१ चा नवा उच्चांक गाठला आणि त्यानंतर तो १५ अंकांनी किरकोळ वाढून २४,३०२ वर बंद झाला.

शेअर बाजारातील ठळक मुद्दे

  • सेन्सेक्सने आजच्या ट्रेडिंग सत्रात ८०,३९२ च्या नव्या उच्चांकाला स्पर्श केला.

  • त्यानंतर सेन्सेक्स ६२ अंकांच्या किरकोळ वाढीसह ८०,०४९ वर बंद.

  • निफ्टीने आजच्या सत्रात गाठला २४,४०१ चा नवा उच्चांक.

  • त्यानंतर निफ्टी १५ अंकांनी किरकोळ वाढून २४,३०२ वर बंद.

  • आयटी, हेल्थकेअर प्रत्येकी १ टक्क्याने वाढले.

  • बँकिग शेअर्समधील तेजीमुळे निफ्टी बँकचा ५३,३५७ चा उच्चांक नोंदवला.

  • बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप प्रत्येकी ०.६ टक्क्यांनी वाढून बंद.

सेन्सेक्स आणि निफ्टीने आज नवे शिखर गाठले. पण त्यानंतर बाजारात प्रॉफिट बुकिंग दिसून आले. यामुळे दोन्ही निर्देशांक सपाट पातळीवर बंद झाले.

गुंतवणूकदारांना एका दिवसांत १.९५ लाख कोटींचा फायदा

बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ४ जुलै रोजी ४४७.३८ लाख कोटींवर पोहोचले. ३ जुलै रोजी रोजी ते ४४५.४३ लाख कोटी रुपयांवर होते. याचाच अर्थ BSE सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात १.९५ लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

निफ्टी बँक नव्या शिखरावर

क्षेत्रीय निर्देशांकांतील आयटी, हेल्थकेअर प्रत्येकी १ टक्क्याने वाढले. ऑटो आणि रियल्टीमध्येही काही प्रमाणात वाढ दिसून आली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप प्रत्येकी ०.६ टक्क्यांनी वाढून बंद झाले. दरम्यान, बँकिग शेअर्समधील जोरदार तेजीमुळे निफ्टी बँक निर्देशांकाने आज ५३,३५७ चा उच्चांक नोंदवला. त्यानंतर निफ्टी बँक ५३,१०३ वर स्थिरावला.

आयटी शेअर्स तेजीत?

सेन्सेक्सवर एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, सन फार्मा, टीसीएस, इन्फोसिस, कोटक बँक हे शेअर्स सर्वाधिक वाढले. तर एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, एलटी, अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्स घसरले.

सेन्सेक्सवरील शेअर्स.

निफ्टी ५० निर्देशांकाने आज २४,४०१ चा नवा उच्चांक गाठला. त्यानंतर निफ्टी २४,३०० च्या पातळीवर स्थिरावला. निफ्टीवर टाटा मोटर्स, एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक, सन फार्मा, टीसीएस हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांपर्यंत वाढले. तर एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, अदानी एंटरप्रायजेस, विप्रो, टेक महिंद्रा हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी घसरले.

निफ्टी ५० चा ट्रेडिंग आलेख.

आशियाई बाजारातही विक्रमी तेजी, कारण काय?

आशिया बाजारातही आज तेजीचे वातावरण राहिले. जपानमधील मुख्य स्टॉक निर्देशांक गुरुवारी विक्रमी बंद उच्चांकावर बंद झाले. आज टॉपिक्स निर्देशांकाने विक्रमी उच्चांक गाठून ३४ वर्षांपूर्वीच्या त्याच्या मागील उच्चांकाला मागे टाकले. टॉपिक्स निर्देशांक ०.९२ टक्क्यांनी वाढून बंद झाला. याआधीच्या सत्रापूर्वी ते २९०० च्या उच्चांकावर गेला होता. निक्केई निर्देशांक ०.८२ टक्के वाढला. दोन महिन्यांच्या विक्रीच्या सपाट्यानंतर परदेशी गुंतवणूकदारांनी जूनमध्ये आशियाई शेअर्स मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवण्यास सुरुवात केली. कारण अमेरिकेतील महागाईची तीव्रता कमी झाल्यामुळे फेडरल रिझर्व्ह यावर्षी व्याजदरात कपात करेल अशी आशा निर्माण झाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT