पुढारी ऑनलाईन डेस्क : वाढलेली महागाई, कार्पोरेट कंपन्यांची कमकुवत कमाई आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या सततच्या विक्रीच्या पार्श्वभूमीवर आज बुधवारी (दि.१३) भारतीय शेअर बाजार सलग पाचव्या सत्रांत (Stock Market Crash) गडगडला. सेन्सेक्स आजच्या सत्रात १ हजार अंकांनी खाली आला. त्यानंतर सेन्सेक्स (Sensex) ९८४ अंकांनी घसरून ७७,६९० वर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) ३२४ अंकांच्या घसरणीसह २३,५५९ वर स्थिरावला. सेन्सेक्स आणि निफ्टीची आजची घसरण अनुक्रमे १.२५ टक्के आणि १.३६ टक्के एवढी होती. बाजारातील आजच्या घसरणीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ६.८ लाख कोटींनी कमी होऊन ४३०.४५ लाख कोटींवर आले.
सेन्सेक्स ९८४ अंकांनी घसरून ७७,६९० वर बंद.
निफ्टी ३२४ अंकांच्या घसरणीसह २३,५५९ वर स्थिरावला.
सेन्सेक्स- निफ्टीची घसरण अनुक्रमे १.२५ टक्के आणि १.३६ टक्के.
सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद.
ऑटो, कॅपिटल गुड्स, मेटल, रियल्टी, मीडिया २ ते ३ टक्क्यांनी घसरले.
बीएसई मिडकॅप निर्देशांक २.५ टक्के, स्मॉलकॅप ३ टक्क्यांनी घसरून बंद.
किरकोळ महागाई दर १४ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला. यामुळे भारतीय रिझर्व्ह बँककडून पुढील महिन्यात व्याजदर कपातीची शक्यता कमी झाली आहे. त्यात मंगळवारी परदेशी गुंतवणूकदारांनी ३,०२३ कोटींच्या भारतीय शेअर्सची विक्री केली. तसेच अमेरिका आणि आशियाई बाजारातील घसरण झाली. याचे पडसाद आज भारतीय शेअर बाजारात दिसून आले. बाजारात आज चौफेर विक्री झाली.
सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद झाले. ऑटो, कॅपिटल गुड्स, मेटल, रियल्टी, मीडिया २ ते ३ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप निर्देशांक २.५ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक ३ टक्क्यांनी घसरला.
सेन्सेक्सवर टाटा स्टील, एम अँड एम हे शेअर्स प्रत्येकी ३ टक्क्यांनी घसरले. अदानी पोर्ट्स, एसबीआय, जेएसडब्ल्यू स्टील, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, कोटक बँक, रिलायन्स, बजाज फायनान्स, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एलटी, बजाज फायनान्स, पॉवर ग्रिड हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांपर्यंत घसरले. तर केवळ एनटीपीसी शेअर्समध्ये किरकोळ वाढ दिसून आली.
निफ्टीवर हिरो मोटोकॉर्पचा शेअर्स ४ टक्क्यांनी घसरला. एम अँड एम, हिंदाल्को, टाटा स्टील, आयशर मोटर्स हे शेअर्स प्रत्येकी ३ टक्क्यांनी खाली आले. तर ब्रिटानिया, ग्रासीम हे शेअर्स हिरव्या रंगात बंद झाले.