सेन्सेक्स आज ५८४ अंकांच्या वाढीसह ८१,६३४ वर बंद झाला. (file photo)
अर्थभान

'भाजप'च्या विजयानंतर बाजारात तेजीचा माहौल! अदानींसह 'हे' शेअर्स वधारले

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : शेअर बाजारातील (Stock Market) गेल्या सहा सत्रांतील घसरणीला आज मंगळवारी ब्रेक लागला. मध्य-पूर्वेतील संघर्षाची चिंता असूनही भारतीय शेअर बाजारात (Stock Market) मंगळवारी (दि.८) रिकव्हरी दिसून आली. विशेषत: विधानसभा निवडणुकीच्या निकालांचा बाजारावर सकारात्मक परिणाम दिसून आला. हरियाणात (Haryana Election Result) भाजपने तिसऱ्यांदा यश मिळवत हॅट‌्ट्रिक केली. या पार्श्वभूमीवर सेन्सेक्सने आजच्या सत्रात ७०० अंकांपर्यंत वाढ नोंदवली. तर निफ्टीने पुन्हा २५ हजारांची पातळी गाठली. त्यानंतर सेन्सेक्स ५८४ अंकांच्या वाढीसह ८१,६३४ वर बंद झाला. तर निफ्टी २१७ अंकांनी वाढून २५,०१३ वर स्थिरावला.

BSE midcap, स्मॉलकॅप वाढून बंद

क्षेत्रीय आघाडीवर मेटल निर्देशांक वगळता इतर सर्व ऑटो, बँक, हेल्थकेअर, रियल्टी, कॅपिटल गुड्स, पॉवर, टेलिकॉम, मीडिया १-२ टक्क्यांनी वाढले. बीएसई मिडकॅप १.८ टक्के आणि स्मॉलकॅप २.४ टक्के वाढून बंद झाला.

गुंतवणूकदारांनी कमावले ७.९२ लाख कोटी

बीएसई सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात आज ८ ऑक्टोबर रोजी ७.९२ लाख कोटींची वाढ होऊन ते ४५९.९१ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. याआधीच्या सत्रात ते ४५१.९९ लाख कोटी रुपयांवर होते.

अदानी कंपन्यांचे शेअर्स तेजीत

अदानी समुहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज वाढ झाली. सेन्सेक्सवर अदानी पोर्ट्सचा शेअर्स ५ टक्क्यांनी वाढून टॉप गेनर ठरला. त्याचबरोबर एम अँड एम, रिलायन्स, एचडीएफसी बँक, एलटी, एनटीपीसी, एसबीआय, अल्ट्राटेक सिमेंट, कोटक बँक, एशियन पेंट्स, ॲक्सिस बँक हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांपर्यंत वाढले. तर टाटा स्टील, टायटन, बजाज फिनसर्व्ह, जेएसडब्ल्यू स्टील या शेअर्समध्ये घसरण झाली. निफ्टीवर अदानी एंटरप्रायजेसचा शेअर्स ४.९ टक्क्यांनी वाढला.

सेन्सेक्सवर अदानी पोर्ट्सचा शेअर्स ५ टक्क्यांनी वाढून टॉप गेनर ठरला.
निफ्टीने आज पुन्हा २५ हजारांची पातळी गाठली.

कोणते PSU शेअर्स वाढले?

हरियाणा निवडणुकीत भाजपने हॅटट्रिक केली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारशी संबंधित असलेल्या कंपन्यांचे शेअर्स आज वाढले. विशेषत : रेल्वे आणि संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्ये आजच्या सत्रात सर्वाधिक वाढ दिसून आली. आरव्हीएनएल आणि HUDCO हे पीएसयू शेअर्स प्रत्येकी ८ टक्क्यांनी वाढले.

RBI च्या निर्णयाकडे लक्ष

आरबीआयची पतविषयक धोरण समिती उद्या ९ ऑक्टोबर रोजी रेपो रेटबाबतचा निर्णय जाहीर करेल. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने नुकतीच व्याजदरात ५० बेसिस पॉइंट्स (bps) कपात केली आहे. आता गुंतवणूकदारांचे लक्ष आरबीआयच्या ९ ऑक्टोबर रोजी जाहीर होणाऱ्या निर्णयाकडे लागले आहे. आरबीआय व्याजदर कपात करेल या शक्यतेने आज सर्व फायनान्सियल शेअर्समध्ये वाढ दिसून आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT